Bhang Side Effects on Heart Health : होळी हा रंगाचा उत्सव आहे. या उत्सवात भांग पिण्याची जुनी परंपरा आहे. होळीला हे खास पेय तयार केले जाते, ज्याला थंडाईसुद्धा म्हणतात. पण, खूप जास्त भांग प्यायल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो का? याविषयी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे इंटरव्हेशन कार्डिओलॉजिस्ट डॉ. हर्षल इंगळे यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर माहिती सांगितली आहे.
ते सांगतात, मागच्या वर्षी एक ३५ वर्षीय पुरुष माझ्या क्लिनिकमध्ये आला आणि छातीत वेदना तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगत होता. तो नियमित मद्यपान करायचा, पण त्याने सांगितले की होळीदरम्यान त्याने भांग प्यायली, त्यानंतर त्याला खूप घाम येत होता आणि त्याची हृदय गती प्रति मिनिटाला १२० बीपीएम एवढी होती. आम्ही त्याची अँजिओप्लास्टी केली आणि त्याला तीन दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज दिला.

खरंच गांजाच्या सेवनामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो का?

गांजाच्या सेवनामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. तरुणांमध्ये हृदय गती आणि रक्तदाब वाढतो, म्हणजेच हृदय आणि त्यांच्या धमन्यांवर ताण येतो, त्यामुळे प्लेक फुटू शकतात किंवा रक्त गोठून त्याच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार गांजाच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका जास्त वाढतो. नियमित गांजाचे सेवन करणाऱ्यांना २५% हृदयविकाराचा आणि ४२% स्ट्रोकचा धोका वाढतो.

होळीच्या दिवशी तुम्ही कोणती पेये पिता?

होळीच्या दिवशी काही लोक मद्यपान करतात तर काही लोक भांग पितात. भांग हे कॅनाबिस सॅटिवा (cannabis sativa) वनस्पतीपासून तयार होते आणि त्यातील घटक आराम देतात आणि आनंद देतात. याचे अधूनमधून सेवन केल्याने निरोगी व्यक्तीला कोणतीही हानी पोहोचत नाही, पण हृदयरोग असलेल्या लोकांसाठी भांग पिणे धोकादायक ठरू शकते.

हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि अचानक वाढतात

शरीराच्या आतील मज्जासंस्थेत भांग किंवा मद्य सक्रिय होते, ज्यामुळे हृदयाची गती प्रति मिनिटाला २०-५० ठोक्यांच्या वेगाने वाढते. यामुळे हृदयाला ऑक्सिजनची जास्त गरज भासते, जे कोरोनरी आर्टेरी डिसिज (CAD) किंवा हृदयाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांसाठी धोकादायक ठरते. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, गांजाच्या सेवनानंतर एका तासाच्या आत हृदयविकाराचा धोका जवळजवळ पाच पटीने वाढतो, ज्यामुळे भांगेचे सेवन हृदयविकार असलेल्यांसाठी धोकादायक ठरू शकते.

रक्तदाबातील चढउतार

अतिप्रमाणात मद्यपान केल्याने रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांच्या रक्तवाहिन्यांच्या रुंदीत आणखी वाढ होते, ज्यामुळे रक्तदाब आणखी मंदावतो. उच्च रक्तदाब किंवा स्ट्रोकचा त्रास असलेल्या लोकांना रक्तदाबातील चढउतार जीवावर बेतू शकतो.

हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो

अति प्रमाणात मद्यपान केल्याने रक्ताच्या प्लेटलेट्स एकत्र येऊ शकतात, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि हृदयाला रक्त पुरवठा करण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

भांगयुक्त पेये हृदयाशी संबंधित औषधांचे चयापचय करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या यकृतातील एन्झाइम्सना रोखू शकतात, यामुळे रक्तप्रवाहात औषधांची पातळी वाढते, ज्यामुळे विषारीपणा निर्माण होतो. यामुळे रक्त पातळसुद्धा होऊ शकते, जे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे कारण त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव किंवा रक्त गोठू शकते.

हृदयविकाराचा धोका

अतिप्रमाणात मद्यपान केल्याने हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, यामुळे अनियमित हृदयाचे ठोके किंवा हृदयाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याने हृदयाला रक्तपुरवठा करण्यास अडचण येऊ शकते, छातीत वेदना जाणवू शकतात किंवा अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

कोणतीही शंका असल्यास तुमच्या हृदयरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Story img Loader