Benefits Of Salt Bath : ऑफिसमध्ये तासन् तास बसून काम केल्यामुळे आणि एका ठरावीक पद्धतीत बसल्यामुळे हल्ली अनेकांना पाठदुखीचा त्रास जाणवतोय. या पाठदुखीच्या समस्येवर अनेक उपाय केले जातात; पण काही फरक जाणवत नाही. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या खाल्ल्यानंतर तात्पुरते बरे वाटते; पण काही दिवसांनी पुन्हा ही समस्या डोके वर काढते. अशा वेळी अनेक जण काही घरगुती उपाय करण्याचा सल्ला देतात. त्यातील एक उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याने अंघोळ करणे. रोज पाण्यात मीठ घालून अंघोळ केल्यास पाठदुखीपासून आराम मिळतो, असे काही जण सुचवतात. पण, या उपायामुळे खरोखरच काही फायदा होऊ शकतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो. याच प्रश्नावर दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काही डॉक्टरांनी सविस्तर उत्तर दिले आहे, ते नेमके काय आहे ते जाणून घेऊ….

तुम्ही आतापर्यंत मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे फायदे ऐकले असतील; पण त्या पाण्याने अंघोळ करण्याचेही काही फायदे असतात हे फार क्वचित लोकांना माहीत आहे. याच विषयावर मॅक्स हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट असोसिएट डायरेक्टर डॉ. अखिलेश यादव यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना म्हटले की, पाठदुखीचा त्रास असलेल्यांना मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने फायदा होऊ शकतो. त्यातही विशेषत: सैंधव मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास अधिक फायदा होईल.

हेही वाचा – पांढरे केस काळे करण्यासाठी अनेक घरगुती उपाय करून वैतागलात? आता फक्त रोज करा ‘ही’ दोन योगासने, दिसेल फरक

एप्सम म्हणजे सैंधव मीठ हे मॅग्नेशियम सल्फेट (MgSO4) म्हणूनही ओळखले जाते. हे अंघोळीच्या कोमट पाण्यात विरघळते तेव्हा त्यातील मॅग्नेशियम हे तणावाची पातळी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे जळजळ कमी होऊन स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी करण्यास मदत होते.

मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यानंतर जाणवणारी ऊब तणाव आणि स्नायूदुखी कमी करू शकते. यावेळी शरीरास उष्माप्रेरित रक्ताभिसरणामुळे बरे वाटण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे शरीरास एक प्रकारे नवसंजीवनी मिळते, असे डॉ. यादव म्हणाले.

याबाबत हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार ऑर्थोपेडिक, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट व ऑर्थ्रोस्कोपिक सर्जन डॉ. सुनील दाचेपल्ली यांनी सहमती दर्शवीत म्हटले की, सैंधव मीठ म्हणजे एप्सम सॉल्ट बाथचा वापर खूप लोकप्रिय आहे. कारण- यामुळे अनेक समस्यांपासून आराम मिळतो. हे मीठ कोमट पाण्यात टाकून, त्या पाण्याने अंघोळ केल्यास अनेक समस्या दूर होतात. हे मीठ त्वचेद्वारे शोषले जात असल्यामुळे स्नायूंचे दुखणे कमी होते आणि त्यामुळे स्नायूंचे कार्य वाढते.

अशा प्रकारे आंघोळ केल्यास मिठाच्या पाण्याने स्नायूंना आराम मिळतो, तणाव कमी होतो आणि पाठदुखीमुळे होणारी समस्या दूर होते, असे डॉ. दाचेपल्ली म्हणाले.

त्यामुळे शरीर खूप ताजेतवाने वाटते. पाण्यात राहिल्याने गुरुत्वाकर्षणाचा ताण कमी होतो; ज्यामुळे पाठीचा कणा आणि सांध्यावरील दबाव कमी होण्यास मदत होते, असेही ते पुढे म्हणाले.

सैंधव मिठाने कशी करायची अंघोळ?

सैंधव मिठाने पाठदुखीवर उपचार करण्यासाठी सर्वप्रमथ बाथटबमध्ये किंवा एक बादली कोमट पाणी घ्या. त्यानंतर त्यात दोन कप सैंधव मीठ घाला आणि १५-२० मिनिटे तसेच राहू द्या. आता हे पाणी अंघोळ करताना तुमच्या पाठीवर चांगल्या प्रकारे शेक देईल अशा प्रकारे टाका.

सैंधव मिठाने अंघोळ करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

सैंधव मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने तात्पुरत्या वेदना कमी होतात. पण, त्यामुळे सैंधव मिठाने अंघोळ केल्याने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होण्यास मदत होते, असे सांगणारे फार कमी वैज्ञानिक पुरावे आहेत, यावरही डॉ. यादव यांनी भर दिला.

त्यामुळे कोणताही नवीन उपचार सुरू करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी किंवा तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांशी बोलणे नेहमीच योग्य ठरते. विशेषत: जर तुम्हाला काही वैद्यकीय समस्या असतील, तर कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही डॉ. यादव म्हणाले.