ख्रिसमस सण आपल्याबरोबर अनेक उत्साहाचे क्षण घेऊन येत असतो. यावेळी अनेकांच्या घरात गोड मिठाई, केक, पेस्ट्री अशा पदार्थ्यांचा मनमुराद आस्वाद घेतला जातो. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये खाण्यापिण्यासह धमाल मस्ती सुरू असते. परंतु, यावेळी खाल्ले जाणारे काही पदार्थ मधुमेहाने पीडित व्यक्तींसाठी हानिकारक ठरू शकतात. ख्रिसमसमध्ये विशेषत: केक अनेकजण आवडीने खातात, पण या केकचा ५० ग्रॅम स्लाइस खाल्ल्यानंतर तो पचवण्यासाठी कितीवेळ चालावे लागेल, याचा कधी विचार केला आहे का? नाही ना… तसेच या काळात मधुमेहींनी कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे, याबाबतही लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती असते. अशा परिस्थितीत मॅक्स हेल्थकेअरच्या एंडोक्राइनोलॉजी आणि डायबेटिसचे अध्यक्ष डॉ. अंबरीश मिथल यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ख्रिसमस पार्टीत मधुमेहींनी काय काळजी घ्यावी, याविषयी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. अंबरीश मिथल यांच्या मते, ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त आयोजित पार्टीत विविध फ्लेवर्सचे केक, पेस्ट्री अनेकजण आवडीने खातात. यावेळी प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे महत्त्वाचे असले, तरी जर तुम्हाला मधुमेह किंवा प्रीडायबेटिस असेल तर विशेष सावधगिरी बाळगणेही तितकेच आवश्यक आहे. कारण मधुमेहाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी काहीजण वर्षभर कठोर मेहनत घेत असतात, पण ख्रिसमसच्या काही आठवड्यातच मधुमेहाचे प्रमाण पुन्हा वाढू लागते. अशाने तुमच्या आरोग्यावर परिणाम दिसू लागतात.

ख्रिसमस पार्टीदरम्यान मधुमेहाचे प्रमाण वाढू नये म्हणून काय काळजी घ्यावी?

ख्रिसमस पार्टीत तुम्ही ५० ग्रॅम केकचा तुकडा खाल्ल्यास तुमच्या शरीरातील कॅलरीचे प्रमाण १६० ते २०० ने वाढते. तसेच हाय कार्बोहायड्रेट्ससह, फॅट्स ३० ग्रॅमपेक्षा जास्तीने वाढतात. अशावेळी शरीरातील कॅलरीज बर्न करण्यासाठी तुम्हाला एक तासापेक्षा जास्त चालणे किंवा २० मिनिटे धावणे किंवा सायकल चालवणे आवश्यक आहे.

मधुमेहाचे रुग्ण गोड-धोड खाण्याचा आनंद घेऊ शकत नाहीत का?

ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये पार्टी आणि इतर कार्यक्रमांमुळे आपल्या दिनचर्येत बदल होतात. यात खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी आणि व्यायामाचा अभाव, यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. अशावेळी नियमित योग्य आहार, शारीरिक हालचाली आणि झोपेची वेळ निश्चित करणे आव्हानात्मक होऊ शकते. यात काही प्रमाणात होणारा चढ-उतार ठीक आहे. पण, हा चढ-उतार जास्त असेल तर त्रास होऊ शकतो. अशावेळी तु्म्ही डॉक्टरांना तुमच्या शरीरात रक्तातील साखरेचे योग्य प्रमाण कितपर्यंत असले पाहिजे हे विचारा.

यातील एक महत्त्वाचा भाग असा आहे की, जरी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी थोड्या काळासाठी का होईना वाढली तरी जेवणानंतर हे प्रमाण 200mg/dl च्या खाली आले पाहिजे. यासाठी नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

ख्रिसमसदरम्यान कशी घ्यावी आरोग्याची काळजी?

१) जर तुम्हाला थंड हवामानाचा त्रास होत असेल तर घरीच व्यायाम सुरू ठेवा. यावेळी शारीरिक हालचालींचा आनंद घेण्याचा खरा मजेदार मार्ग म्हणजे ख्रिसमस पार्टीदरम्यान डान्समध्ये सहभाग घेणे. कारण डान्स हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे.

