“ १०० ग्रामचं एवढं काय ?”
“ एका रात्रीत असं वजन कमी करणं भयंकर आहे!”
“ असं कसं वजन वाढलं?? “
“का नाही कमी करता आलं?”
काही दिवसांपूर्वीच आटोपलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमधल्या विनेश फोगट हिच्या अपात्रतेच्या निमित्ताने एक ना अनेक प्रश्न जनसामान्यांच्या मनात तयार झाले. या सगळ्या प्रकरणात तिच्या सोबत असणाऱ्या तज्ज्ञांची कितपत चूक आहे?
हेही वाचा…Health Special: जो दुसऱ्यावरी विसंबला..
या मुद्द्यावर वेगवेगळी मतमतांतरं तयार होताना दिसतायत म्हणून हा लेख प्रपंच!
भारतीय नागरिक म्हणून आणि क्रीडा पोषणतज्ज्ञ म्हणून वाढीव वजनामुळे (काहीशे ग्राम का असेना!) अपात्र ठरण्याचा प्रश्न मला कळीचा वाटतो. इतक्या महत्त्वाच्या स्पर्धेच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं लक्षात आल्यावर या खेळाडूंच्या तयारीबद्दल , त्यातील क्रीडाशास्त्र- तज्ज्ञांच्या सहभागाबद्दल नवे खेळाडू, क्रीडा रसिक आणि सर्वसामान्यांना माहित असायला म्हणजे भविष्यामध्ये त्यातून शिकता येईल.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कठोर नियमावली असते आणि त्याच पालन करावंच लागतं. नेहमीच्या आयुष्यातले वजन कमी करण्याचे संदर्भ आणि खेळाडूंसाठीचे पात्रता निकष पूर्णपणे वेगळे असतात. खेळाडूच्या उत्तम खेळासाठी, सक्षम शरीर आणि मन दोन्ही तितकचं महत्वाचं. आणि इथेच क्रीडाशास्त्र तज्ज्ञांचा सहभाग महत्वाचा ठरतो.
क्रीडा विशेष चमूमध्ये कोणाचा सहभाग असतो ?
-फिजिशियन
-व्यायाम तज्ज्ञ
-पोषणतज्ज्ञ
-मानसोपचारतज्ज्ञ
-प्रशिक्षक
खेळाडूच्या शारीरिक क्षमतेनुसार त्याचा खेळातील सहभाग निश्चित करण्यासाठी हा चमू कार्यरत असतो.
व्यायाम तज्ज्ञ, प्रशिक्षक, पोषणतज्ज्ञ आणि मानसतज्ज्ञ एकत्रितपणे खेळाडूचं प्रशिक्षण, आहार , मनोबल यांचं योग्य आरेखन करतात. शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या खेळांमध्ये स्पर्धेच्या काही वर्ष आधीपासून तयारी केली जाते . मोठ्या स्पर्धाची वेळापत्रकं डोळ्यासमोर ठेवूनच खेळाडूंना घडवलं जातं.
वैयक्तिक स्पर्धांमध्ये वेगवान आणि वजनी गटातल्या स्पर्धा असतात . कुस्ती , बॉक्सिंग , तायक्वांदो, ज्युडो , वेटलिफ्टिंग या वजनी गटांच्या स्पर्धांमध्ये स्पर्धक ठराविक वजनी गटात पात्र ठरणं आवश्यक असतं. कुस्तीच्या बाबतीत सांगायचं झालं तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या वजनी गटांची रचना करण्यात आली जेणेकरून फक्त आकारावर कुस्तीचे सामने होणार नाहीत.
