नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीला मधुमेह विकार झाला आहे किंवा नाही, हे निदान करणे आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अधिक सोपे झाले आहे. या नव्या संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे हे ‘टूल’ मानवी आवाजात होणाऱ्या सूक्ष्म परिवर्तनाची नोंद करून संबंधित व्यक्ती मधुमेहग्रस्त आहे किंवा नाही याबाबत निदान करणार आहे. या टूलची अचूकता महिलांमध्ये ८८ टक्के, तर पुरुषांमध्ये ८६ टक्के आहे. या संशोधनासाठी २६७ व्यक्तींच्या आवाजाचे विश्लेषण करण्यात आले.
हेही वाचा >>> Mental Health Special: काळजाचा ठोका पुन्हा पुन्हा चुकतो तेव्हा……
अमेरिकेतील ‘क्लिक लॅब’च्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मॉडेल तयार करण्यासाठी वय, उंची आणि वजन यासह आरोग्याच्या माहितीचे विश्लेषण केले. त्यानंतर या व्यक्तींच्या सहा ते १० सेकंदांच्या आवाजाच्या नमुन्याचा अभ्यास केला. संशोधकांनी सांगितले की, २६७ व्यक्तींना दोन आठवडे दररोज सहा वेळा त्यांचा आवाज मोबाइलमध्ये रेकॉर्ड करण्यास सांगितले होते. त्यानंतर १८ हजारांपेक्षा अधिक रेकॉर्डिगच्या मदतीने मधुमेह न झालेली व्यक्ती आणि टाइप २ प्रकारचा मधुमेह झालेल्या व्यक्तींमधील बदलांची माहिती मिळाली.