Health Benefits of Dry Fruits औषधाविना उपचार- सुकामेवा हे बहुतेकदा श्रीमंती खाणे समजले जाते. आर्थिकदृष्ट्या तर ते आहेच पण पोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही सुकामेव्यातील अनेक घटक श्रीमंत आहेत. म्हणूनच सुकामेवा खाणं गरजेचं आहे.
खजूर
खजूर हे पूर्णअन्न आहे. खजूर उष्ण हवामानात व प्रदेशात तयार होतो. तो पोटात गेल्याबरोबर पचायला सुलभ अशा गुणांचाच असतो. खजूर जशाचा तसा पूर्णपणे आतड्यांनी ग्रहण केला जातो. पचायला बिलकूल जड नाही. खजूर उष्ण आहे अशी समजूत आहे. खजूर वात व पित्तशामक कार्य करतो; वजन वाढवतो. शरीराला तृप्ती आणतो आणि म्हातारपण दूर ठेवतो. ज्यांना शंभर वर्षे जगण्याची इच्छा आहे त्यांनी खजूर नियमितपणे खावा. खजूर तुपाबरोबर घेतल्यास त्याचे गुण वाढतात. खजुरात ए, बी, सी व्हिटॅमिन व भरपूर साखर तसेच लोह आहे.
त्वचेवरच्या सुरकुत्या दूर होतात
वाढलेल्या पांथरीवर खजूर उपयोगी पडतो. खजुराच्या चार बियांचा गर कुस्करून पाण्याबरोबर नियमितपणे महिनाभर खावा. पांथरी कमी होते. खजूर सारक आहे. त्यामुळे पोट साफ होते. त्वचेच्या सुरकुत्या दूर होतात. कांती सुधारते, रक्त वाढते. खजूर खाण्याअगोदर त्याचा दर्जा बघावा. खजूर अत्यंत अस्वच्छपणे आयात होतो. त्याचा वापर करणारे गलिच्छपणे त्याचा व्यवहार करतात, त्यामुळे खजूर गरम पाण्याने स्वच्छ धुऊन मगच खावा.

उत्तम टॉनिक

तृषार्त किंवा खूप शोष पडणाऱ्यांनी खजुराच्या दोन-चार बियांचा मगज थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवून ते पेय घ्यावे. वृद्ध व लहान कृश बालकांकरिता दोन खजूर, चिमूटभर जिरे व चवीला गूळ किंवा साखर असे मिश्रणाचे सरबत मिक्सरमध्ये करावे. चहा, कॉफी किंवा खूप जाहिरातींच्या टॉनिकपेक्षा उत्तम पेय म्हणून काम देते.

दुर्धर खोकल्यावर गुणकारी

खजुराचा विशेष फायदा, मेंदू, हृदय, कंबर, वृक्क या अवयवांना बल देण्यात होतो. तापातून उठलेल्यांकरिता खर्जूरमंथ किंवा रवीने घुसळून तयार केलेले खजुराचे सरबत फार चांगले गुण देते. अतिकृश बालकांना वजन वाढवायला खजुराचा उपयोग होतो. दातांचे आरोग्य मात्र खजूर खाताना सांभाळावे लागते. काळा किंवा लालबुंद खजूरच खावा.
निवडुंगाच्या बोंडांपासून ‘नवजीवन’ नावाचे एक अफलातून औषध लहान बालकांच्या दुर्धर खोकला विकाराकरिता वापरले जाते. त्याच्या औषधी निर्माण प्रक्रियेत आसुत क्रियेकरिता- फरमेंटेड प्रोसेसकरिता खजुराच्या सत्त्वांशाचा वापर केला जातो. (संदर्भ- म.अ. अण्णासाहेब पटवर्धन चरित्र) कोरड्या खोकल्याकरिता वापरल्या जाणाऱ्या एलादी वटीत तसेच खर्जुरासवात खजुराचा मोठा सहभाग आहे.

काजू

काजू पाहिले की, खावेसे वाटणारी चीज आहे, पण जरा जपून. काजू अत्यंत उष्ण आहेत. ज्यांना लघवीचा त्रास आहे. लघवी कमी होते, अडखळत होते, मूतखडा आहे, लघवीला जोर करावा लागतो, त्यांनी काजू खाऊ नये. शौचावाटे रक्त पडणे, अंगावर चकंदळे उठणे, गांधी येणे, आम्लपित्त, अल्सर, पित्तामुळे पोटदुखी या विकारांत काजू वर्ज्य करावे. पित्तप्रकृतीच्या व्यक्तीकरिता काजू कुपथ्य आहे. फार काजू खाऊन होणाऱ्या त्रासावर डाळिंबाचा रस, खडीसाखर व मध हा उत्तम उतारा आहे.

उत्तम पाचक आसव

काजूचे फळ उत्तम पाचक आहे. त्याच्या रसाने भूक सुधारते. वारंवार होणारे जुलाब काजू थांबवतो. आमांशयात गुबारा धरत असेल तर काजूच्या फळाच्या रसाने तो कमी होतो. काजूच्या फळांपासून उत्तम पाचक आसव होते. काजूच्या ताज्या फळांचा रस कपड्यावर पडला तर डाग जात नाहीत, इतके पक्के डाग पडतात. स्मृतिनाश व मेंदू क्षीणतेवर काजू उपयुक्त आहेत. ताकद व वजन वाढणे याकरिता भरपूर व्यायाम व नियमितपणे काजू खाणे याचा उपयोग हिवाळ्यात करावा. त्वचेला बधिरपणा येणे, जळवात, चिखल्या याकरिता काजूतेलाचा प्रयोग सावधानपूर्वक करावा.
काजू वृष्य, वाजीकर, हृदय व नाडीला बळ देणारे फळ आहे. काजूत भरपूर प्रोटिन व बी-व्हिटॅमिन आहेत.