सकाळी उठणे ही अत्यंत चांगली सवय आहे आणि या सवयीचा आरोग्यास भरपूर फायदा होतो. त्यामुळे डॉक्टर आपल्याला नेहमी पहाटे उठण्याचा सल्ला देतात. सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. काही तज्ज्ञांच्या मते, सूर्योदयापूर्वी उठल्यामुळे आपले शरीर डिटॉक्स करण्यास मदत मिळते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, शरीर डिटॉक्स करणे म्हणजे नेमके काय? शरीर डिटॉक्स करणे म्हणजे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणे, होय.

डॉ. डिंपल जांगडा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या सांगतात, “जर तुम्ही सूर्योदयाच्या ४५ मिनिटांपूर्वी उठलात आणि काहीही न करता, तुम्ही फक्त सरळ बसला आणि डोळे बंद केलेत, तर त्यामुळे तुमच्या शरीरातील विषाक्त घटक बाहेर पडतील. तुमच्या आतड्यांमध्ये हालचाली जाणवतील; ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होऊ शकतो आणि तुमचे पोट साफ होऊ शकते.”

खरंच यामागे विज्ञान आहे?

पीएफसी क्लबचे (PFC Club) संस्थापक चिराग बडजात्या सांगतात, “सूर्योदयाच्या ४५ मिनिटांपूर्वी उठणे आवश्यक असल्याचा असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. भारतात सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा ठरलेल्या आहेत. त्यामुळे विशिष्ट वेळी उठण्याची आवश्यकता नाही. डिटॉक्सिफिकेशन हे चांगले आरोग्य, सौंदर्य व निरोगीपणा यासाठी अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आपल्याला वेळोवेळी आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणे आवश्यक आहे. पण, याविषयी कोणतेही वैज्ञानिक पुरावे दिसून येत नाहीत.”

हेही वाचा : पावसाळ्यात तुम्हालाही यूटीआयचा त्रास जाणवतोय? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि योग्य उपचार पद्धती

जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार नसेल, तर शरीरातून विषारी घटक काढून टाकण्याची क्षमता तुमच्यामध्ये असते; ज्यामुळे तुम्ही सातत्याने शरीराचे शुद्धीकरण करू शकता. या शुद्धीकरणांतर्गत तुम्ही विषारी आणि खराब पदार्थ शरीराच्या बाहेर टाकू शकता.
“शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी कोणत्याही विशिष्ट स्थितीमध्ये बसण्याची गरज नाही. एखाद्या विशिष्ट वेळी उठल्यामुळे डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेवर परिणाम होतो, असा कोणताही पुरावा नाही”, असे चिराग बडजात्या सांगतात.

बडजात्या पुढे सांगतात, “कामाच्या ठिकाणी शिफ्ट, अपूर्ण झोप यांमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. स्थूलता, टाईप-२ मधुमेह व डिस्लिपिडेमिया यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.” डिस्लिपिडेमिया हा एक चयापचयाशी संबंधित आजार आहे. रक्तातील लिपिड्स जेव्हा अनियंत्रित होतात, तेव्हा डिस्लिपिडेमिया आजार होतो.

“शरीरातून विषारी घटक बाहेर काढण्यासाठी कोणत्याही विशिष्ट प्रकारची जीवनशैली किंवा आहार घेण्याचा सल्ला दिला जात नाही; पण यकृत निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो. कारण- यकृत हा डिटॉक्सिफिकेशनसाठी एक महत्त्वाचा अवयव आहे. साखर आणि सॅच्युरेटेड फॅट्स कमी प्रमाणात खाणे आणि त्याशिवाय फायबरयुक्त पदार्थांचे जास्त सेवन करणे फायदेशीर ठरू शकते”, असे बडजात्या सांगतात.