देशभरात वर्ल्डकपचे सामने सुरू आहेत. उत्साहाचं वातावरण आहे. विविध खेळाडू आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना क्रिकेटप्रेमींना खुमासदार खेळीचं प्रदर्शन करत आहेत. त्यानिमित्ताने खेळाडू आणि त्यांचा आहार विशेषतः क्रिकेटपटू आणि त्यांच्या आहार विषयी अनेक मुलाखती घेतल्या जात आहेत. अनेक लेख लिहिले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहली, रोहित शर्मा यांची बदललेली आहारशैली, मैदानातील चपळ वावर आणि दिमाखदार खेळी याबद्दल देखील आपण वाचतोच आहोत. हा लेख लिहिण्यामागचं खास निमित्त म्हणजे ऑस्ट्रलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेलची दणदणीत २०० धावांची विक्रमी खेळी!

या विक्रमी खेळीमध्ये केवळ जादुई धावफलक एवढीच बाब महत्वाची होती असे नव्हे तर मॅक्सवेलने ज्या ताकदीने ही खेळी केली त्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटले नसेल तरच नवल! ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हटले कि उंच देहयष्टी , वेगवान धावा , आणि बॅटमधून केवळ सीमारेषेबाहेर फेकले जाणारे चेंडू हे समीकरण आपण अनेक वर्ष पाहतोय. अफगाणिस्तान विरुद्ध मॅचमध्ये मात्र मॅक्सवेलचे स्नायू दुखावले गेले आणि आणि मैदानावरच धाव पूर्ण करताना तो पडला होता. त्याच्या स्नायूंमध्ये अचानक झालेली दुखापत आणि त्याच वेळी पाठीत स्नायूंवर आलेला अतिरिक्त ताण यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत मैदानातील क्रिकेटरसिकांनी देखील श्वास रोखून धरला होता.

हेही वाचा : कॅफिनयुक्त पेय तुमच्या शरीरासाठी किती सुरक्षित आहेत? जाणून घ्या डाॅक्टरांचे मत…

मात्र योग्य फिजिओथेरपी आणि उपाय यामुळे त्याला उरलेली खेळी पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. क्रिकेटमधील ऐतिहासिक खेळी याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य मुंबईतील वानखेडे स्टेडियम वर उपस्थित चाहत्यांना मिळालं आणि अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. एका जागी घट्ट पाय रोवून साधारण सगळेच चेंडू सीमारेषेबाहेर टोलवत मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला स्मरणात राहील असा विजय मिळवून दिला.

या खेळीनिमित्ताने माझ्यातल्या आहारतज्ज्ञाला मॅक्सवेलच्या आहाराबाबत आणखी सजग विचार करण्यास भाग पडले. गेली काही वर्ष क्रिकेटच्या विविध स्पर्धांमुळे मग ती आंतरराष्ट्रीय, टेस्ट किंवा आयपीएल असो मॅक्स्वेलने त्याच्या आहारामध्ये काही विशेष बदल केलेले आहेत. साधारण २०१६ ते २०२० या कालावधीमध्ये त्याला हे लक्षात आलं की आपलं खाणं म्हणावं तितका परिणाम आपल्या खेळावर करत नाहीये. भारतासारख्या देशात जिथे वातावरणात आर्द्रता सातत्याने बदलत असते अशा ठिकाणी खेळता आणि बाहेरील थंड प्रदेशातील देशात खेळात असताना खेळांचा आहार त्यातील महत्वाचा घटक पदार्थांचे प्रमाण सातत्याने बदलत असते. त्यात शरीरयष्टी योग्य प्रकारे राखणे, शरीरातील लवचिकता, स्नायूंची चपळता जपणे क्रिकेटर साठी आवश्यक आहे. मानसिक स्थैर्य आणि शारीरिक बळ यांची एकजूट करून फलंदाजी निभावताना मैदानात तुम्ही महिनोन्महिने पाळलेले आहाराचे पथ्य महत्वाची भूमिका बजावते.

हेही वाचा : Health Special : …तर टॉमेटो ठरु शकतो पित्तप्रकोपाचं कारण!

