पावसाबरोबर अनेक आजारांनी भयानक रूप धारण केले आहे. या आजारांचे नवनवीन व्हेरियंटस् समोर येत आहेत. एकीकडे लोक फ्ल्यूमुळे हैराण झाले आहेत; तर दुसरीकडे डेंग्यूनेही भयंकर रूप धारण केले आहे. यात विशेषत: दिल्लीसह ११ राज्यांमध्ये डेंग्यूचा DENV-2 हा नवा व्हेरियंट वेगाने पसरत आहे. हा व्हेरियंट अत्यंत घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या व्हेरियंटमुळे आता डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. त्यामुळे दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिन, सीनियर कन्सल्टंट डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी या व्हेरियंटची नेमकी लक्षणे काय आहेत आणि त्यावर कोणत्या उपचारपद्धती आहेत याची माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली आहे. डेंग्यूचा DENV-2 व्हेरियंट नेमका कसा आहे, त्याची लक्षणे काय आणि उपचारपद्धती कशी आहे ते जाणून घेऊ ….
दरवर्षी भारतात डेंग्यूच्या DENV-2 व्हेरियंटचे अनेक रुग्ण आढळून येतात. हा घातक व्हेरियंट असला तरी तुम्ही पावसाळ्यात विशेष काळजी घेऊन, त्यापासून दूर राहू शकता. या व्हेरियंटची लक्षणे काही प्रमाणात डेंग्यूच्या इतर सर्व व्हेरियंटसारखीच असतात. पण, या लक्षणांवरून वेळीच निदान आणि उपचार न केल्यास रुग्णांना शॉक आणि अंतर्गत रक्तस्राव होण्याची अधिक शक्यता असते. काही वर्षांच्या तुलनेत यंदा बाधितांची संख्या मोठी नसली तरी अनेक रुग्णांच्या प्लेटलेट्समध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसत आहे.
डेंग्यूच्या DENV-2 व्हेरियंटची लक्षणे
डेंग्यूच्या DENV-2 व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णाला अचानक खूप ताप येतो; जो कायम राहतो. तसेच मळमळ, डोळ्यांना वेदना, अत्यंत थकवा, अंगदुखी, ओटीपोटात दुखणे व पुरळ उठणे, उलटीसह रक्त पडणे ही लक्षणे दिसू लागतात. पहिल्या टप्प्यात रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्समध्ये मोठी घट होत नाही; पण पांढऱ्या रक्तपेशींमध्ये घट होऊ शकते. त्यात अनेकदा तापाचे निदान होत नाही; पण यकृत दुखणे, उलट्या होणे, रक्तस्राव, लघवी कमी होणे व रक्तदाब कमी होणे या लक्षणांवरून तुम्ही आजाराची स्थिती समजू शकता. लॅब टेस्टमध्ये लाल रक्तपेशींमध्ये वाढ आणि प्लेटलेट्समध्ये झपाट्याने घट झाल्याचे दिसून येते. गंभीर स्थितीतील रुग्णाला अनेकदा द्रवपदार्थ गिळताना आणि श्वास घेताना खूप त्रास होतो. या परिस्थितीत गंभीर रक्तस्राव आणि अवयव निकामी होण्याचा धोका वाढतो.
रुग्णाने कोणत्या चाचण्या केल्या पाहिजेत?
डेंग्यू हा आजार डासांद्वारे पसरतो. त्याचा उष्मायन कालावधी दोन ते १४ दिवसांचा असतो. परंतु, सहसा चार ते सात दिवसांदरम्यान या आजाराची चिन्हे आणि लक्षणे दिसू लागतात. साधारणत: चार ते पाच दिवसांत ताप उतरल्यानंतर रुग्णाला बरे वाटते. पण, जर त्या कालावधीत रुग्णाने स्वतःला हायड्रेटेड ठेवले नाही तर चार दिवसांनंतर गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
डिहायड्रेशन हे अनेक आजारांचे मुख्य कारण आहे. म्हणून जर तुम्हाला हॉस्पिटलायझेशन टाळायचे असेल, तर दिवसातून तीन ते पाच लिटर पाणी प्या. पण ह्रदय, यकृत व मृत्रपिंडाशी संबंधित आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पाणी पिण्याचे प्रमाण निश्चित करावे.
