सध्या अनेक राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. सातत्याने या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून डॉक्टरांच्या औषधाबरोबर काहीजण घरगुती उपाय करतात. यात विशेषत: डेंग्यू आणि इतर कोणत्याही आजारात शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास पपई आणि गुळवेलीचा रस देणे फायदेशीर मानले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकांचा विश्वास आहे की, पपई आणि गुळवेलीच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातील प्लेटलेट्सची संख्या लक्षणीयरित्या वाढू शकते. पण, या दाव्याला काही वैज्ञानिक पुरावा आहे का? यावर फरिदाबादमधील मेट्रो हॉस्पिटलच्या एचओडी आणि डायटेटिक्स डॉ. राशी तांत्या यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात म्हणजे नेमकं काय होतं?

प्लेटलेट्स हे रक्तातील लहान पेशींचे तुकडे असतात, जे रक्त गोठण्यास आणि जास्त रक्तस्त्राव रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या सामान्य पातळीपेक्षा कमी होते, तेव्हा थ्रोम्बोसाइटोपेनिया नावाची स्थिती निर्माण होते. ज्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. यामुळे आधी थ्रोम्बोसाइटोपेनियाचे मूळ कारण शोधणे आणि योग्य वैद्यकीय उपचार देणे महत्त्वाचे आहे.

प्लेटलेट्सची सामान्य संख्या १,५०,००० ते ४,५०,००० प्रति मायक्रोलिटर रक्ताच्या दरम्यान असते. डेंग्यू तापामध्ये, प्लेटलेट्सची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. काहीवेळा 1,00,000 किंवा अगदी 50,000 प्लेटलेट्स प्रति मायक्रोलिटर रक्ताच्या खाली येते. डेंग्यू आजारात प्लेटलेट्सची संख्या पटकन कमी होते. डेंग्यूच्या बाबतीत, रुग्णांना तीव्र ताप, उलट्या, मळमळ, यांसारखी गंभीर लक्षणे जाणवतात.

पहिल्या चार दिवसांत शरीर दुखणे आणि त्वचेवर पुरळ येणे ही लक्षणे दिसतात. पण, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी रक्तातील प्लेटलेट्स घसरण्यास सुरुवात होते; तर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या दिवशी या संख्येत लक्षणीय घट होते. संसर्ग कमी झाल्यावर सातव्या दिवसापासून पातळी वाढू लागते. पण, जर स्थिती गंभीर असेल तर प्लेटलेट्सची गरज लागते.

पपईच्या रसाच्या सेवनाने प्लेटलेट्सची संख्या वाढते, याचा कोणता वैज्ञानिक पुरावा आहे का?

पपई फळ आणि त्याच्या रसाचे सेवन अनेकदा प्लेटलेट्सची संख्या वाढविण्यासाठी एक नैसर्गिक उपाय म्हणून सांगितला जातो. पपईतील पॅपेन नावाचा एन्झाइम घटक हा प्लेटलेट्सच्या निर्मितीमध्ये मदत करतो असे मानले जाते. पण, या दाव्याचे समर्थन करण्यासाठी ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत.

पपई हे एक पौष्टिक फळ आहे आणि एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण, पपईचा रस सेवन करणे आणि प्लेटलेट्सची संख्या वाढवणे यात थेट संबंध नाही. प्राण्यांच्या रक्तातील प्लेटलेट्सच्या संख्येत वाढ झाल्याचे अभ्यास आहेत; परंतु हे निष्कर्ष अद्याप मानवी चाचण्यांमध्ये प्रमाणित केले गेले नाहीत. शिवाय झालेले अभ्यास व्यापक स्वरूपात नाहीत.

गुळवेलीचे सेवन तुमच्या यकृतासाठी घातक

गुळवेल ही अमृताची वेल म्हणूनही ओळखली जाते. ही एक औषधी वनस्पती आहे, जी सामान्यतः पारंपरिक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाते. रोग प्रतिकारशक्ती वाढवणे आणि तापासारख्या लक्षणांमध्ये तिचा औषध म्हणून वापर केला जातो. शिवाय विविध आजारांवरही ती फायदेशीर मानली जाते. पण, गुळवेलीमुळे प्लेटलेट्सची संख्या लक्षणीयरित्या वाढवू शकते या दाव्याला पुष्टी देण्यासाठीही मर्यादित वैज्ञानिक संशोधन झाले आहे. गुळवेलीवर झालेले अभ्यास प्रामुख्याने त्याच्या इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्मांवर आणि विशिष्ट रोगांवर उपचार करण्याच्या संभाव्यतेवर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी गुळवेलीचा वापर केल्यास अपेक्षित परिणाम मिळू शकत नाहीत.

बीएमसी कॉम्प्लिमेंटरी मेडिसीन अँड थेरपीजमध्ये प्रकाशित झालेल्या २०२१ च्या अभ्यासानुसार, गुळवेलीच्या अनिश्चित वापरामुळे रुग्णांमध्ये यकृताचे नुकसान होऊ शकते असे नमूद करण्यात आले आहे. यात आधीच यकृताच्या आजाराने पीडित असलेल्या रुग्णाने गुळवेलीचे सेवन टाळणेच योग्य आहे.

रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास काय करावे?

थ्रोम्बोसाइटोपेनियाची अनेक कारणे असू शकतात. जसे की व्हायरल इन्फेक्शन, औषधे किंवा इतर वैद्यकीय परिस्थिती. प्लेटलेट्सची संख्या व्यवस्थापित करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी मूळ कारणांवर उपचार करणे आणि योग्य वैद्यकीय उपचार घेणे महत्वाचे आहे.

गंभीर थ्रोम्बोसाइटोपेनिया किंवा प्लेटलेट्सची संख्या गंभीरपणे कमी झाल्यास, त्या पुन्हा वाढवण्यासाठी वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असू शकते. रुग्णाच्या आरोग्य स्थितीचे सखोल निदान आणि मूल्यांकन केल्यानंतरच प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्याने प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उपचार केले जातात.

डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय पूर्णपणे घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय करणे धोकादायक ठरू शकते. कारण एखाद्या आजारामुळे प्लेटलेट्सची संख्या लक्षणीयरित्या घटली, तर त्यावर डॉक्टरही काही करू शकत नाहीत.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue alert why papaya juice and giloy cannot help increase platelets what doctors said read sjr
Show comments