Health Problems Salt Intake : अनेकांना चविष्ट, चमचमीत पदार्थ खाण्याची आवड असते. अशा वेळी प्रक्रिया केलेले तेलकट, तूपकट पदार्थांमधून जास्त मिठाचे सेवन करता. काहींना जेवणातही जास्त प्रमाणात मीठ लागते; पण रोज जेवणात जास्त प्रमाणात मीठ वापरत असाल, तर आताच सावध व्हा. कारण- त्यामुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांचे बळी ठरू शकता. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक अहवाल जाहीर केला. त्या अहवालानुसार दरवर्षी अंदाजे १.८९ दशलक्ष लोक मिठाच्या जास्त प्रमाणातील सेवनाने मृत्युमुखी पडतात. परिणामी उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्यादेखील वाढतात. अशा वेळी मिठाचे सेवन कमी करण्यासाठी काय करावे ते सुचत नाही. अशा परिस्थितीत डॉ. गुप्ता आणि डॉ. करण तनुगुला यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना मिठाचे सेवन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत.
हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल्सचे सल्लागार जनरल फिजिशियन डॉ. करण तनुगुला यांनी सांगितले, “तुम्ही दररोज जास्तीत जास्त २३०० मिलिग्रॅम मिठाचे सेवन करू शकता. हे प्रमाण एक चमचा इतके असते. दरम्यान, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांनी दररोज १५०० मिलिग्रॅमपेक्षा कमी मिठाचे सेवन करणे फायदेशीर असते.
मीठाच्या अति प्रमाणात सेवनाने शरीरात पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यास अडचणी येतात. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांवर ताण पडतो; ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यावर परिणाम होतो आणि उच्च रक्तदाबाची समस्या वाढते.मिठाच्या जास्त सेवनामुळे मूत्रपिंडाचे कार्य बिघडते. त्यामुळे त्यासंबंधित गंभीर आजारही वाढतात, असे हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन व डायबेटॉलॉजिस्ट डॉ. के. सोमनाथ गुप्ता यांनी सांगितले.
दरम्यान, डॉ. गुप्ता आणि डॉ. तनुगुला यांनी दररोज मिठाचे सेवन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. ते उपाय जाणून घेऊ….
१) खाद्यपदार्थांवरील लेबले वाचा : कोणतेही खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यावरील लेबल काळजीपूर्वक वाचा. कमी सोडियमयुक्त साहित्य असलेले प्रॉडक्ट्स म्हणजे Low Sodium किंवा No Added Salt असे लेबल असलेले खाद्यपदार्थ निवडा.
२) ताजे जेवण घ्या : ताजे आणि घरगुती पदार्थांचा वापर करून स्वयंपाक तयार करा. त्यामुळे तुम्हाला मिठाचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत होते. त्याशिवाय चवीसाठी पर्यायी औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करा.
३) प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन टाळा : प्रक्रिया केलेले आणि प्री-पॅकेज केलेल्या पदार्थांमध्ये अनेकदा सोडियमचे प्रमाण जास्त असते. तसेच पॅकिंग सूप, इन्स्टंट नूडल्स, फ्रिजिंग फूड्स आणि इतर प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठ अधिक असते. त्यामुळे अशा सर्व पदार्थांचे सेवन कमी करा.
४) औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करा : स्वयंपाकात मीठाचा वापर करण्याऐवजी तुम्ही अनेक औषधी वनस्पती, मसाले आणि इतर चव वाढवण्यास फायदेशीर ठरू शकतात अशा पदार्थांचा वापर करा. तसेच लसूण, कांदा, लिंबू आणि विविध औषधी वनस्पतींसारखे पर्याय सोडियमशिवाय चव वाढवू शकतात.
५) रेस्टॉरंटमध्ये जेवताना सावधगिरी बाळगा : बाहेर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जेवताना मिठाचा कमी वापर करीत पदार्थ तयार करण्यास सांगा. टेबलावर आणलेल्या पदार्थांमध्येही अतिरिक्त मीठ घालणे टाळा. तळलेल्या पदार्थांपेक्षा ग्रिल्ड, वाफवलेले किंवा बेक केलेल्या पदार्थांचे पर्याय निवडा.
६) कमी मिठाचे पदार्थ निवडा : सोया सॉससारखे मसाले खरेदी करताना, कमी सोडियम असलेले पदार्थ निवडा. जास्त मीठ न खाता, चवीसाठी व्हिनेगर, लिंबाचा रस किंवा होममेड ड्रेसिंगसारखे इतर पर्याय निवडा.
७) मिठाचा वापर हळूहळू कमी करा : जर तुम्हाला जास्त मीठ खाण्याची सवय असेल, तर तुम्ही वापरत असलेल्या मिठाचे प्रमाण हळूहळू कमी करण्याचा विचार करा. अळणी पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा; ज्यामुळे तुम्ही जास्त मिठावर विसंबून न राहता, चांगल्या प्रकारे जेवू शकता.
८) हायड्रेट राहा : भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या सिस्टीममधून अतिरिक्त सोडियम बाहेर काढण्यास मदत होते. हायड्रेटेड राहिल्यास आरोग्य उत्तम राहते. तसेच शरीरातील सोडियमची पातळी संतुलित करण्यास मदत होते.