Health Benefits of Coconut Water and Coconut Oil विधात्याने आपल्या प्रजेकरिता या पृथ्वीवर श्रीफळ किंवा नारळ हा मोठा अनमोल ठेवा ठेवलेला आहे. अन्न, वस्त्र व निवारा या तीनही जीवनावश्यक गोष्टी प्राचीन काळापासून मानव नारळापासून मिळवत आहे, वापरत आहे. तसेच आरोग्यरक्षण व रोगनिवारण या कार्यातही नारळाचा मोठा वाटा आहे. नारळाचे खोबरे, तेल, पाणी एवढेच काय पण करवंटीसुद्धा औषधी उपयोगी आहे. यालाच नारिकेल तेल असे म्हणतात. नारळाच्या करवंटीपासून एककाळ करवंटी अर्क काढला जात असे. पुणे मंडईतील पावती नारळवाल्यांच्या मातोश्री असा अर्क काढून विविध त्वचा विकारांकरिता, त्यांचेकडे येणाऱ्या गरजू त्वचाविकारग्रस्त रुग्णांना देत असत. यावर अधिक संशोधन व्हायला हवे.
वाढणाऱ्या चरबीला प्रतिबंध
नारळाचे पाणी स्निग्ध, मधुर, शुक्रवर्धक, थंड गुणाचे तरीही शरीरात फाजील चरबी न वाढवणारे आहे. तहान, पित्त व वायूचे एकत्रित विकारावर उपयुक्त आहे. काही प्रमाणात अग्निवर्धक व मूत्राशयाची शुद्धी करणारे आहे, असे आयुर्वेद शास्त्र सांगते. शहाळ्यामध्ये ग्लुकोज, —-प्रोटन——- ही द्रव्ये अधिक असतात. पक्व नारळात क्लोराईड किंवा क्षार थोडे अधिक असतात. त्यामुळे नारळाचे पाणी वापरायचे असेल तर कोवळे शहाळ्याचेच वापरणे योग्य होय. नारळाच्या पाण्यात ए व बी व्हिटॅमिन आहेत. ओल्या खोबऱ्यामध्ये मांसवर्धक पदार्थ, वसा व ताडगूळ असतो. ओल्या खोबऱ्याच्या दुधात साखर, डिंक, अल्ब्युमिन, चिंचेसारखे आम्ल, खनिज ही द्रव्ये असतात. काही नारळाच्या जातीपासून चांगला गूळ तयार होतो. खोबऱ्यापासून साठ टक्के तेल निघते. आयुर्वेदाप्रमाणे खोबरे वातपित्तनाशक, बलवर्धक व शरीर पुष्ट करणारे आहे. रक्तविकार, उर:क्षय, क्षय व ज्वरात उपयुक्त आहे.
घरगुती खोबरेल तेल उत्तम गुणाचे
चहा कॉफी, दारू, सिगरेट इत्यादी व्यसनांमुळे किंवा जागरणाने भूक मंदावली असेल तर नारळाचे पाणी शरीराचा क्षोभ कमी करून भूक सुधारते. आम्लपित्त विकारात आतड्याचा दाह होत असल्यास ओल्या नारळाचे दूध प्यावे. अल्सर किंवा आतड्याचा व्रण मग तो पेपटिक किंवा डिओडिनम असला तरी नारळाचे दूध किंवा नारळाचे दूध आटवून केलेले खोबरेल तेल उत्तम उपाय आहे. एका नारळाचे खवून खोबरे काढावे. स्वच्छ फडक्यांत पिळून घ्यावे. लहान पळीत आटवावे. साधारण दोन-तीन चमचे तेल तयार होते. हे घरगुती खोबरेल उत्तम औषधी गुणाचे आहे. ज्यांचे केस अकाली गळत आहेत. पिकले आहेत, नवीन मुळे कमजोर आहेत, जुनाट ताप, स्ट्राँग औषधे घेऊन डोळे व केस निस्तेज झाले आहेत. त्वचा रूक्ष झाली आहे त्यांनी मोठाली टॉनिक घेण्याऐवजी असे तेल नियमित प्यावे. दीड-दोन महिन्यात गुण मिळतो.
मसाजाकरिता तेल
असेच घरगुती खोबरेल तेल कृश व्यक्तींच्या संधिवातावर, विशेषत: गुडघे, पाठ, कंबर यांतील सांध्यातील वंगण कमी झाले असल्यास उपयोगी पडते. मात्र अशा रुग्णांना रक्तदाबवृद्धी, फाजील चरबी, असा विकार असता कामा नये.
अंग बाहेर येणे, रक्ती मूळव्याध, भगंदर या विकारात बाह्योपचारार्थ खोबरेल तेलाची घडी वापरावी. जळवात, निद्रानाश, हातापायाची, डोळ्यांची आग या विकारात या प्रकारचे खोबरेल तेल हातपाय व कानशिलास चोळावे. बाळंतपणातील कंबरदुखी, लहान बालकांना पहिले तीन महिने खोबरेल तेल मसाजाकरिता वापरावे.
खोबरे महत्त्वाचे टॉनिक
कृश व्यक्तीने, दूध कमी येत असलेल्या बाळंतिणीने ताजे खोबरे व चवीप्रमाणे साखर किंवा आल्याचा तुकडा नियमितपणे सकाळी खावा. दिवसभर ज्यांना श्रमाचे काम करावयाचे आहे त्यांच्याकरिता खोबरे मोठे टॉनिक आहे. गोवर, कांजिण्या, गरमी, परमा, लघवीची आग, लघवी कमी होणे, मूतखडा, युरिनरी इन्फेन्शन, घाम खूप येणे, तोंड येणे या विकारात शहाळ्याचे ताजे पाणी हा उत्तम उपाय आहे. लघवी कमी होत असल्यासच नारळाचे किंवा शहाळ्याचे पाणी प्यावे. ज्यांना लघवी भरपूर होते पण मार्गावरोध झाला आहे. त्यांनी नारळाचे पाणी घेऊ नये. तसेच पोटात वायू धरण्याची खोड असल्यास नारळपाणी पिऊ नये.
कानात तेल टाकू नये
हृद्रोग, क्षय, फिटस् येणे, कर्करोग, हाडांचे विकार, सोरायसिस, मासिक पाळीच्या वेळेस अंगावरून जास्त जाणे या तक्रारीच्या कृश व्यक्तींनी नारळ दूध किंवा तेल किंवा पाणी प्यावे. कावीळ, जलोदर, रक्तदाबवृद्धी या विकारात खोबरेल पिऊ नये. कानात कधीही खोबरेल तेल टाकू नये.