What Happens When You Have Sex Daily: अत्यंत नैसर्गिक, अत्यंत गरजेची आणि अत्यंत सामान्य अशी कृती म्हणजे सेक्स. एखाद्याच्या जन्मापासून ते एखाद्याच्या आरोग्यापर्यंत व परिणामी आनंदापर्यंत अनेक गोष्टींचं कारण ठरणारी ही गोष्ट आहे. पण फक्त त्याभोवती शरमेचं वलय तयार झाल्याने याविषयी बोलणं टाळलं जातं. आज आपण अजिबात थट्टा, मस्करी न करता आपल्या शरीरावर परिणाम करण्याची क्षमता असलेल्या या गोष्टीविषयी तज्ज्ञ अभ्यासकांकडून माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय असणार आहे, “रोज सेक्स केल्याने शरीरावर, नात्यावर, मनावर कसा परिणाम होऊ शकतो?”, सेक्सचे फायदे तोटे जाणून घेऊन त्याचं तुमच्या आयुष्यातलं महत्त्व ठरवण्यात तुम्हाला मदत व्हावी हा या माहितीचा हेतू आहे. चला तर मग सुरु करूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेक्सचे मानसिक, भावनिक परिणाम अनेकदा चर्चेत येतात पण शरीराचा प्रत्येक स्नायू ज्या हालचालीत सक्रिय असतो त्याचा शारीरिक परिणाम होणार हे साहजिक आहे. यावरूनच अथरेया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बंगळुरू येथील वरिष्ठ सल्लागार तसेच स्त्रीरोग, प्रसूती आणि महिला आरोग्य तज्ज्ञ डॉ. विनूथा जी, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “दररोज सेक्स करणे हे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्य सुधारणे, तणाव कमी करणे, इंटिमसी वाढवणे असे फायदे देऊ शकते, पण आपण याला जोडून येणारे काही त्रास व समस्या सुद्धा लक्षात घ्यायला हवेत.”

दररोज लैंगिक संबंध ठेवण्याचे संभाव्य शारीरिक फायदे आणि तोटे

१) रोज सेक्स केल्याने होणाऱ्या फायद्यांविषयी डॉ. विनुथा सांगतात की, नियमित लैंगिक क्रिया हृदयाचे ठोके आणि रक्ताभिसरण वाढवून हृदयाचे आरोग्य सुधारते. “अमेरिकन जर्नल ऑफ कार्डिओलॉजी मधील एका अभ्यासात वारंवार लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी झालेला आढळला होता.”

२) लैंगिक क्रिया इम्युनोग्लोब्युलिनचे उत्पादन वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, जी संक्रमणांशी लढण्यासाठी आवश्यक आहे. सेक्स दरम्यान शरीरात एंडोर्फिन सोडले जाते जे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून कार्य करते, ज्यामुळे मायग्रेन आणि संधिवात सारख्या स्थिती कमी त्रासदायक होतात.

३) नियमित लैंगिक क्रिया, पेल्विक स्नायूंना बळकट करू शकतात, जे महिलांच्या पुनरुत्पादक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लघवीवर संयम नसणे अशा परिस्थितीस प्रतिबंध करण्यासाठी पेल्विक फ्लोरची ताकद खूप महत्त्वाची असते. “नियमित संभोगातून वाढलेला रक्त प्रवाह आणि हार्मोनल संतुलन योनीचे ल्युब्रिकेशन आणि लवचिकता वाढवू शकते, जे विशेषतः रजोनिवृत्तीनंतर फायदेशीर आहे.”

परंतु, दैनंदिन लैंगिक क्रियाकलापांशी संबंधित काही समस्यांचा देखील विचार केला पाहिजे, कारण यामुळे शारीरिक अस्वस्थता किंवा ताण येऊ शकतो, विशेषत: एखादा आजार असलेल्या किंवा सुदृढ नसलेल्या व्यक्तींना याचा त्रासही होऊ शकतो. स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यास वारंवारता मूत्रमार्गात संक्रमण (यूटीआय) आणि इतर संक्रमणांचा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो.

दैनंदिन लैंगिक संबंधांचा मानसिक आणि भावनिक स्थितीवर कसा परिणाम होतो?

डॉ. विनुथा यांच्या माहितीनुसार, लैंगिक क्रिया शरीरात ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन सोडतात, जे तणाव कमी करण्यास आणि निरोगीपणाची भावना वाढविण्यास मदत करतात. नियमित सेक्समुळे मनःस्थिती सुधारू शकते आणि सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या हार्मोन्सच्या उत्सर्जनामुळे नैराश्य आणि चिंतेची लक्षणे कमी होऊ शकतात. मात्र रोज उत्तम सेक्स करण्याची अपेक्षा कदाचित जोडीदारांपैकी एखाद्यावर दबाव टाकून ताण निर्माण करू शकते. याविषयी पार्टनर्समध्ये नीट संभाषण न झाल्यास याचा मानसिक आरोग्यवर परिणाम होऊ शकतो.

रोज सेक्स केल्याने शरीरात सोडले जाणारे हॉर्मोन्स व त्यांचे संभाव्य प्रभाव

१) ऑक्सिटोसिन: हा प्रकार ‘लव्ह हार्मोन’ म्हणून ओळखला जातो. ऑक्सिटोसिन जोडीदारांमधील प्रेम व आपुलकी वाढवतो.

२) एंडोर्फिन: हा हॉर्मोन वेदना कमी करतो आणि आनंद वाढवतो.

३) टेस्टोस्टेरॉन: नियमित सेक्स पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवू शकतो, ज्यामुळे कामवासना आणि ऊर्जा पातळी वाढू शकते.

४) इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन: स्त्रियांमध्ये, लैंगिक क्रियांचे नियमन करण्यास, मासिक पाळीच्या आरोग्यास आणि मूड स्थिर ठेवण्यास या हॉर्मोन्सची मदत होते.

हे ही वाचा<< सेक्स करण्याची बेस्ट वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात, प्रेग्नन्सी हवी किंवा टाळायची असल्यास शरीरसंबंध कधी ठेवावे?

रोज सेक्स केल्याने नात्यावर काय परिणाम होतो?

डॉ. विनुथा सांगतात की, “रोज सेक्स केल्यामुळे जोडीदारांमधील जवळीक आणि भावनिक संबंध वाढू शकतो. एकमेकांची प्राधान्ये आणि इच्छा समजून घेतल्या जातात. संवाद सुधारण्यास सुद्धा सेक्सची मदत होऊ शकते. पण पुन्हा एकदा ही बाब लक्षात घ्यायला हवी जी लैंगिक संबंध हे बंधन म्हणून नेहमी केल्यास त्यातील उत्साह व उत्स्फूर्तता कमी होऊ शकते. परिणामी काळानंतरने स्वारस्य सुद्धा गमावले जाऊ शकते. आपली व आपल्या जोडीदाराची गरज किती प्रमाणात आहे हे समजून घेण्यासाठी संवाद व त्याहूनही जास्त समंजसपणा आवश्यक आहे.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily sex pros cons what happens when you engage in sexual act every day vaginal lubrication to heart health relationship effect svs