Dengue Cases in India Are on the Rise : भारतात दरवर्षी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशाच्या बहुतेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे जुलै व सप्टेंबर महिन्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येते.
नॅशनल सेंटर फॉर व्हेक्टर बोर्न डिसीजेस कंट्रोल (National Centre for Vector Borne Diseases Control)ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनानंतरच्या काळात डेंग्यूच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे.
या वर्षी भारतात जवळपास १९,४४७ डेंग्यूची प्रकरणे समोर आली आहेत. सरकारी आकडेवारीनुसार कर्नाटक, दिल्ली, केरळ, सिक्कीम व हरियाणा यांसारख्या राज्यांमध्ये दरवर्षी डेंग्यूची अनेक प्रकरणे दिसून येतात. आता महाराष्ट्रातील पुणे, नागपूर यांसारख्या शहरांतसुद्धा डेंग्यूने थैमान घातले आहे.

भारतात दिवसेंदिवस डेंग्यूची प्रकरणे का वाढत आहेत? डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी का कमी होत नाही? त्यामागील कारणे, लक्षणे आणि उपाय याविषयी राज्याचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’ला सविस्तर माहिती दिली.

contract teachers, agitation ,
कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या निर्णयावर टीकेची झोड, निर्णय रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Loksatta anvyarth Bombay High Court decision Ganesha idol Immersion Ganeshotsav
अन्वयार्थ: राज्य कायद्याचे की अस्मिताकारणाचे?
Assam Muslim Marriage
Assam Muslim Marriage : मुस्लिमांना आता विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी अनिवार्य; आसाम सरकारचा मोठा निर्णय
supreme court on governor marathi news
चतुःसूत्र: राज्यपाल न्यायिक पुनरावलोकनाच्या कक्षेत
icra predict growth rate to slow to 6 percent in the first quarter in
पहिल्या तिमाहीत विकास दराच्या ६ टक्क्यांच्या नीचांकांचा ‘इक्रा’चा अंदाज
Supreme Court Verdict On Mining Tax
अग्रलेख : पूर्वलक्ष्यी पंचाईत!
High Court, slum, High Court on slum,
झोपडीधारकांच्या दुर्दशेबाबत उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता, काय म्हणाले?

दिवसेंदिवस डेंग्यूची प्रकरणे का वाढत आहेत?

डॉ. प्रदीप आवटे : वाढते शहरीकरण आणि हवामानातील बदल या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एडिस हा असा डास आहे की, त्या डासाला वाढण्यासाठी शहरीकरणामुळे पोषक वातावरण मिळते. उदा. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य आहे.

शहरातील लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही झोपडपट्ट्यांमध्ये राहते. तेथे पाणीपुरवठा, सांडपाण्याचा निचरा आदी सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात अडचणी येतात. पाणीपुरवठा कमी असल्यामुळे पाणी साठवून ठेवण्याची गरज भासणे, खूप मोठ्या प्रमाणावर विल्हेवाट करण्याजोग्या वस्तूंचा वापर करणे इत्यादी गोष्टी डास वाढण्यास कारणीभूत असतात. पाण्याच्या बाटल्या असो किंवा चहाचे कप असो, ते एकदा वापरले की, आपण फेकून देतो. पण, अशा वस्तूंमध्ये जेव्हा पावसाचे पाणी साचते, तेव्हा एडिस डास वाढतो. शहरात खराब झालेले टायर कुठेही पडलेले असतात, त्या टायरमध्ये पावसाळ्यात पाणी साठते आणि त्यातसुद्धा डासांची उत्पत्ती होते.

शहरात बांधकामे किंवा विकासकामे सुरू असतात तेव्हा जे रस्ते खोदलेले असतात, त्यात पावसाळ्यात पाणी साठते आणि मग तेथे डास वाढतात. एडिस हा स्वच्छ पाण्यामध्ये वाढणारा डास आहे. जसा पाऊस सुरू होतो, तसे सगळीकडे पाणी साठत जाते आणि एडिस डासांची उत्पत्ती होत राहते.