२) स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी स्मार्ट फूडची निवड करा.

  • पार्ट्यांमध्ये वेटरने सर्व्ह केलेले जेवण घेण्यापेक्षा स्वतः जेवण सर्व्ह करून घ्या.
  • अर्ध्या प्लेटमध्ये तळलेल्या तिखट भाज्यांपेक्षा वाफवलेल्या भाज्या घ्या. यामुळे जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात, शिवाय कॅलरी आणि अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
  • प्रत्येकवेळी जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थ्यांचा समावेश करा. यात चिकन, मासे, अंडी, मसूर, शेंगा, स्प्राउट्स, दही, सोया आणि टोफू या पदार्थांचा समावेश होतो. प्रक्रिया केलेले आणि जास्त शिजवलेले मांसाहारी पदार्थ खाणे टाळा, कारण यात मीठ आणि फॅटचे प्रमाण जास्त असते.
  • केचअप, सॉस आणि मॉकटेल/कॉकटेलमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, यामुळे ते पिताना काळजी घ्या.
  • चिप्स, फ्राईज, नमकीन आणि कुकीज यांसारखे ट्रान्स फॅट असलेले पदार्थ खाणे टाळा.
  • खारट किंवा तळलेल्या ड्रायफ्रूट्सऐवजी साधे काजू घ्या.
  • जर पार्टी रात्री खूप वेळ चालणार असेल आणि रात्रीचे जेवणही खूप उशिराने दिले जात असेल, तर तुम्ही घरातून निघण्यापूर्वी काहीतरी खाऊनच निघा.

विशेषतः इन्सुलिन किंवा सल्फोनील्युरियावर असलेल्या व्यक्तींनी याची फार काळजी घ्या. अन्नाचे घास न चावता पटापट खाण्याऐवजी मन लावून खाल्ल्यास तुम्ही कमी जेवता; शिवाय खाल्लेले अन्न चांगल्याप्रकारे पचते.

दारूचे सेवन करायचे की नाही?

सर्वसाधारणपणे प्रत्येकाने अल्कोहोलचे सेवन पूर्णपणे टाळले पाहिजे. परंतु, काही वेळा ते काही जणांसाठी फार कठीण असू शकते. अशा परिस्थितीत काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. अल्कोहोलचे सेवन करणे म्हणजे स्वत:हून स्वत:वर एक संकट ओढावून घेण्यासारखे आहे. कारण अल्कोहोलच्या सेवनामुळे रस्ते अपघातांसह असंख्य गंभीर गोष्टी घडण्याची शक्यता असते. याशिवाय तुमच्या यकृतावर त्याचा परिणाम होत असतो. अल्कोहोलच्या सेवनामुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणात अचानक घट होण्याची शक्यता असते. कधीकधी हे प्रमाण खूपच कमी होण्याची शक्यता असते. यात तुम्ही रिकाम्यापोटी अल्कोहोल पिणे टाळा. तळलेले, जास्त गोड पदार्थ खाणे टाळा. त्याऐवजी शरीरात योग्य असे पदार्थ खा.

जर तुम्ही रात्रीच्या जेवणासोबत अल्कोहोल घेत असाल तर झोपण्यापूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासा. जर रक्तातील साखर 100 mg/dl पेक्षा कमी असेल तर काहीतरी खा, जसे की, फळ किंवा एक कप दूध.

अल्कोहोलचे मर्यादित प्रमाणात सेवन करा, यात व्हिस्की अंदाजे ३० ते ५० मिली किंवा समतुल्य प्रमाणात सेवन करू शकता. पण, कॉकटेलमध्ये (किंवा मॉकटेल्स) साखरेचे प्रमाण जास्त असू शकते, त्यामुळे ते पिताना पहिल्यांदा त्यात साखरेचे प्रमाण किती आहे ते तपासा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diabetes check you need an hours walk or a 20 minute run to burn a 50 gm slice of cake christmas and your diabetes sjr