Daily Shower Hygiene : वैयक्तिक स्वच्छतेसाठी अंघोळ ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक जण रोज सकाळी उठल्यानंतर दात घासून अंघोळ करतात. भारतात तरी याच पद्धतीचे लोक अनुसरण करतात. कारण- अंघोळीमुळे शरीराची स्वच्छता तर राखता येतेच; शिवाय ताजेतवाने झाल्यासारखे वाटते, दिवसभर काम करताना एक उत्साह येतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, रोज अंघोळ करण्याची सवय तुम्ही अचानक बंद केली, तर त्याचा काय परिणाम होईल? अनेकांना या विचारानेच किळस वाटली असेल.
शरीराच्या नैसर्गिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे; पण अनेकांना हा विचारच मुळात आवडला नसेल. नियमित अंघोळ न केल्यास शरीरात होणारे बदल आणि त्वचेवरील जटिल परिसंस्थेबद्दल अधिक जाणून घेता येऊ शकते. मानवी जीवशास्त्राच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण अभ्यास असेल.
याच विषयावर बोअरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटलच्या सहायक प्राध्यापिका डॉ. स्वेता श्रीधर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. अंघोळ करण्याची सवय अचानक बंद केल्यास त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो याविषयी त्यांनी सांगितले आहे. साफसफाईची दिनचर्या विसरल्यास होणाऱ्या आश्चर्यकारक बदलांबद्दलची माहिती त्यांनी दिली.
डॉ. श्रीधर यांच्या मते, मानवी त्वचा ही नैसर्गिक तेल, घाम व मृत त्वचेच्या पेशी यांनी भरलेली एक गतिशील परिसंस्था आहे. त्यामुळे नियमित अंघोळ केल्याने यात संतुलन राखण्यास मदत होते. परंतु, जेव्हा तुम्ही अचानक अंघोळीची सवय बंद करता तेव्हा हे टाकाऊ पदार्थ त्वचेवर जमा होतात.
तुम्ही रोज अंघोळ न केल्यास काय होईल?
तेल आणि घामामुळे समस्या : सेबम (त्वचेवरील तेल) आणि घामाचे जास्त उत्पादन त्वचेवरील छिद्रे बंद करू शकते. त्यामुळे मुरमे, ब्लॅकहेड्स आणि त्वचा तेलकट, चिकट होणे अशा समस्या वाढू शकतात.
मृत त्वचापेशींचा संचय : आपल्या त्वचेतील मृत त्वचापेशी हळूहळू निघून जात असतात. परंतु, नियमितपणे अंघोळ न केल्यास ही मृत त्वचा शरीरावर चिकटून राहील आणि त्यामुळे त्वचा निस्तेज, खडबडीत व फिकी दिसू शकते.
पीएच असंतुलन : त्वचेतील नैसर्गिक पीएच किंचित अम्लीय असते, जे हानिकारक जीवाणूंपासून संरक्षण करण्यास मदत करते. अंघोळ न केल्याने हे पीएच संतुलन बिघडू शकते; ज्यामुळे तुमची त्वचा संक्रमित होण्याची शक्यता अधिक असते.
खाज आणि जळजळ : घाम, घाण व मृत त्वचेच्या पेशी जमा झाल्यामुळे खाज सुटणे आणि जळजळ होऊ शकते. विशेषत: काखा आणि मांड्या यांसारख्या अवयवांना त्रास होऊ शकतो.
त्वचेच्या मायक्रोबायोमवर कोणता परिणाम होतो?
डॉ. श्रीधर म्हणाले की, मानवी त्वचा ही जीवाणू, बुरशी व विषाणूंसह सूक्ष्म जीवांच्या विविध समुदायांचे घर आहे. हे तुमच्या त्वचेचे मायक्रोबायोम आहेत आणि ते तुमच्या त्वचेचे रोगजनकांपासून संरक्षण करण्यात व तुम्हाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात,
नियमित अंघोळ केल्याने अतिरिक्त तेल, घाम आणि संभाव्य हानिकारक सूक्ष्म जंतू काढून त्वचेच्या मायक्रोबायोमचे नियमन करण्यास मदत होते. पण, जेव्हा तुम्ही अंघोळ करणे बंद करता तेव्हा त्वचेचे संतुलन बिघडू शकते आणि त्यामुळे त्वचेवर विषाणू, बुरशी, जीवाणूंचे प्रमाण वाढू शकते.
मायक्रोबायोम असंतुलित झाल्यास त्वचेच्या नैसर्गिकरीत्या संरक्षणात अडचणी येतात. त्यामुळे तुम्ही फॉलिक्युलायटिस (केसांच्या मुळांमध्ये जळजळ) किंवा इम्पेटिगो (त्वचेला होणारा एक संसर्गजन्य जीवाणू संसर्ग) यांसारख्या संसर्गांना बळी पडता.
डॉ. श्रीधर पुढे म्हणतात, “एक्झिमा, सोरायसिस किंवा त्वचारोग यांसारख्या परिस्थिती असलेल्या व्यक्तींनी शारीरिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास जळजळ, खाज सुटणे आणि अस्वस्थता या समस्या वाढू शकतात.
शरीराचा गंध हा त्वचेवरील जीवाणूंच्या क्रियांचा नैसर्गिक परिणाम असला तरी अंघोळीमुळे घाम आणि दुर्गंधी निर्माण करणारे जीवाणू पळवून लावत त्यांची संख्या कमी करण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही अचानक अंघोळ करणे बंद करता तेव्हा तुमच्या शरीराला अधिक वास येऊ लागतो.
तीव्र दुर्गंध : घाम, सेबम व जीवाणू यांच्या मिश्रणामुळे तीव्र गंध निर्माण होतो, जो अंघोळ न केल्यास कालांतराने तीव्र होतो.
सामाजिक प्रभाव : शरीराला सतत दुर्गंध येत राहिल्यास तुम्हाला इतर लोक नावे ठेवतात. अनेकदा नातेसंबंध आणि आत्मसन्मानाला ठेच पोहोचते.
शरीराच्या दुर्गंधीच्या पलीकडे : अस्वच्छतेमुळे त्वचेवर घाण जमा होऊ शकते; ज्यामुळे तुम्ही त्वचेचे संक्रमण आणि इतर आरोग्य समस्यांना बळी पडण्याची शक्यता असते.
त्वचा संक्रमण : जीवाणू आणि बुरशी यांची उबदार, ओलसर वातावरणात वाढ होते. नियमित अंघोळ न केल्यास, अॅथलीटना पाय किंवा यीस्ट संसर्गासारख्या त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो.
त्वचारोग : खूप दिवस अंघोळ न केल्यास त्वचारोगाचा धोका वाढतो. त्याशिवय त्वचेवर मृत त्वचेच्या पेशींचा जाड थर तयार जमतो. हा थर कालांतराने खवल्यांसारखा दिसू लागतो. त्यावर काही वेळा उपचार करणे कठीण होऊन बसते.
सिस्टमिक इन्फेक्शन्स : काही प्रकरणांमध्ये त्वचेचे संक्रमण शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकते; ज्यामुळे सिस्टमिक इन्फेक्शन्स होतात, ज्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते.
मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम : अस्वच्छता मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते; ज्यामुळे लाजिरवाणेपणा, शरम आणि सामाजिक अलगतेची भावना निर्माण होते.