Garlic Side Effect: महाराष्ट्रात मराठमोळ्या घरात लसूण नाही असं फार क्वचितच होत असेल. लसणाचा गंध व स्वाद हा तिखट व उग्र असतो. लसणाचा वापर कच्चा व शिजवून दोन्ही पद्धतीने केला जातो. अगदी साध्या वरणाला लसणाची फोडणी दिली की लगेच दाल तडका तयार होतो. हिरव्या लसणाची चटणी, लाल लसणाची चटणी, इतकंच नव्हे तर लसणाचं लोणचं सुद्धा अगदी रोजच्या जेवणात सुद्धा वेगळाच स्वाद येतो. लसणाचे सेवन हे अनेक आजारांमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते पण… असे तीन आजार आहेत ज्यामध्ये लसूण खाणे हे विषासमान ठरू शकते.
एम्स रुग्णालयाचे माजी सल्लागार व साओल हार्ट सेंटरचे संस्थापक व संचालक डॉ. बिमल झांजेर यांच्या माहितीनुसार लसणाचे सेवन हे किडनीचे विकार दूर करण्यात फायदेशीर ठरू शकते तसेच यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढू शकते. डायबिटीजमध्ये ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास लसणाचे सेवन मदत करू शकते. मात्र खालील तीन आजारात लसूण तुमचा त्रास वाढवू शकतो,हे आजार कोणते जाणून घेऊयात..
लिव्हरचे त्रास (Liver Disease)
जर आपल्याला फॅटी लिव्हर संबंधित त्रास असेल तर आपण लसणाचे सेवन वर्ज्य करणे हिताचे ठरेल. लसणाच्या सेवनाने आपला त्रास वाढू शकतो. जीवोत्तमा आयुर्वेद केंद्राचे आयुर्वेदिक वैद्य डॉ. शरद कुलकर्णी सांगतात की लसणामुळे आपल्या लिव्हरमध्ये टॉक्सिन्स जमा होऊ शकतात. लसणामध्ये एलिसिन नामक एक घटक असतो ज्यामुळे लिव्हरमध्ये टॉक्सिक पदार्थ जमा होऊन विपरीत परिणाम होऊ शकतो.
ऍसिडिटी (Acidity)
जर आपल्याला ऍसिडिटीचा त्रास असेल तर आपल्याला लसणाचे सेवन करणे टाळायला हवे. लसूण हा उग्र असतो यामुळे ऍसिडिटीचा त्रास वाढू शकतो. लसणाची चटणी खाल्ल्यावर विशेषतः ऍसिडिटी वाढणे, छातीत जळजळ जाणवणे, करपट ढेकर येणे असे त्रास जाणवू शकतो.
हे ही वाचा<< लवंग भिजवून खाल्ल्याने डायबिटीजसह ‘हे’ ७ त्रास वेगाने होतात दूर? दिवसात कसे व किती करावे सेवन?
उलटी व मळमळ (Nausea Ans Vomiting)
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट द्वारे प्रकाशित केलेल्या एका अहवालात ज्या लोकांना उलटी व मळमळ जाणवते त्यांना लसूण खाणे टाळायला हवे. लसणाच्या सेवनाने तुमचा स्वभावही चिडचिडा होऊ शकतो. लसणाच्या सेवनाने शरीरात जीईआरडी हे टॉक्सिन्स वाढते व त्यामुळे उलटी व मळमळ जाणवू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)