what are the early signs of diabetes : मधुमेह हा आता एक गंभीर आजार म्हणून ओळखला जातो. वयोमानानुसार हा आजार वाढत जातो. त्यामुळे वेळीच आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे, अन्यथा परिस्थिती बिकट होऊ शकते. हा आजार जितका गंभीर आहे तितकीच त्याची लक्षणेही गंभीर असतात. अशा वेळी मधुमेह आणि त्या संबंधित आजारांबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. मधुमेहामुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. यामागे कमकुवत रोगप्रतिकारशक्ती आणि इतरही अनेक कारणे सांगितली जातात. यामुळे मधुमेहामुळे कोणत्या आजारांचा धोका वाढू शकतो जाणून घेऊ…
किडनीचे नुकसान होण्याचा धोका
ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे. अशा लोकांमध्ये किडनी खराब होण्याचा धोका वाढतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की, किडनीमध्ये असलेल्या रक्तवाहिन्यांचे खूप नुकसान होते. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करणाऱ्या मूत्रपिंडाच्या क्षमतेवर परिणाम होतो.
हेही वाचा : वाईट स्वप्ने मुलांच्या आरोग्यासाठी ठरतायत धोकादायक; वाढतोय ‘या’ आजारांचा धोका
हृदयरोग होणे
मधुमेहामुळे हृदयविकाराचा धोका खूप वाढतो. यामुळे हृदयविकाराचा झटका, कार्डियक अरेस्ट, पेरिफेरल आर्टरी डिजीजची शक्यता खूप जास्त असते. हाय ब्लड शुगर लेव्हल आणि हाय ब्लड प्रेशरच्या समस्येमुळे हृदयाचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळेच काळजी घेण्याची गरज आहे.
डोळ्यांचा आजार
मधुमेहामुळे डोळ्यांसंबंधित आजार वाढतात. मधुमेहामुळे डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. यामुळे रेटिनोपॅथी हा मधुमेहाशी संबंधित आजार होऊ शकतो. त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होतो. त्याचे वेळीच निदान होणे गरजेचे आहे.
मज्जासंस्थेवर परिणाम
अनेक वर्षांपासून तुम्ही मधुमेहाचा सामना करीत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या मज्जासंस्थेवरही दिसून येतो. यामुळे अंग सुन्न होणे, हाता, पायात मुंग्या येणे आणि वेदना यांसारखी लक्षणे दिसू शकतात. या स्थितीला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात.
उच्च रक्तदाबाचा धोका
मधुमेहाचा थेट संबंध उच्च रक्तदाबाशी आहे. यात हळूहळू तब्येत बिघडल्यामुळे ही समस्या निर्माण होते. व्यक्तीचा रक्तदाब वाढू लागल्यास त्याचा परिणाम शरीराच्या विविध अवयवांवर दिसून येतो.