लोकप्रिय तमीळ अभिनेते व तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते कॅप्टन विजयकांत यांचे गुरुवारी निधन झाले. ते काही दिवसांपूर्वी करोना पॉझिटिव्ह आले होते आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयाच्या निवेदनात त्यांना न्यूमोनिया झाल्याचे नमूद करण्यात आले होते. चेन्नईमध्ये त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मात्र, अचानक कॅप्टन विजयकांत यांच्या मृत्यूची बातमी येऊन धडकल्याने त्यांचे चाहते, कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात करोनाच्या संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. दररोज नवनवीन रुग्ण आढळून येत असल्याने बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामधील बहुतेक रुग्णांना JN.1 व्हेरियंटची लागण झाल्याचे समोर येत आहे. विजयकांत यांना करोना झाल्यानंतर न्यूमोनिया झाल्याचे समोर आले होते. मग JN.1 मुळे न्यूमोनिया होऊ शकतो का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याच विषयावर नवी दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलच्या अंतर्गत औषधांचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरणजित चॅटर्जी यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

डॉक्टर सांगतात, “करोनाच्या JN.1 व्हेरिएंटमुळे आता सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतासोबत इतर अनेक देशांमध्ये या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. हा व्हायरस फारसा प्राणघातक नाही; पण त्याचा वेगाने प्रसार होतोय. शिंकेतून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या थेंबांद्वारे तो हवेत पसरतो. डोकेदुखी, नाक वाहणे व ताप यांसारखी लक्षणे दिसतात, ज्यांनी लस घेतली आहे अशा लोकांनाही तो संक्रमित करू शकतो. कोविडच्या नवीन उपप्रकारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने एक सल्ला जारी केला आहे. त्यामध्ये भारतासह अनेक देशांना सतर्क राहण्यास आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे.”

(हे ही वाचा : गरोदरपणात नाशपती खाणं योग्य की अयोग्य? स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिलं उत्तर…)

JN.1 व्हेरिएंटमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागेल?

सिंगापूरमध्ये जिथे JN.1 ची बहुतेक प्रकरणे आढळली आहेत, तिथे तीन आठवड्यांपासून हॉस्पिटलायझेशन आणि आयसीयूमध्ये दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतात आतापर्यंत JN.1 च्या १५० हून अधिक रुग्णांची नोंद केली गेली आहे. त्यापैकी बहुतेक रुग्ण केरळ आणि गुजरातमधील आहेत. JN.1 मुळे संसर्ग किंवा हॉस्पिटलायजेशनमध्ये वाढ होईल की नाही किंवा किती प्रमाणात होईल, हे सांगता येत नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे.

JN.1 प्रकारामुळे न्यूमोनिया होऊ शकतो?

“कोविड-१९ हा श्वसनाचा आजार आहे आणि त्यामुळे नेहमीच न्यूमोनिया होऊ शकतो. न्यूमोनिया हे एक तीव्र श्वसन संक्रमण आहे; जे सामान्यतः विषाणू किंवा जीवाणूंमुळे होते. हे सर्व वयोगटांतील लोकांमध्ये दिसून येते. जेव्हा ज्येष्ठ नागरिक, प्रौढ किंवा अगदी लहान मुलांचा विचार केला जातो, तेव्हा ते देशातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. न्यूमोनिया हा मुख्यतः जीवाणू संसर्गामुळे होत असला तरी बुरशीजन्य संसर्ग किंवा इन्फ्ल्यूएंझा किंवा कोविड-१० सारख्या विषाणूजन्य संसर्गामुळे फुप्फुसांवरही परिणाम होऊ शकतो. ज्यांना हृदय किंवा फुप्फुसाचा आजार आणि ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

आरोग्याची कशी काळजी घ्यावी?

डॉ. चटर्जी म्हणतात, “प्रत्येकाने, विशेषत: ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे आजार किंवा कर्करोग यांसारख्या सहविकृती आहेत; त्यांनी वारंवार हात धुणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, घराबाहेर पडताना मास्क घालणे यांसारखी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.” त्याचप्रमाणे ते म्हणतात, “आम्ही सध्या कोणाबाबतही बूस्टर डोसची शिफारस करीत नाही. कारण- संसर्ग होणाऱ्या नवीन प्रकारांवर सध्याच्या लसी परिणामकारक ठरतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid jn 1 variantis the new covid strain jn1 causing pneumonia know what doctor says pdb
Show comments