-डॉ. जान्हवी केदारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mental Health: मोठ्या कष्टाने डोळे उघडले. अवतीभोवती डॉक्टर, नर्स दिसत होते. शेजारी बसलेली बायको दिसली आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मी हॉस्पिटलमध्ये का आलो ते स्पष्ट आठवले. किती वाजले असतील आत्ता? मला इथे आणून किती दिवस झाले असतील? काय करून बसलो मी? कशी इच्छा झाली मला इतक्या सगळ्या गोळ्या खाण्याची? माझ्याच जिवावर मी उठलो? माझी बायको, मुले, आईवडील कोणाचाही विचार कसा नाही केला मी? वाटले सगळ्यांना हात जोडून सगळ्यांची क्षमा मागावी. पण असे वाटेपर्यंत पुन्हा डोळ्यांवर गुंगी आली आणि बहुधा मला झोप लागली.

आता मी चांगला जागा होतो. मनात विचारांची गर्दी होती. का आणि कसे या प्रश्नांची उत्तरे स्वतःशीच शोधत होतो. डॉक्टरांनाही सगळे सांगायचे होते. गेले कित्येक दिवस मन नुसते निराशेने झाकोळून गेले होते. कबड्डी खेळताना ‘कबड्डी, कबड्डी…’ असे श्वास रोखून धरत आपण म्हणत राहतो, समोरच्या खेळाडूंना चकवत राहतो आणि एका क्षणी आपला दम संपतो आणि समोरचा खेळाडू आपली पकड घेतो. तसेच काहीसे! आपला दम संपून गेलाय आणि आता परिस्थितीपुढे हार मानण्याशिवाय काही पर्याय नाही, अशी खात्री झाली होती माझी. कोविडमध्ये व्यवसायाचे झालेले नुकसान, घ्यावे लागलेले कर्ज, मुलाचे परदेशात शिक्षण करता यावे अशी इच्छा, तशातच मुलीचे ठरलेले लग्न, घरात आईचे आजारपण, त्याचा खर्च अशा अनेक गोष्टींमुळे काही सुचेनासे झाले होते. दिवसभर नुसता बसून राहायचो. कशातही रस वाटायचा नाही. काही काम करण्याची इच्छा व्हायची नाही. असे वाटायचे आपल्याला काही जमणार नाही. पुन्हा व्यवसायात कधीही यश मिळणार नाही. एकदा अपयशी असा शिक्का बसला, तो कायमचाच! आजतागायत माझ्यावर कर्ज घेण्याची वेळ आली नव्हती. आता पहिल्यांदाच घेतलेले कर्ज कसे फेडणार मी? समोर नुसता काळोख आहे असे वाटायचे!

डॉक्टरांशी बोलताना लक्षात आले, की परिस्थितीचे माझे मूल्यमापन किती अतिरेकी अवास्तव होते. कर्जही खूप मोठे नव्हते. वर्षानुवर्षे बचत करत आलो होतो. बायको नोकरी करीत होती. भावंडे, मित्रमंडळी यांचा भरपूर आधार होता. गुणी मुले होती. तरीही निराशेने घेरले, उदासपणा आला, पण कधी डॉक्टरकडे गेलो नाही. उपाय सुरू केले नाहीत.

२०१९ साली ७ लाख लोकांनी आत्महत्या केल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. त्यानंतर कोविड काळात ही संख्या कितीतरी पटींनी वाढली. ५८% टक्के आत्महत्या ५० वर्षांखालील व्यक्तींमध्ये होतात आणि तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत चाललेले दिसते. आत्महत्यांच्या २० पट आत्महत्येचे प्रयत्न केले जातात.

आत्महत्येचा प्रयत्न करण्याची विविध कारणे असतात. आनुवंशिकता म्हणजे घराण्यात कोणी आत्महत्या केल्याचा इतिहास असेल तर आत्महत्येचा धोका वाढतो. मानसिक विकार असेल तर आत्महत्येचे विचार आणि आत्महत्येचे प्रयत्न करण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, मेनिया, अतिचिंता अशा सगळ्या मनोविकारांमध्ये आत्महत्येचे विचार येऊ शकतात. उतावळेपण अंगी असेल तर, व्यसने असतील तर, borderline personality disorder सारखे स्वभावदोष, असे अनेक घटक आत्महत्येची शक्यता वाढवतात. कधी कधी गंभीर स्वरूपाचा शारीरिक आजार असेल. उदा. कॅन्सर, एड्स, जुना हृदयरोग, किडनीचा आजार अशा अनेक आजारांमध्ये रुग्णाला निराशा येऊन जीवनाचा कंटाळा येतो आणि आत्महत्या करावीशी वाटते. एकटी राहणारी व्यक्ती, विपरीत परिस्थितीत खूप काळ राहिलेली व्यक्ती, घरातील प्रतिकूल वातावरणात शारीरिक, लैंगिक शोषण, घरगुती हिंसाचार यांचे साक्षीदार व्हायला लागणे, अशा अनेकांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती दिसून येते.

