Coconut Water Soaked Sabja Seeds Benefits : सततची बदलती जीवनशैली, वेळी-अवेळी खाणे, ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे सध्या लठ्ठपणाची समस्या वाढताना दिसतेय. ऑफिसमध्ये तासन् तास बसून काम आणि शारीरिक हालचालींचा अभाव हेदेखील वजन वाढण्याचे कारण बनत आहे. वाढत्या वजनामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचाही सामना करावा लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली असणे फार आवश्यक आहे. त्यात तुमच्यासाठी मॉर्निंग ड्रिंकचाही पर्याय आहे. त्यासाठी तुम्ही रोज सकाळी नारळ पाण्यात सबजाच्या बिया किंवा तुळशीच्या टाकून प्यायल्यास वजन कमी करण्यासह बद्धकोष्ठता, पित्ताच्या त्रासापासून तुम्ही दूर राहू शकता, असे सांगितले जाते. पण खरेच यामुळे लठ्ठपणासह अनेक समस्यांपासून दूर राहता येते का? याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिल्लीतील NUTR च्या संस्थापिका व आहारतज्ज्ञ डॉ. लक्षिता जैन, आहारतज्ज्ञ सिमरत भुई व आरती बभूता यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

नारळ पाण्यात सबजाच्या बिया मिसळून पिण्याचे ‘हे’ फायदे

नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम व इलेक्ट्रोलाइट्स यांसारखे अनेक पोषक घटक असतात. पण, नारळ पाण्याबरोबर तुम्ही सबजाच्या बिया टाकून प्यायल्यास शरीरात थंडावा निर्माण होतो. कारण- हे दोन्ही पदार्थ तुमच्या शरीराला अॅसिडिटीसारख्या समस्यांशी लढण्यास मदत करते.

आहारतज्ञ सिमरत भुई यांच्या मते, नारळाच्या पाण्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे वारंवार डिहायड्रेशनचा त्रास होणाऱ्या लोकांसाठी हे सर्वोत्तम पेय आहे. नारळाच्या पाण्यात कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने तुम्ही कोणत्याही स्पोर्ट्स ड्रिंकपेक्षा याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

सबजाच्या बियादेखील शरीरात नैसर्गिकरीत्या थंडावा निर्माण करण्याचे काम करतात. त्यावर आहारतज्ज्ञ भुई म्हणाल्या की, सबजाच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते; जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतात आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून दूर ठेवण्यात मदत करतात.

शरीरात अतिरिक्त उष्णता जाणवत असल्यास तुम्ही नारळ पाण्यात सबजाच्या बिया मिसळून प्यायल्यास खूप फायदे मिळू शकतात, असे आहारतज्ज्ञ लक्षिता जैन म्हणाल्या.

हे पेय शरीराला कूलिंग इफेक्ट देण्यासह हायड्रेटही ठेवते. तसेच त्यामुळे शरीरात फायबरचे प्रमाण वाढते आणि ॲसिडिटीपासून आराम मिळतो. त्यावर आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा म्हणाल्या की, भिजवलेल्या सबजाच्या बिया नारळाच्या पाण्यात टाकून प्यायल्यास आम्लपित्ताच्या समस्येपासून दूर राहता येते. तसेच शरीरातील हाइड्रोक्लोरिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवता येते.

या दोन्ही पदार्थांमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असल्याने चांगले डिटॉक्सिफिकेशन मिळते आणि वजन कमी करण्यास मदत होते, असे आहारतज्ज्ञ भुई म्हणाल्या.

त्यावर वाताल्यच्या संस्थापक, कम्युनिटी डायरेक्टर व आहारतज्ज्ञ आरती बभूता यांनी सांगितले की, सबजाच्या बिया केवळ नारळ पाण्यातच नाही, तर साधे पाणी किंवा लिंबू पाण्यात टाकून प्यायल्यासही तुम्हाला चांगला परिणाम दिसून येऊ शकतो. फक्त त्याचे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत सेवन केले पाहिजे.

आहारतज्ज्ञ कुकरेजा यांच्या मते, नारळ पाणी आणि सबजाच्या बियांचे सेवन कसे करायचे?

साहित्य

भिजवलेल्या सबजाच्या बिया
नारळाचे पाणी

पद्धत

१) १/२ टीस्पून सबजा बिया अर्धा कप पाण्यात १०-१५ मिनिटे भिजत ठेवा.
२) या भिजवलेल्या बिया एक ग्लास नारळाच्या पाण्यात टाका आणि प्या.

हे पेय कधी आणि कसे सेवन करावे?

१) तुम्ही हे पेय सकाळी ११ आणि दुपारी ४ वाजता असे दोन वेळा पिऊ शकता, असे आहारतज्ज्ञ कुकरेजा म्हणाल्या.

२) त्यात फायबर, लोह व प्रथिने यांसारखे आवश्यक पोषक घटक असल्याने तुम्ही बिया सकाळी पाण्यात टाकूनही पिऊ शकता किंवा लापशी, सरबत, हर्बल टी, स्मूदी, दही किंवा तुमच्या सॅलडमध्ये टाकून घेऊ शकता, असे आहारतज्ज्ञ जैन म्हणाल्या.

नारळ पाण्याबरोबर सबजाच्या बियांचे सेवन करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या…

बऱ्याच लोकांचा असा विश्वास असतो की, केवळ नारळ पाण्यात सबजाच्या बिया टाकून प्यायल्यास वजन पटकन कमी होते. पण तसे नाही, तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तुम्हाला योग्य आहारासह नियमित व्यायाम करण्याचीही तितकीच गरज आहे. कारण- याच सर्व गोष्टींचे पालन करूनच तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता, असे आहारतज्ज्ञ जैन म्हणाल्या.

तसेच नारळ पाण्याबरोबर सबजाच्या बियांचे अतिसेवन टाळा. हा वजन कमी करण्याचा एक उपाय आहे. त्यामुळे तो प्रमाणात आणि योग्य वेळेत करणेच फायदेशीर ठरू शकते, असे आहारतज्ज्ञ बभूता म्हणाल्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diy health tips coconut water soaked sabja seeds benefits coconut water and sabja seeds drink to get rid of acidity weight loss constipation know how to consume this sjr
Show comments