पृथ्वीप्रमाणेच अंतराळातही माणसांना मोशन सिकनेस जाणवू शकतो. त्यामुळेच काही अंतराळवीरांना अंतराळात ‘स्पेस ॲडॉप्टेशन सिंड्रोम (एसएएस)’चा अनुभव येऊ शकतो. “अंतराळात प्रवेश केल्यावर विविध अंतराळवीरांनी अनुभवलेली ही स्थिती आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून अचानक अंतराळात प्रवेश करताना एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर अनेक प्रभावांचा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यात मळमळ, चक्कर येणे, डोकेदुखी आणि अत्यंत थकल्यासारखे वाटणे यांसारख्या अस्वस्थता निर्माण करणाऱ्या लक्षणांचा समावेश असू शकतो,” असे मुंबई परळमधील ग्लेनेगल्स हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्स व वरिष्ठ सल्लागार डॉ. अनुप खत्री यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.
शारीरिक प्रभाव
या सिंड्रोमला कारणीभूत ठरू शकणारे मुख्य कारण म्हणजे शरीराला ‘अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी लागणारा थोडा वेळ’. “तुम्हाला आणि तुमच्या शरीराला एक किंवा दोन आठवड्यांमध्ये पृथ्वी आणि अंतराळ यांमधील सर्व फरकांची सवय होऊ शकते. पण, पहिले काही दिवस तणावपूर्ण आणि त्रासदायक असू शकतात,” असे डॉ. खत्री यांनी स्पष्ट केले.
वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल क्रिटिकल केअरचे एचओडी व सल्लागार डॉ. स्वप्नील एम. खडके यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, याला ‘स्पेस सिकनेस’, असे म्हणतात. हा कमी किंवा शून्य गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे अंतराळवीरांना होणारा आजार आहे; ज्यामुळे शरीराच्या वेस्टिब्युलर ओरिएंटेशन आणि समतोल कार्यांमध्ये तात्पुरत्या काळसाठी बिघाड होतो. कानाच्या आत असलेली वेस्टिब्युलर सिस्टीम (vestibular system) गुरुत्वाकर्षण ओळखून शरीराचा समतोल राखण्यास मदत करते. अशा प्रकारे SAS ची लक्षणे उलट्या, मळमळ, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा इत्यादीसारख्या ‘मोशन सिकनेस’सारखीच असतात.
डॉ. खडके यांनी सांगितले, “एसएएस आणि त्याची लक्षणे प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी, प्रोमेथाझिन (promethazine) व स्कोपोलामाइन (scopolamine) यांसारखी साधी अँटीमेटिक्स (antiemetics) औषधे वापरली जाऊ शकतात, जी मळमळ होण्यासारख्या त्रासावर उपचार करण्यास मदत करतात. अशा स्थितीत योग्यरीत्या विश्रांती घेतली पाहिजे, डोक्याची हालचाल करताना अचानक झटके बसणार नाही याची काळजी घ्यावी आणि निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी किंवा द्रव पदार्थ प्यावेत.
हेही वाचा – अल्लू अर्जुनने सांगितले आहारासह फिट राहण्याचे रहस्य, “रोज सकाळी रिकाम्या पोटी….”; तज्ज्ञांचे मत काय?
डॉ. खत्री यांनी स्पष्ट केले की, अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांना अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणाची नक्कल करणाऱ्या सिम्युलेटरमध्ये प्रशिक्षण देऊन, हळूहळू एक्स्पोजर दिले जाते. त्यामुळे त्यांना अचानक होणाऱ्या बदलाची सवय होऊन, त्यांचे मन आणि शरीर त्या वातावरणाला सरावण्यास मदत होऊ शकते. श्वासोच्छ्वास व आराम करण्याच्या तंत्राचा सराव केल्याने तुम्हाला शांत आणि संयोजित राहण्यास साह्य मिळू शकते. अंतराळवीरांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, अनुकूलतेची वेळ व्यक्तीनुसार बदलू शकते. काहींना काही दिवसांनी बरे वाटू शकते; तर काहींना परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी एक आठवडा किंवा अधिक वेळ लागू शकतो. परंतु, धैर्याने परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे.
SAS सामान्यत: काही दिवसांत बरा होतो. औषधोपचार हाताशी ठेवणे आणि दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवणे यांसारख्या खबरदारीचे उपाय करणे फायदेशीर ठरू शकते, असे डॉ. खडके म्हणाले.