दीपिका पदुकोण हे नाव आज बॉलिवूडमधील सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींमध्ये आघाडीवर आहे. केवळ बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूडमध्येही दीपिकाची क्रेझ पाहायला मिळते. तिने आजवर अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पण तुम्हाला सर्वांना आठवत असेल की, काही काळापूर्वी दीपिका पदुकोण नैराश्याशी झुंज देत होती. आधी तिने ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली, पण नंतर तिने नैराश्याविरोधात झुंज देत असल्याचे उघडपणे सांगितले. अशात दीपिकाच्या नैराश्याच्या समस्येबद्दल आता तिचा पती रणवीर सिंगने एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शेअर केली आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग पहिल्यांदाच कॉफी विथ करण शोमध्ये एकत्र दिसले. लग्नानंतर दोघांचा हा पहिला इंटरव्ह्यू होता. या शोदरम्यान दीपिका आणि रणवीर दोघांनीही दीपिकाच्या नैराश्याविरोधातील लढाईबाबत उघडपणे बोलले. याच विषयाला धरून इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील सल्लागार आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शौनक अजिंक्य यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपिकाने सांगितले की, रणवीर सिंगने तिला नैराश्यावर मात करण्यास कशी मदत केली. यावर ती म्हणाली की, एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराला नैराश्यावर मात करण्यास कशी मदत करू शकते हे रणवीरने सिद्ध केले. मुलाखतीदरम्यान दोघांनीही दीपिकाच्या नैराश्याबद्दल बरेच काही शेअर केले. या लेखात आम्ही तुम्हाला डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून नैराश्याचा सामना करणाऱ्या जोडीदाराला या आजारातून बाहेर काढण्यासाठी कशी मदत केली पाहिजे, याविषयी सांगणार आहोत.

अभिनेता रणवीर सिंगने पत्नी दीपिकाच्या मानसिक आरोग्याविषयी उघड केले की, तिच्या अशा परिस्थितीमुळे त्याला एक जोडीदार म्हणून खूप असहाय्य वाटले होते. यावेळी जाणवणाऱ्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना कसे सामोरे जायचे हे तिला समजत नव्हते. पण, कालांतराने त्याला कळले की, तिची कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.

पण, कुटुंबात एखादा व्यक्ती किंवा आपला जोडीदार नैराश्याचा सामना करत आहे हे ओळखणे खूप आव्हानात्मक असते. कारण प्रत्येक व्यक्तीनुसार लक्षणे बदलू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नैराश्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर किती खोलवर परिणाम झाला हे ओळखणेदेखील खूप अवघड असते.

पण, काही सामान्य लक्षणे आणि वर्तनातील बदल पाहून आपण एखादा व्यक्ती नैराश्याचा सामना करत असल्याचे ओळखू शकतो. अशावेळी त्या व्यक्तीला समजून घेणे फार महत्वाचे आहे. यावर डॉ. शौनक अजिंक्य यांनी नैराश्यग्रस्त व्यक्तीमध्ये दिसणारी लक्षणे सूचीबद्ध करत सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीमध्ये किमान दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ दररोज खालीलपैकी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणे दिसत असतील, तर तो/ती नैराश्याची बळी ठरल्याची शक्यता असते. अशावेळी कुटुंबातील व्यक्तींनी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

नैराश्यग्रस्त व्यक्तीमध्ये दिसतात ‘ही’ लक्षणे

१) व्यक्तीला दीर्घकाळापर्यंत सतत दुःखी, असहाय्य किंवा निराशाजनक वाटते.

२) व्यक्तीला पूर्वी आवडत असलेल्या गोष्टींमध्ये आता रस राहत नाही, ते लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, कोणाशी जास्त बोलत नाहीत.

३) नैराश्यामुळे निद्रानाश किंवा जास्त झोप येऊ शकते. व्यक्तीच्या झोपेच्या सवयींमधील महत्त्वपूर्ण बदलांकडे लक्ष द्या. एक तर झोप लागण्यात अडचण येणे, रात्री वारंवार जाग येणे किंवा सकाळी लवकर जाग येणे आणि नंतर पुन्हा झोप न लागणे.

४) खूप जास्त भूक लागते किंवा भूक लागत नाही, ज्यामुळे अचानक वजन कमी होते किंवा वजन वाढते.

५) सतत थकवा, निरुत्साहीपणा आणि शरीरात प्राण नसल्याची भावना येते.

६) चिडचिडेपणा वाढणे, मूड बदलणे, खूप जास्त राग येणे.

७) लक्ष केंद्रित करण्यात, निर्णय घेण्यात किंवा गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण येणे.

८) अस्पष्ट वेदना, डोकेदुखी किंवा पचन समस्या निर्माण होणे.