मागील काही काळामध्ये मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे. पूर्वी पाऊस थोडा थोडा पडायचा. आता महिनाभराचा पाऊस एकदोन दिवसांमध्येच पडून जातो. तुम्ही जर लक्षात घेतले, तर तुमच्या लक्षात येईल की, नागपूरमध्ये दोन दिवसांमध्ये २२७ मिलिमीटर पाऊस पडला. म्हणजे पूर्ण महिन्याचा पाऊस दोन दिवसांतच पडला. पूर्वी तसे नव्हते. असा एकत्रित पाऊस पडला, तर डासांना अंडी निर्माण करण्यासाठी आवश्यक उष्णतासुद्धा मिळते.
जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. अंड्यांपासून डास तयार होण्यासाठी २८ दिवसांचा काळ लागायचा; पण जागतिक तापमानवाढीमुळे फक्त २१ दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे डेंग्यूची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : गरीब लोकांच्या तुलनेत श्रीमंत लोकांना कॅन्सर होण्याचा धोका अधिक का? डॉक्टरांनी सांगितली कारणं….

लोकसहभाग का महत्त्वाचा?

डॉ. प्रदीप आवटे : आरोग्य यंत्रणेबरोबर लोकसहभागही खूप महत्त्वाचा आहे. लोकांना हे कळले पाहिजे की, डेंग्यू हा आजार कसा पसरतो? घराच्या परिसरात हे डास वाढू नयेत म्हणून आपली काय जबाबदारी आहे, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. कारण- शासकीय यंत्रणेला प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नाही. उदा. सोसायटीच्या इमारतीवर पाण्याचा टँक आहे आणि त्याचे झाकण लावले नाही, तरी एडिस डास वाढू शकतात. जेव्हा तुम्ही पाणी साठवता तेव्हा ते झाकले पाहिजे; अन्यथा डासांना अंडी घालायला आणि त्यांची संख्यावाढीला पोषक वातावरण मिळते.

डेंग्यूची लक्षणे कशी ओळखावीत?

डॉ. प्रदीप आवटे : डेंग्यूची प्राथमिक लक्षणे खालीलप्रमाणे-

  • खूप तीव्र ताप
  • अंगदुखी
  • तीव्र डोकेदुखी
  • कधी कधी शरीरावर लालसर चट्टे पडणे.
  • गंभीर प्रकरणात, काही वेळा उलटी होणे, पोटदुखी व मळमळ वाटणे

ही लक्षणे व्हायरल फ्लूसारखी असतात. डेंग्यूच्या निदानासाठी आवश्यक चाचणीची गरज असते. पहिल्या पाच दिवसांत चाचणी करायची असेल, तर एनएस१ चाचणी करू शकता. त्यानंतरच्या काळामध्ये शरीरात आयजीएम अँटीबॉडिज (IgM antibodies) तयार होतात, मग आयजीएम चाचणीसुद्धा करता येते. त्यामुळे प्रयोगशाळेच्या चाचणीतूनसुद्धा डेंग्यू ओळखता येतो. जेव्हा रक्तस्रावी ताप येतो, तेव्हा रुग्णाची अवस्था गंभीर होत जाते.

डेंग्यूवर कशा पद्धतीने उपचार करावेत यासंबंधीचे प्रशिक्षण डॉक्टरांना पावसाळ्यापूर्वी दिले जाते. त्यात कोणता रुग्ण सौम्य स्वरूपाचा आणि कोणता गंभीर स्वरूपाचा आहे हे कसे ओळखायचे याविषयीची माहिती दिली जाते आणि आता त्याचा फायदा दिसून येत आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढताहेत; पण डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण तुलनेने कमी होत आहे.

डेंग्यूची लस कधी येणार?

डॉ. प्रदीप आवटे : डेंग्यूच्या लसीवर सध्या चाचणी सुरू आहे. लस जोपर्यंत पूर्णपणे तयार होत नाही, तोपर्यंत आपण ती लस वापरू शकत नाही. कोरोना काळात आपण खूप वेगात लस आणली; पण त्या वेळची गरज वेगळी होती. सर्वसामान्य परिस्थितीमध्ये एखादी लस विकसित होण्यासाठी ५ ते १२ वर्षांचा कालावधी लागू शकतो.