हेही वाचा…उकडलेल्या बटाट्यांपेक्षा थंड केलेले बटाटे खाणे आरोग्यदायी आहे का? तज्ज्ञांनी केला खुलासा
खेळाडूंचं शरीर स्पर्धांसाठी तयार करताना फक्त वजनाचं गणित स्नायूंची ताकद , हाडाची घनता , शरीराची लवचिकता ,चरबीचं प्रमाण, पाणी, इतर शारीरिक समस्या यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतं. आपला योग्य वजनी गट ओळखून त्याप्रमाणे शरीराला आकार द्यावा लागतो. त्याच गटात राहून आपली क्षमता वाढवावी लागते. याची जाणीव खेळाडूला योग्य वेळी होणं गरजेचं असतं. कारण सामने काही मिनिटांचे असतात पण तयारी अनेक वर्षांची करावी लागते. विनेशच्या बाबतीमध्ये त्या तयारीसाठी कमी वेळ मिळाला का असं वाटत राहतं, पण पुढे आपण या तयारीसाठी आवश्यक तेवढा वेळ घेणं खूप गरजेचं आहे.
आता खेळल्यानंतर अनेकदा खेळून झाल्यानंतर खेळाडूंचं वजन बदलतं – स्नायूंचं प्रमाण, खेळादरम्यान वापरली जाणारी ऊर्जा ,शरीराला पुरवलेलं खाणं , शरीरातील रक्तपुरवठ्याचा दर , घाम येणं यामुळे वजन बदलतं . यात शरीरातील विविध ग्रंथींचा देखील महत्वाचा वाटा असतो. मात्र पुन्हा या सगळ्याची पूर्वतयारी केलेली असणं हा प्रशिक्षणाचा भाग असतो. क्रीडा-पोषणतज्ज्ञ यासाठी खेळाडूंवर आणि त्यांच्या आहारावर जवळून लक्ष ठेवून असतात .
प्रत्येक खेळाडूला खेळासाठी सक्षम करताना त्याच्या वजनाला पूरक आहार ठरवला जातो , त्यासाठी केवळ दिवस किंवा महिने नाही तर १ वर्षाहून अधिक काळ मेहनत करून घेतली जाते. खेळाडूंच्या आहारात कॅलरीज म्हणजे ऊर्जेचं परिमाण फार महत्वाचं असतं. त्यांच्या शारीरिक कसरतीनुसार, स्पर्धेच्या वेळी असणाऱ्या तापमानानुसार , ठिकाणानुसार , तिथे उपलब्ध असणाऱ्या पदार्थानुसार खेळाडूंच्या आहारात बदल केले जातात. अनेक खेळाडूंना ठराविक पदार्थ खाऊन होणाऱ्या परिणामांबद्दल माहितीच नसते. अशा वेळी झालेली एक चूक अनेक दिवसांचे परिश्रम पाण्यात घालवू शकते. म्हणूनच क्रीडा पोषणतज्ज्ञ खूप जवळून खेळाडूंचा आहार ठरवून त्यांना कोणतीही शारीरिक व्याधी होऊ नये आणि दुखापत झालीच तर ती लवकर भरून निघावी याचीही काळजी घेतात.
शक्यतो वजनी गट ठरवताना वजनाच्या १-५ % जास्तीचा वजन गट ठरविला जातो. खेळाडूंना आहारातील कर्बोदकांचं प्रमाण हे शरीरातील त्याच्या वापरानुसार कमी जास्त ठरवावं लागतं. त्यासाठी तयार करताना वजनाच्या ३-५ पट ग्राम कर्बोदके,दुप्पट प्रमाणात प्रथिने अशा प्रकारचा आहार दिला जातो. खेळाडूंच्या शरीरात चरबीचं प्रमाण हे खेळाबरहुकूम असणं आवश्यक असत. (कुस्ती आणि बॅडमिंटन याला लागणारं प्रमाण वेगवेगळं!) हे प्रमाण नियंत्रित करताना खेळाडूचा मेटाबोलिझम , पचन, शरीराला मिळणारी विश्रांती , शरीराची झीज पूर्णपणे भरून निघणं या गोष्टींचा देखील विचार केला जातो. या सगळ्यात आहारातील मीठ, पाणी, लोह ,कॅल्शिअम या घटकांचं प्रमाण देखील ठराविक प्रमाणात ठेवावं लागतं. आवश्यक असेल तर डॉक्टरांच्या निगराणी खाली विशेष औषधे तात्पुरत्या कालावधीसाठी आहारात समाविष्ट केली जातात .