पुरेशा हायड्रेशनने डेंग्यूवर नियंत्रण मिळवता येत असल्याने लवकर निदान होणे आवश्यक आहे. पण, जर तुम्हाला पावसाळ्यात खूप जास्त ताप आला, तर डेंग्यूची NS1 अँटीजेन चाचणी करून घ्या; जी संसर्गादरम्यान रक्तामध्ये स्रावलेल्या डेंग्यू विषाणूचे नॉन-स्ट्रक्चरल प्रोटीन NS1 शोधण्याचे काम करते. ही चाचणी पहिल्या ४८ तासांत केली जाऊ शकते. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांत आपल्याला आजाराचे त्वरित निदान होऊ शकते. त्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी रुग्णाने IgM अँटीबॉडी करून घ्यावी. त्याचबरोबर तुम्ही संपूर्ण ब्लड काउंटसाठी (CBC) टेस्ट करून घेतली पाहिजे; जी रोज किंवा एक दिवस सोडून प्लेटलेटस् लेव्हल तपासण्यासाठी करावी लागेल.
लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT) देखील करून घेणे फायद्याचे ठरू शकते. PCV (पॅक्ड सेल व्हॉल्युम); जो रक्ताचा चिकटपणा मोजण्याचे काम करतो. एकदा का रक्ताचा चिकटपणा वाढला की, प्लेटलेट्स कमी होऊ लागतात, हे लाल रक्तपेशींमधील वाढ किंवा डिहायड्रेशनचे लक्षण आहे.
बहुतेक वेळा रक्तातील प्लाझ्मा कमी होण्याचा धोका असतो; ज्यामुळे ओटीपोटात आणि फुप्फुसांमध्ये द्रव जमा होऊ शकतो. हा गंभीर डिहायड्रेशनचा परिणाम आहे आणि या टप्प्यावर आपल्याला रक्ताचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शरीराला शॉक होण्यापासून रोखण्यासाठी इंट्राव्हेनस द्रवपदार्थांची आवश्यकता असते.
डेंग्यूच्या DENV-2 वर उपचार
डेंग्यूवर कोणतीही विशिष्ट उपचारपद्धती नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त पॅरासिटामॉलचे सेवन करून दर सहा ते आठ तासांनी ताप कमी करता येतो. या स्थितीत तुम्हाला शरीराचे त्रासदायक दुखणे सहन करावे लागू शकते; परंतु वेदनाशामक किंवा नॉन-स्टिरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAIDS) घेतल्याने प्लेटलेट्स आणखी कमी होऊ शकतात आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत अँटिबायोटिक्सपासून दूर राहा. कारण- ते व्हायरसवर प्रभावी ठरत नाहीत. रक्तस्राव आणि कमी रक्तदाबासह तुमची प्लेटलेटसची पातळी 50,000/cu mm पर्यंत घसरली असल्यास रुग्णालयात जा. आपल्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली पॅरामीटर्सचे वैद्यकीय व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. प्लेटलेट्स रक्तस्रावासह 20,000/cu mm पेक्षा कमी होतात तेव्हाच प्लेटलेटस रक्तसंक्रमण होते; ज्यांची संख्या 20,000 ते 40 दरम्यान आहे.
महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही आजारात विश्रांती घेणे, पॅरासिटामॉल घेणे, भरपूर पाणी किंवा फळांचा रस घेणे, रक्त तपासणी करणे आणि तुम्हाला जाणवणाऱ्या लक्षणांबद्दल डॉक्टरांना माहिती देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही गंभीर स्थितीत जाण्यापासून स्वत:चे संरक्षण करू शकता. आतापर्यंत WHO नुसार, डेंग्यूवर काही देशांमध्ये एक लस (Dengvaxia) मंजूर झाली आहे आणि तिला परवाना देण्यात आला आहे. या लसीद्वारे केवळ यापूर्वी डेंग्यूचा संसर्ग झालेल्या लोकांनाच संरक्षित केले जाऊ शकते.