Diabetes and Blood Pressure: दह्यामध्ये आरोग्याला आवश्यक अनेक सत्व असतात. गुड बॅक्टेरिया, प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम याचा मुबलक साठा असणारे दही जर योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने खाल्ले तर त्याचे अनेक फायदे आहेत. भारतात जवळपास सर्वच राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने आहारात दह्याचे सेवन केले जाते. पण आज आपण एक दही खाण्याचा एक असा प्रकार आहे तो आरोग्य तज्ज्ञांच्या मते तुमचे अनेक त्रास सहज दूर करू शकतो. दह्यात भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून खाल्ल्यास शरीरातील अनेक व्याधी दूर होण्यास मदत होऊ शकते. नेमके या दह्याच्या सेवनाने तुमचे कोणते प्रश्न सुटू शकतील जाणून घेऊयात..
कोलेस्ट्रॉल वाढलंय?
वेबएमडीच्या माहितीनुसार, दह्यात जिऱ्याची पूड मिसळून खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल शरीराच्या बाहेर पडण्यास मदत होऊ शकते तसेच हे दही चांगल्या बॅक्टरीयासह चांगले कोलेस्ट्रॉल सुद्धा शरीरात तयार करते.
पोट गच्च वाटतंय?
भाजलेल्या जिऱ्याची पूड मिसळून दही खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. यासाठी एका वाटी दह्यात अर्धा चमचा भाजलेले जिरे पावडर बनवून घालावे. विशेषतः लहान मुलांना शौचास साफ न होण्याची समस्या असल्यास दह्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. यामुळे आतड्या स्वच्छ होण्यास सुद्धा मदत होते. पोट स्वच्छ असल्याने वजन सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते.
ब्लड प्रेशर व ब्लड शुगर सतत कमी-जास्त होते?
दही व जिऱ्याच्या सेवनाने शरीरातील मॅग्नेशियम संतुलित राहण्यास मदत होते, यामुळे रक्तदाब सुरळीत होऊ शकतो. दही व जिऱ्याच्या सेवनाने शरीरात अँटी- डायबेटिक सत्व तयार होतात यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
हे ही वाचा<< फळं खाताना ‘या’ ५ चुका आतड्या खराब करतात! जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत व वेळ
दरम्यान, सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. अशावेळी दह्याच्या सेवन केल्यास सर्दी- ताप- खोकला होण्याची भीती असते. यावर आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात की, सहसा दिवसभरात एक वाटी दही खाल्ल्यास फार नुकसान होण्याची शक्यता नसते. संध्याकाळी ५ नंतर वातावरणात गारवा वाढू लागतो त्यामुळे रात्रीच्या जेवणात दह्याचे सेवन टाळावे .
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)