Diabetes Friendly Laddoo: जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार डायबिटीज हा एक क्रोनिक मेटाबॉलिक आजार आहे. भारतात दिवसागणिक डायबिटीजच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. २० ते ७० या वयोगटातील तब्बल ८. ७ टक्के लोकसंख्या ही डायबिटीजने त्रस्त आहे. डायबिटीजमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने त्रास बळावतो म्हणूनच या रुग्णांना शक्य तितकं साखर वर्ज्य करण्याचा सल्ला दिलाजातो . पण काही वेळेस एखादा गोड पदार्थ खाण्याची आपलीही इच्छा होऊ शकते, हो ना? अशावेळी बंधन घातल्यास मनाची आणखी चलबिचल होऊ शकते. म्हणूनच आज आपण खास डायबिटीजच्या रुग्णांसाठी टेस्टी लाडू कसा बनवायचा हे पाहणार आहोत. एरवी डायबिटीजचा लाडू म्हणजे मेथी, अळीव असे पदार्थ असा एक समज असतो पण अजिबात कडू नसलेला,विना मेथी बनवलेला हा लाडू तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर पाहुयात ही रेसिपी..
अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या डाएटिशियन, डॉ. जीनल पटेल यांच्या माहितीनुसार फणस हा एका असा पदार्थ आहे ज्याच्या सेवनाने डायबिटीजच्या रुग्णांना अपार लाभ होऊ शकतात. मुळात फणसात व्हिटॅमिन ए व सी मुबलक असतात. राइबोफ्लेविन, मॅग्नीशियम, पोटॅशियम, कॉपर, मँगनीज व अँटीऑक्सिडेंटचा साठा असणारे हे फळ आहे. फणसाचा ग्लाइसेमिक इंडेक्स सुद्धा अगदी ५० ते ६० एवढाच असतो ज्यामुळे हे अत्यंत डायबिटीज फ्रेंडली गोड फळ ठरते.
गटमाइक्रोबायोम तज्ज्ञ डॉ शोनाली सभरवाल यांनी डायबिटीजच्या रुग्णांना फणसाचा लाडू खाण्याचा सल्ला दिला आहे. या लाडूमध्ये कोणतेही धान्य किंवा साखर घातलेली नाही. शुद्ध शाकाहारी असा हा पदार्थ नेमका बनवायचा कसा हे आपण पाहुयात..
सामग्री (Ingredients)
3 कप – बदाम
3 कप – फणसाचे पीठ (बाजारात उपलब्ध)
½ कप – ऑलिव्ह ऑइल
2 मोठे चमचे- सुंठ
1 चमचा – काळीमिरी
1 चमचा– वेलची पूड
2 कप – शुद्ध मेपल/एगेव सिरप किंवा किंचित गूळ
1 कप – डिंक
1 चमचा- तूप
हे ही वाचा<< डायबिटीज रुग्णांसाठी ‘हा’ सुका मेवा ठरतो विषासमान? काजू बदाम खाल्ल्याने शरीरात होतात ‘हे’ बदल
फणसाच्या लाडूची रेसिपी
- बेसनाच्या लाडूप्रमाणेच ही रेसिपी आहे. आधी मंद आचेवर तेल गरम करून त्यात पीठ भाजून घ्या. खरपूस रंग येताच हे पीठ बाजूला काढून ठेवा
- यात पिठात बदामाचे तुकडे व मेपल सिरप शिवाय सगळी सामग्री टाका.
- पूर्णपणे थंड झाल्यावर यात मेपल सिरप किंवा गूळ टाका
- लाडू वळून घ्या.
हे ही वाचा<< एका दिवसात किती व कसे बदाम खाणे आहे योग्य?
आहारतज्ज्ञांच्या मते, ग्लेसिमिक नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फणसाचे लाडू मदत करतात. या लाडूसाठी आपण बदामाच्या शिवाय तुमच्या आवडीचा सुका मेवा किंवा सूर्यफुलाच्या सुकवलेल्या बिया सुद्धा वापरू शकता. यामुळे या लाडूच्या रेसिपीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होण्यास आणखी मदत होऊ शकते. याशिवाय अन्यही रेसिपीच्या माध्यमातून कच्चा फणस खाणे डायबिटीज रुग्णांना फायदेशीर ठरू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)