९) अपराधीपणाची भावना, आत्मसन्मान कमी झाल्याची भावना किंवा अपुरेपणाची भावना जाणवू शकते. यात सतत आत्महत्येचा विचार येणे.

नैराश्यग्रस्त व्यक्तीची जोडीदाराने कशी काळजी घेतली पाहिजे?

दीपिका पदुकोण म्हटल्याप्रमाणे, नैराश्याचा सामना करणाऱ्या व्यक्तीसाठी सुरक्षित स्पेस तयार करणे फार कठीण असते. यात पीडिताला त्याच्या भावना आणि अनुभवांबद्दल उघडपणे बोलता आले पाहिजे. यावर डॉ. अजिंक्य सांगतात की, संबंधित व्यक्तीला समजून घेताना मला, माझ्या या शब्दाचा वापर करा. जसे की, मी पाहिले की, तू अलीकडे खूप चिंतेत, हताश झाल्यासारखी दिसतेस किंवा मला तुझ्याबद्दल खूप काळजी वाटते. यावेळी व्यक्ती मोकळेपणाने बोलू शकते. पण, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न न करता तुम्ही फक्त ऐकून घ्या.

लक्षात ठेवा की, नैराश्यग्रस्त जोडीदार किंवा कुटुंबात नैराश्याचा सामना करणाऱ्या व्यक्तीला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाणे ही एक जबाबदारीची गोष्ट असते. यावेळी त्यांना वाईट निर्णय घेण्यापासून दूर ठेवा आणि सतत त्यांच्याशी याच विषयी बोलणे टाळा. कारण नैराश्य ही एक अशी वैद्यकीय स्थिती आहे, ज्यात अनेकदा व्यक्तीला काही केले तरी बरे वाटत नाही.

नैराश्यग्रस्त व्यक्ती सतत एकाकी राहिल्यास त्याला अधिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्याची काळजी घेणारा व्यक्ती त्याच्याबरोबर जास्त वेळ असायला हवा. यावेळी काळजी घेणाऱ्या व्यक्तीने आधी स्वत:ला नैराश्याबद्दल शिक्षित केले पाहिजे आणि त्यांच्या प्रिय व्यक्तीला काय होत आहे हे चांगल्याप्रकारे समजून घेतले पाहिजे. यावेळी त्यांना विविध व्यसनापासून दूर ठेवले पाहिजे.

यावेळी संतुलित आहार, शारीरिक हालचाली आणि जीवनशैलीत सुधारणा केली पाहिजे. या परिस्थितीत जर नैराश्यग्रस्त व्यक्तीने स्वत:च्या जीवाचे काही बरे-वाईट करून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला एकटे सोडू नका, असेही डॉ. अजिंक्य सांगतात.

परंतु, सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैराश्यग्रस्त व्यक्तीची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने आधी स्वत:चीही काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अशा प्रकारच्या व्यक्तींची काळजी घेताना भावनिकदृष्ट्या तुम्ही कुठेतरी खचत असता. अशावेळी तुम्हीही समुपदेशन घेण्यास संकोच करू नका, कोणत्याही व्यक्तीची काळजी घेताना राग आणि निराशा ही स्थिती येत असते, म्हणून स्वतःबद्दल दयाळूपणाची भावना ठेवा, असेही डॉ. अजिंक्य सांगतात.

नैराश्यग्रस्त व्यक्तीवर कशा पद्धतीने उपचार केले जातात?

यावर अनेक अँटीडिप्रेसंट औषधे उपलब्ध आहेत. पण, जोडीदाराबरोबर संयुक्त समुपदेशन करत लक्षणे जाणून घेत त्यावर उपाय करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. यासाठी सध्या कपल्स थेरपी घेतली जात आहे. यात संबंधित व्यक्तीला त्याच्या जोडीदाराबरोबर असलेले मतभेद, संघर्ष सोडवण्यात मदत होत आहे. या थेरपीमुळे व्यक्तीला त्याच्या जीवनावर नियंत्रण ठेवण्यातही मदत होत आहे, ज्यामुळे तो त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करू शकतो. तसेच अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करू शकत आहे आणि चांगल्या दर्जाच्या जीवनाचा आनंद घेऊ शकत आहे, असेही डॉ. अजिंक्य सांगतात.

नैराश्य ही एक वैद्यकीय स्थिती आहे, ज्यावर प्रभावी उपचारांसाठी तुम्हाला योग्य आरोग्यतज्ज्ञांच्या मदतीची आवश्यकता असते. पण, अशा परिस्थितीत नैराश्यग्रस्त जोडीदाराला समजून घेत त्याला पाठिंबा दिल्यास त्याने ही अर्धी लढाई जिंकली असे म्हणू शकता.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika ranveer speak mental health deepika padukone and ranveer singh big reveal on dealing with mental health together on koffee with karan has a lesson on care giving sjr
Show comments