Breathing Exercises For Heart Health : शांत राहण्यासाठी दीर्घ श्वासोच्छ्वासाच्या (Deep Breathing) व्यायामाची शिफारस केली जाते. पण, ते हृदयविकाराच्या तीव्र झटक्यांसारख्या गंभीर घटनांना, विशेषत: रात्रीच्या वेळी प्रतिबंध घालण्यासदेखील मदत करू शकतात का? तर यावर होलिस्टिक वेलनेस कोच डॉक्टर मिकी मेहता यांनी हो असे उत्तर दिले. कारण झोपेच्या वेळी मृत्यूचा धोका जास्त प्रमाणात उद्भवू शकतो, कारण आपत्कालीन प्रतिसाद देताना अनेकदा खूप उशीर होतो. पण, ते टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तर त्यासाठी झोपायच्या आधी दीर्घ श्वास घेणे हा एक उपाय असू शकतो, असे डॉक्टर मिकी मेहता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने नोएडा एक्स्टेंशनच्या इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे वरिष्ठ सल्लागार आणि यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर कृष्ण यादव यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, हृदयाच्या स्नायूंमधील रक्तप्रवाहात जेव्हा अचानक अडथळे येतात तेव्हा प्लेक तयार झाल्यामुळे किंवा कोरोनरी धमन्या फुटल्यामुळे (rupture in the coronary arteries) हृदयविकाराचा झटका येतो.

झोपेमुळे सामान्यतः हृदयाचे ठोके कमी होतात आणि रक्तदाब कमी होतो. पण, तरीही काही घटकांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते, अगदी विश्रांतीच्या वेळीही. काही व्यक्तींसाठी, अरिथमिया (arrhythmia) एरिथमिया म्हणजे हृदयाचे अनियमित ठोके; तर यावर उपचार न केलेले उच्च रक्तदाब किंवा अंतर्निहित हृदयाच्या समस्यांमुळे रात्रीचा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. याव्यतिरिक्त स्लीप एपनियासारख्या परिस्थिती – जिथे श्वासोच्छ्वास क्षणोक्षणी थांबतो आणि ऑक्सिजनची पातळी राखण्यासाठी हृदयाच्या अतिरिक्त ताणामुळे लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

झोपेत हृदयविकाराचा झटका येण्याचा सर्वाधिक धोका कोणाला असतो?

काही लोकांना झोपेत असताना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आरोग्य परिस्थिती आणि जीवनशैलीच्या कारणांमुळे उद्भवू शकते, असे डॉक्टर यादव म्हणाले.

झोपेत हृदयविकाराचा झटका येण्याचा सर्वाधिक धोका पुढील मंडळींना जास्त असतो…

१. हृदयविकाराबाबतीत पूर्वीपासून असलेल्या समस्या किंवा एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आधी येऊन गेला असेल.
२. ज्यांना उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह असतो.
३. ज्यांच्या जीवनशैलीत धूम्रपान, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव यांसारख्या घटकांचा समावेश आहे.
४. स्लीप एपनिया असलेल्या व्यक्ती. स्लीप एपनिया म्हणजे झोपेमध्ये व्यत्यय येणे, हृदयावरील ताण वाढवणे, श्वसनक्रियेत अडथळा येऊन श्वास थांबणे, मेंदू सतर्क होऊन आपल्याला जागं करतो आणि श्वासोच्छ्वास पुन्हा सुरू होतो. पण, यामुळे शांत झोप लागत नाही.
५. खूप जास्त तणाव अनुभवणारे लोक किंवा ज्यांना हृदयविकाराच्या घटनांचा कौटुंबिक इतिहास आहे.

तर झोपण्यापूर्वी दीर्घ श्वास घेतल्याने हृदयविकाराचा (Deep Breathing) धोका कमी होऊ शकतो का?

दीर्घ श्वासोच्छ्वास (Deep Breathing) पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करते, ज्यामुळे ताण प्रेरित रक्तदाब वाढण्यास मदत होते (stress-induced blood pressure spikes). पण , खोल श्वासोच्छ्वासामुळे हृदयाच्या आरोग्यास फायदा होत असला तरी विशेषत: जास्त जोखीम असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका स्वतःच रोखणे हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही.

डॉक्टर यादव यांच्या मते, हृदयविकाराचा झटका रोखण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन आवश्यक आहे, ज्यामध्ये नियमित वैद्यकीय तपासणी, निर्धारित औषधोपचार, निरोगी जीवनशैली, हृदयाच्या स्थितीचे व्यवस्थापन यांचा समावेश होतो; तर दीर्घ श्वासोच्छ्वास (Deep Breathing) या प्रयत्नांना समर्थन देऊ शकतात, पण त्यांची जागा घेऊ शकत नाही.

दृदयाची काळजी घेण्यामध्ये दीर्घ श्वास घेणे (Deep Breathing) समाविष्ट करण्याबरोबर पुढील गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत…

१. नियमित आरोग्य निरीक्षण : रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी यांचा मागोवा ठेवणे.

२. निरोगी आहार : सॅच्युरेटेड फॅट कमी, फायबर जास्त आणि फळे व भाज्यांचा भरपूर आहार घ्या.

३. नियमित व्यायाम करा : शारीरिक हालचालींमुळे हृदय मजबूत होते आणि रक्त प्रवाह सुधारतो.

४. तणाव व्यवस्थापित करा : दीर्घ श्वासोच्छ्वासाव्यतिरिक्त (Deep Breathing) , ध्यान आणि योगामुळे तणाव कमी होतो.

५. धूम्रपान टाळा आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा : हृदयविकारासाठी हे मुख्य घटक आहेत.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deep breathing before bed lower heart attack risk and who is most at risk of a heart attack in their sleep read what expert said asp