सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना फास्ट फूड खायला आवडते. पिझ्झा, बर्गर, सँडविचसारखे पदार्थ लोक आवडीने खातात. काहींना मोमोजथही खूप आवडतात. हल्ली सगळीकडे मोमोजचे स्टॉल लावलेले दिसून येतात आणि या स्टॉलवर मोमोजप्रेमींची तुफान गर्दी दिसून येते. पण मोमोज नेहमी खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे का? याविषयी मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेसशी’ बोलताना माहिती दिली.
त्या सांगतात, “मोमोज हे वाफवलेले असतात आणि त्यात भाज्या किंवा मांस-मटणाचा वापर केला जातो तरीसुद्धा त्यात पौष्टिक घटक कमी असतात. यात मैदा किंवा रिफाइंड पिठाचा अतिवापर केला जातो. विशेष म्हणजे जेव्हा तुम्हाला कळेल की, महिनाभर मैदा न खाणे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, तेव्हा जर तुम्ही मैदा न खाण्याचा विचार कराल तर मोमोज खाणेही तुम्हाला सोडावे लागेल. “
हेही वाचा : माणूस न जेवता किती दिवस जगू शकतो? प्रत्येक दिवशी शरीरात काय बदलतं, शरीराचं गणित नीट जाणून घ्या
उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल सांगतात, “मोमोज आठवड्यातून एक प्लेट खाण्यास काहीही हरकत नाही. जोपर्यंत तुम्ही संतुलित आहार घेता आणि त्याविषयी नेहमी जागरूक असता तोपर्यंत तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम दिसून येत नाही. आरोग्यावर परिणाम होऊ न देता, मोमोजचा आनंद घेण्यासाठी मोमोज करण्याची पद्धत, त्यात वापरण्यात आलेल्या सामग्रीची माहिती घेणे गरजेचे आहे.”
आहारतज्ज्ञ सिंघवाल आणि सामंत यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना मोमोजमध्ये असलेल्या सामग्रीच्या आधारावर मोमोज नेहमी खाणे चांगले आहे का, हे समजावून सांगितले आहे.
मैदा
मोमोजचे बाहेरील आवरण तयार करण्यासाठी मैदा वापरला जातो. मैदा हा गव्हाचा असा प्रकार आहे की, ज्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळे यातील पोषक घटक आणि फायबर नष्ट होते. नेहमी मैद्याचा वापर केल्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. त्यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे आजार वाढतात.
हेही वाचा : Eating Food : दर दोन तासांनी खाणे चांगले आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG)
मोमोज तयार करण्यासाठी मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG)चा वापर केला जातो. त्यामुळे पचनशक्ती मंदावते आणि लठ्ठपणा वाढू शकतो. मोनोसोडियम ग्लुटामेट हे ग्लुटामिक ॲसिडपासून बनवले जाते. यात सोडियम असते; जे उच्च रक्तदाब आणि किडनीचा आजार असलेल्या लोकांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे या लोकांनी मोमोज खाणे टाळावे.
सामग्रीची गुणवत्ता
अनेक जण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या स्टॉलवरील मोमोज खातात. हे मोमोज अतिशय स्वस्त दरात विकले जातात. कारण- या मोमोजमध्ये वापरली जाणारी सामग्री निकृष्ट दर्जाची असते. अनेकदा लोकप्रिय स्टॉलवरून खाताना किंवा पैसे वाचवताना ग्राहक सामग्रीच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नाहीत.
अनेक मोमोजविक्रेते भरपूरर नफा मिळविण्यासाठी कमी दर्जाची सामग्री वापरतात; पण त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो.
मांस आणि भाज्या
अनेकदा वाफवलेले पदार्थ चांगले शिजलेले नसतात. मोमोज करताना मांस किंवा भाज्या चांगल्या न शिजल्यामुळे उलट्या किंवा जठरासंबंधीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
हेही वाचा : ढोबळी मिरची खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहितीयेत का? आहारतज्ज्ञांकडून जाणून घ्या …
चटणी
मोमोजची चव वाढवण्यासाठी त्याबरोबर जी चटणी दिली जाते, ती खूप मसालेदार असते. त्यात लाल मिरची पावडरचाही अतिवापर केला जातो. त्यामुळे अॅसिडिटी, पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो.
आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी मोमोज खाताना खालील गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे :
- वाफवलेले मोमोज खा; तळलेले मोमोज खाणे टाळा.
- चरबीयुक्त पदार्थांपेक्षा चिकनचे मोमोज खा.
- सोडियम सॉस आणि मसाल्यांचे कमी सेवन करा.
- संतुलित आहाराचा विचार करता, नेहमी मोमोज खाणे टाळा.
मोमोज बनवताना किंवा खाताना स्वच्छता पाळा.
एखाद्या वेळी मोमोजचा आनंद घेणे काहीही चुकीचे नाही किंवा आरोग्यास कोणताही धोका नाही; पण दीर्घकाळ चांगले आरोग्य राहण्यासाठी आरोग्यदायी आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.