आत्महत्या करणारा या जगात राहत नाही, पण त्याचे नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळी, सहकारी या सर्वांवर त्या घटनेचा खोल परिणाम होतो आणि तो दीर्घकाळ राहतो. आत्महत्या हे समस्येवरचे अंतिम उत्तर असू शकत नाही. आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर ‘जीव वाचला हे चांगले झाले’ असे बऱ्याच जणांना वाटते. जणू मनावर आलेले मळभ दूर होते, समोर सूर्यप्रकाश दिसू लागतो. खरे तर समस्या तशाच असतात, पण भावनांचा निचरा होऊन जातो. असेही लक्षात येते की आपल्याबरोबर आपले आप्त आहेत, आपल्याला कोणाचा तरी आधार आहे, आपण एकटे नाही. मनोविकाराचे निदान होऊन इलाज सुरू झाल्यावर आणखी बरे वाटते, उमेद निर्माण होते. तेव्हा केलेल्या समुपदेशनात डॉक्टर किंवा मानसोपचारतज्ज्ञ मनात आशा जागी ठेवण्यास मदत करतात, इतरांकडून भावनिक आधार शोधण्याची आवश्यकता सांगतात, परिस्थितीचे वास्तववादी मूल्यमापन कसे करायचे ते शिकवतात आणि या सगळ्यातून जगण्याची इच्छा पुन्हा एकदा नव्याने निर्माण होते.

आत्महत्येपासून परावृत्त करणारेही अनेक घटक आहेत. खूप वेळा कौटुंबिक जबाबदाऱ्यांची जाणीव होऊन माणूस आत्महत्येचा विचार मनात आला तरी त्यावर कृती करत नाही. ‘मुलांचे चेहरे डोळ्यांसमोर आले आणि हा विचार सोडून दिला,’ असे अनेक जण सांगतात. आपल्यासमोरील परिस्थितीचा सामना करण्याची योग्य पद्धत म्हणजे परिस्थिती जाणून घेणे, आपल्यासमोरील पर्यायांचा विचार करणे, योग्य पर्याय निवडून निर्णय घेऊन त्यावर कार्यवाही करणे, आवश्यक असल्यास सल्ला विचारणे, मदत घेणे इत्यादींनी समस्येला तोंड देणे शक्य होते. आपल्या आयुष्यात आपल्याला समाधान वाटत असेल, तर निराशा सहजी येत नाही. धार्मिक, आध्यात्मिक वृत्ती आपल्याला संकटाचा सामना करण्याचे बळ देते. गीता, ज्ञानेश्वरी, रामदासांचे मनाचे श्लोक, इतर संतांचे अभंग या सगळ्यांतून जीवनाचे तत्त्वज्ञान समजते आणि मन स्थिर आणि संतुलित व्हायला मदत होते. आपल्या आप्तेष्टांबरोबर आणि आपण मानसिक उपचार घेत असू तर मानसोपचारतज्ज्ञांबरोबर आपले सुदृढ नाते असेल तर तेही आपल्याभोवती संरक्षक कवच तयार करतात.

हे ही वाचा<< Health Special: ‘मुलांच्या मोबाइलचं व्यसन सोडवायला हवं का?’ त्याआधी हे नक्की वाचा

आत्महत्येचे विचार कोणाच्याही मनात येऊ शकतात. आपल्या मनात असे विचार येत असतील तर त्याबद्दल कोणाशी तरी बोलले पाहिजे आणि तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. आपला मित्र, शेजारी, सहकारी, नातेवाईक कोणीही असे विचार व्यक्त करीत असेल, तर ते नेहमीच गांभीर्याने घेतले पाहिजेत. कधीही चेष्टेवारी नेऊ नये. आपण दाखवलेली सक्रियता एखाद्याला योग्य उपचार मिळवून देऊन त्याचा प्राण वाचवण्यास साहाय्यभूत होऊ शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Depression suicidal prevention technique to stay happy all the time amazing story of survival will open your eyes svs
Show comments