डेंग्यू हा विषाणूमुळे होणारा आजार आहे; पण डेंग्यूचा एकच नव्हे, तर चार विषाणू आहेत. त्यांना आपण डेन १, डेन २, डेन ३ व डेन ४, असे म्हणतो. वेगवेगळ्या भागामध्ये डेंग्यूचे वेगवेगळे विषाणू सापडतात. या सर्वांचा विचार करून आणि तांत्रिक चुका टाळून आपण लस वापरू शकतो आणि त्यावर सध्या अभ्यास सुरू आहे. आता ही लस अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे येत्या दोन वर्षांत डेंग्यूची लस आपल्या हाती येऊ शकते.

येणारी प्रत्येक लस ही १०० टक्के गुणकारी असते, असे नाही. परंतु, ही लस काही टक्के गुणकारी असू शकते. त्यामुळे लस ही पूर्णपणे एखाद्या आजाराचे उत्तर असते, असे नाही.

डेंग्यूचा आजार कसा रोखता येईल?

डॉ. प्रदीप आवटे : एखाद्या शहराचा चांगल्या पद्धतीने विकास करणे, लोकांना परवडणारी घरे उपलब्ध असणे, सांडपाण्याचा निचरा, योग्य त्या प्रमाणात पाणीपुरवठा या प्रकारच्या सुविधा असणे महत्त्वाचे आहे. डेंग्यूचा जो एडिस डास आहे, त्याच्या वाढीकरीता जी खास ठिकाणे आहेत, ती कशी कमी करता येतील, यावर उपाय करणेसुद्धा गरजेचे आहे.

डेंग्यूच्या प्रतिबंधामध्ये लोकांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा घटक आहे. एडिस हा दिवसा चावणारा डास आहे; तो रात्री चावत नाही. त्यामुळे डेंग्यूचा डास हा स्वाभाविकपणे फक्त घरच नव्हे, तर तुम्ही जिथे नोकरी वा व्यवसाय करता किंवा तुमचे कामाचे ठिकाण अशा ठिकाणी तुम्हाला चावू शकतो. थोडक्यात, तुमचे फक्त घरच नव्हे, तर तुम्ही जिथे काम करता, ते ठिकाणसुद्धा डासमुक्त असणे आवश्यक आहे.

दिल्ली हे देशातील एक मोठे शहर आहे. तिथे दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांची वाढ दिसून येते. दोन वर्षांपूर्वी तिथे सरकारने ‘१० आठवडे, १० वाजता, १० मिनिटे’ अशी एक मोहीम राबवली होती.
१० आठवडे म्हणजे जुलै, ऑगस्ट व पुढील दोन आठवडे, १० वाजता दिल्लीतील लोक ज्या ठिकाणी काम करायचे, तिथे फक्त १० मिनिटे वेळ काढायचे आणि डास उत्पादक जागा शोधून, त्या जागा स्वच्छ करायचे आणि जिथे डास दिसतील तिथे अळीनाशक वापरून अळ्या नष्ट करायचे.

डेंग्यू रोखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर कोणती पूर्व काळजी घ्यावी?

डॉ. प्रदीप आवटे : पावसाळ्यात पूर्ण अंगभर कपडे घाला. डेंग्यूची गंभीर लक्षणे मुख्यत्वे १५ वर्षांखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. लहान मुलांसाठी दिवसा झोपतानासुद्धा पूर्ण पलंग आच्छादणारी मच्छरदाणी (बेडनेट) वापरले पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी साठवावे लागते, तिथे एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि त्यात नवीन ताजे पाणी भरा. मनाप्रमाणे औषधे घेऊ नका. अॅस्पिरिनसारखी औषधी घेतल्यास साधा डेंग्यू हा रक्तस्रावी डेंग्यूमध्ये परावर्तित होऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या. ९० टक्के डेंग्यूचे रुग्ण हे सौम्य स्वरूपाचे असतात. साधी विश्रांती, तापावरचे औषध, भरपूर पाणी वा नारळ पाण्याचे सेवन अशा प्रकारे काळजी घेतल्यामुळे ९० टक्के रुग्ण बरे होतात. अगदी १० टक्के रुग्णांना डॉक्टरांकडे जाणे आणि एक ते दोन टक्के रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडू शकते.