Cravings indicate nutritional deficiencies : अनेकदा आपल्याला एखादा पदार्थ अचानक खाण्याची खूप इच्छा होते; ज्याला आपण क्रेव्हिंग, असे म्हणतो. पण, जर आपल्याला सतत एखादा पदार्थ खाण्याची क्रेव्हिंग होत असेल, तर तो आरोग्याची समस्या किंवा पौष्टिक कमतरतेचाही संकेत असू शकतो. याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने आरोग्य तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.

खालील उदाहरणे समजून घेऊ या.

फॅटी फूड्स

आहारतज्ज्ञ सोनल सुरेका सांगतात, “विशिष्ट पदार्थ खाण्याची सतत इच्छा निर्माण होणे हे काही वेळा शरीरामधील पौष्टिक कमतरतेचेसुद्धा लक्षण असू शकते. तुम्हाला फॅट्सयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा होणे हे मेंदूचे कार्य आणि हार्मोनल संतुलन यांसाठी शरीराला ओमेगा-३ आणि ओमेगा-६ ची आणखी आवश्यकता असल्याचे लक्षण असू शकते. त्याशिवाय आहारात ए, डी, ई व के यांसारख्या जीवनसत्त्वांची कमरतासुद्धा असू शकते.”

चॉकलेट्स

इंटिग्रेटिव्ह हेल्थ कोच डॉ. प्रार्थना शाह सांगतात, “जर तुम्हाला सातत्याने चॉकलेट खाण्याची इच्छा होत असेल, तर तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. कारण- कोको हा मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे आणि कोकोच्या बियांपासून चॉकलेट तयार होते. त्याशिवाय तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी आणि फॅटी अॅसिडचीही कमतरता असू शकते.”

हेही वाचा : Immunity boosting drink : गरम पाण्यात फक्त ‘या’ तीन गोष्टी करा मिक्स; रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रियांका चोप्राचा जुगाड; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

गोड पदार्थ

“जर तुम्हाला सतत गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल, तर तुमच्या शरीरमध्ये क्रोमियम, फॉस्फरस किंवा रक्तात साखरेची कमतरता असण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला गोड खाऊन आनंद मिळत असेल, तर तुमच्या शरीरात सेरोटोनिन हार्मोन सक्रिय होऊ शकते आणि तुमचा मूड सुधारू शकतो. त्यामुळे तुम्हाला आनंद देणाऱ्या अधिक गोष्टी करा,” असे डॉ. शाह सांगतात.

खारट पदार्थ

जर तुम्हाला खारट पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल, तर तुमच्या शरीरात सोडियमची कमतरता असू शकते. याशिवाय कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सुद्धा खारट पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे आपल्या आहारात थोडा दुधाचा समावेश करा.
“त्याशिवाय मॅग्नेशियम आणि पोटॅशियमच्या कमतरतेमुळेसुद्धा खारट पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते,” असे सुरेका सांगतात.

पुढे त्या सांगतात, “विशिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा फक्त पौष्टिक कमतरतेचे लक्षण नव्हे, तर ही गोष्ट आरोग्याच्या समस्येचेसुद्धा संकेत देते. जसे की हार्मोनल असंतुलन, रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित असणे, तसेच तणाव किंवा नैराश्य यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा : Heart Attack & Tea : रोज चहा प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो का? संशोधनातून समोर आली माहिती; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

“झोपेची कमतरता, शरीरात पाण्याची कमतरता आणि औषधांच्या दुष्परिणामांमुळेही क्रेव्हिंग होऊ शकते. त्यामुळे योग्य कारण शोधून काढण्यासाठी चांगली जीवनशैली अंगीकारणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.”

डॉक्टर शाह यांनी नियमित रक्त तपासणी करणे, तसेच इलेक्ट्रोलाइट्स, व्हिटॅमिन्स व रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासण्याचा सल्ला दिला आहे. त्या सांगतात, “आजार ओळखण्यासाठी आणि आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आवश्यक आहे.”