या सगळ्याची आखणी करताना खेळाडूचं ट्रेनिंग नंतरचं वजन – शरीरातील चरबीचं प्रमाण याची नोंद ठेवली जाते . इतकंच नाही तर खेळाडूच्या शरीरातल्या पाण्याच्या प्रमाणाचीही नोंद ठेवावी लागते. त्याचा वजनावर होणारा परिणाम लक्षात घ्यावा लागतो. तयारी दरम्यान वजन वाढविणे -कमी करणे, एखादी दुखापत झाली तर खेळाडू योग्य निगराणीखाली पूर्ववत खेळू शकतोय का हे जाणण्यासाठी रक्त चाचण्यादेखील केल्या जातात.
यानंतर मानसशास्त्रीय भाग, क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ खेळाडूच्या मानसिकतेचा विचार करून पूरक तयारी करवून घेतात. सामन्याचं दडपण असो किंवा कामगिरीचा ताण, मानसिकतेत बदल असो किंवा मनोबलामध्ये वाढ, क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ अशा वेळी फार मोलाची भूमिका बजावतात.
विनेशच्या बाबतीत सांगायचं झालं तर, ती दोनवेळा ऑलिम्पिक आणि अनेकदा विदेशी कुस्ती स्पर्धा खेळलेली खेळाडू आहे. तिचं गोल्ड मेडलसाठी अपात्र ठरणं अख्ख्या देशाच्या जिव्हारी लागलं. एका बाजूला विनेशचं वजन अपात्रता चर्चेत असताना पुरुष कुस्तीगीर मात्र ४.५ किलो वजन कमी करून पात्रता फेरी पार करतो. हे वाचल्यानंतर वजनाच्या मुद्द्यावर ‘स्त्री’ स्पर्धक आणि ‘पुरुष’ स्पर्धक यांची शारीरिक क्षमता आणि शरीरविज्ञान या दोन्हीतील फरक लक्षात घ्यायला हवा. १०० ग्राम हा जनसामान्यांसाठी अत्यंत छोटा आकडा असला तरी ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये हे वाढीव वजन आहे हे आपण मान्य करायला हवं.
भारतात क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ तयार करण्याचं प्रमाण गेल्या १० वर्षांत सुरु झालंय आणि त्यांच्यासाठीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत ३ वर्षांपूर्वी !
वर्षानुवर्षे आपण आपण वजन कमी जास्त करताना केवळ व्यायाम-तज्ञांवर किंवा जुन्या खेळाडूंच्या अनुभवावर अवलंबून राहिलेलो आहोत. या निमित्ताने क्रीडा पोषणतज्ञांचं महत्व अधोरेखित झालेलं आहे .
यावर्षी भारताकडून पहिल्यांदाच तीन क्रीडा पोषणतज्ज्ञ ऑलिम्पिक साठी निवडले गेले आहेत. पहिल्यांदाच क्रीडातज्ज्ञांचा चमू पॅरिस ऑलिम्पिकसाठी बरोबर नेण्यात आला. भविष्यात अशाच तज्ज्ञांची संख्या वाढावी; त्यांचा योग्य उपयोग तळागाळातील खेळाडूंना व्हावा आणि भविष्यातील कोणत्याही जागतिक स्पर्धांमध्ये वजन या कारणांसाठी कोणताही सक्षम खेळांडू अपात्र ठरू नये एवढं तरी आपण करायला हवं.
हेही वाचा…रोज किती तास झोपल्याने कोलेस्ट्रॉल अन् मधुमेहाचा धोका होईल कमी? संशोधनातून मोठा खुलासा
“स्पर्धेसाठी वजन कमी करणे” आणि “स्पर्धेपुरते वजन कमी करणे” या मानसिकतेतला फरक लक्षात ठेवायला हवा, तो आपल्या क्रीडा संस्कृतीत रुजवायला हवा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी तरंच जास्तीत जास्त खेळाडूंच्या परिश्रमाला पदकरुपी फळ मिळेल.