क्रिकेटसारख्या खेळामध्ये जेव्हा खेळाडू तीन तास सातत्याने खेळात असतात तेव्हा आहारातील कर्बोदकांचे प्रमाण आणि प्रथिनांचे प्रमाण अत्यंत महत्वाचे ठरते . तुमच्या शरीरयष्टीप्रमाणे आणि खेळातील वैशिट्याप्रमाणे -म्हणजे फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यातील प्रावीण्याप्रमाणे क्रिकेटपटूंना त्यांचे कसब सुधारत राहावे लागते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळत असताना मॅक्सवेलच्या आहाराच्या शिस्तीचं अनेक क्रीडा शास्त्रज्ञांनी विशेषतः कौतुक केलं . त्याच्या वेगवान धावा आणि फलंदाजी बद्दल अनेकांनी गौरवोद्गार काढले होते. मॅक्सवेल च्या स्नायूंमधील क्रॅम्प्सचा विचार करता हवेतील आर्द्रतेमुळे स्नायूंमध्ये शिथिलता येऊन त्याला त्रास झाल्याचं सांगण्यात आलं मग त्याला इतका वेळ खंबीरपणे खेळी करण्यासाठी कशी ताकद आली असेल. या ताकदीमागे त्याने गेली अनेक महिने किंबहुना वर्ष बदललेली आहारशैली आहे.

फलंदाज म्हणून कमी षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्यासाठी पाठ, हात आणि धड या तिन्ही स्नायूंमधील ताकद आवश्यक आहे. या स्नायूंमधील ताकद वाढविण्यासाठी योग्य प्रकारे व्यायाम करून त्या स्नायूंना बळकटी आणणं महत्वाचं ठरतं. आहारातील प्रथिनांचा विचार करताना ती प्रथिने योग्य प्रमाणात योग्य अन्नामधून मिळाल्यास केलेल्या व्यायामाचं फलित अचूक मिळतं.

हेही वाचा : Diwali 2023 : दिवाळीत फराळ बनवताना फॉलो करा ‘या’ हेल्दी टिप्स अन् बिनधास्त मारा ताव लाडू, चकली, चिवड्यावर!

त्याच किमान कर्बोदके -किमान ऊर्जा आणि प्रथिनांची भरपूर असणारं डाएट त्याचा फॉर्म दुरुस्त करण्यासाठी उपयुक्त ठरत होतं. जेव्हा किमान कर्बोदके असा आपण विचार करतो तेच मॅक्सवेलचा आहार विशेषतः भरपूर भाज्या आणि किमान प्रमाणात धान्य यांवर अवलंबून असल्याचं लक्षात आलेलं आहे. कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक अन्नपदार्थाना आहारातून वजा करून केवळ सकस ऊर्जा देणारे अन्नघटक आहारात समाविष्ट करणं , ट्रेनिंग करताना आणि करण्यापूर्वीच्या आहारावर योग्य भर देणं यावर त्यानं जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे.

क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या एकट्याने रचताना अचूक ठिकाणी चेंडूला योग्य वेगाने टोलविण्यासाठी अचूक निर्णय क्षमता , अचूक वेळ साधणं तितकंच महत्वाचं आणि त्यासाठी मेंदूचं तल्लख असणं देखील महत्वाचं ! योग्य प्रकारचे मासे, मांसाहारात न तळलेला मांसाहार याच संतुलन त्याने राखलंय. जेणेकरून योग्य प्रथिनांचा पुरवठा होत असताना स्निग्धांशाचे अतिरेक होऊ नये. आहारात मुबलक हिरव्या भाज्या , तेलबिया यांचा समावेश करताना यातील कशाचाही अतिरेक होणार नाही याच विशेष भान त्यानं राखलंय.

संतुलित आहार म्हणजे केवळ किती टक्के अन्नघटक असा विचार न करता कितपत आवश्यक ऊर्जा आणि पोषणमूल्य याचा विचार केल्याने मॅक्सवेलच्या शरीरातील कमालीचा संयम आपण सगळ्यांनी पाहिला.

हेही वाचा : Health Special : वर्कलाईफ बॅलन्स का महत्त्वाचा?

पाण्याचं आवश्यक प्रमाण, व्यायामाची जोड आणि योग्य जीवनशैली यामुळे मॅक्सवेलला त्यादिवशी मैदानात खऱ्या अर्थाने फलंदाजीसाठी कसून खेळी करता आली. त्याचे चौकार षटकार एकहाती असलेले आपण पाहिलेच. खेळताना शरीरावर येणार ताण सोसून लक्ष विचलित न होऊ देणं हे महत्वाचं कसब त्यादिवशी त्याच्या खेळीने जगाला दाखवलं. त्यात त्याने कसून मैदानावर केलेली मेहनत दिसून आली.

खेळाडू म्हणून शरीरयष्टी राखताना एकाग्रता आणि आणि कौशल्य पणाला लागतात मॅक्सवेलच्या खेळीने केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक स्थैर्य आणि कौशल्य किती आवश्यक असतं हे दाखवून दिलं. भारतातील भावी क्रीडापटूंनी मॅक्सवेलच्या खेळीमधून एक नवा धडा घेतला असेलच मात्र हे एका खेळीतलं यशामागे त्याची अनेक वर्षाची आहार-विहार साधना लक्षात घ्यावी म्हणून का लेखप्रपंच!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diet plan of australian cricketer glenn maxwell hldc css
Show comments