Effects of Tight Clothing: फॅशन बहुतेकदा आपल्या कपड्यांच्या निवडीवर अवलंबून असते; परंतु कधी कधी फॅशनच्या नादात घातलेल्या कपड्यांमुळे आपल्या शरीराचे नुकसान होऊ शकते. दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिनमधील प्रमुख सल्लागार डॉ. नरेंद्र सिंघला यांनी, “घट्ट कपडे आपल्या शरीरावर अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा विविध प्रकारे कसे परिणाम करू शकतात”, हे स्पष्ट केले.

जेव्हा आपण खूप घट्ट कपडे घालतो तेव्हा आपले शरीर अनेक प्रकारे प्रतिक्रिया देते, असे डॉ. सिंघला म्हणाले.

शरीरावर त्वरित दुष्परिणाम

१) त्वचेची जळजळ : घट्ट कपडे त्वचेवर घर्षण निर्माण करू शकतात, ज्यामुळे जळजळ, लालसरपणा व पुरळदेखील येऊ शकतात.

२) नसांचे आकुंचन : घड्ड कपड्यांमुळे नसांचे आकुंचन हा एक सामान्य दुष्परिणाम आहे. त्यामुळे सुन्नपणा, मुंग्या येणे किंवा वेदनादेखील होऊ शकतात. कालांतराने हे नसांचे आकुंचन आणखी वाढू शकते.

३) श्वास घेण्यास समस्या : छाती किंवा पोटाभोवती घट्ट कपडे घातल्याने हालचाल करण्यास अडचण येऊ शकते, ज्यामुळे श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होतो. त्याव्यतिरिक्त थकवा आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते.

४) रक्ताभिसरणात बिघाड: पाय किंवा कंबरेभोवती अत्यंत घट्ट कपडे घातल्याने रक्तप्रवाह रोखला जाऊ शकतो. रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे सूज येऊ शकते किंवा व्हेरिकोज व्हेन्स किंवा अत्यंत प्रकरणांमध्ये रक्ताच्या गुठळ्यासारखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.

घट्ट कपड्यांमुळे होणारे दीर्घकालीन नुकसान

घट्ट कपडे घालण्याचे अल्पकालीन परिणाम व्यवस्थापित करता येऊ शकतात, असे वाटत असले तरी दीर्घकालीन वापराचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात. डॉ. सिंघला कालांतराने विकसित होणारे आरोग्याचे अनेक धोके दाखवून देतात.

१) गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या : पोटाभोवती सतत दाब राहिल्याने अ‍ॅसिड रिफ्लक्स, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) व गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (GERD) यांसारखे आजार वाढू शकतात किंवा अगदी सुरूही होऊ शकतात. घट्ट कपडे घातल्याने पोटाचा दाब वाढतो आणि पोटातील अ‍ॅसिड वरच्या दिशेने ढकलले जाऊन अस्वस्थता निर्माण होते.

२) संसर्गाचा धोक वृद्धिंगत : महिलांच्या विशेषतः मांडीच्या भागात ओलावा निर्माण करणारे घट्ट कपडे यीस्ट इन्फेक्शनसाठी पूरक वातावरण तयार करू शकतात.

३) तीव्र मज्जातंतू वेदना : घट्ट कपड्यांमुळे सतत मज्जातंतू दाबले जात असल्याने कायमची सुन्नता होणे, मुंग्या येणे किंवा अगदी तीव्र वेदनादेखील होऊ शकतात. घट्ट कपडे घालणे बंद केल्यानंतरही ही स्थिती दूर करणे कठीण होऊ शकते.

४) व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास वाढण्याची शक्यता : घट्ट कपड्यांमुळे दीर्घकाळ रक्तप्रवाह रोखला गेल्याने व्हेरिकोज व्हेन्सचा विकास होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये दीर्घकालीन प्रतिबंधित रक्ताभिसरणामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात, ज्यामुळे आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होतात, जसे की डीप व्हेन थ्रोम्बोसिस.

५) स्नायूंवर ताण : घट्ट कपडे घालल्याने तुमच्या शरीराच्या पोश्चरमध्ये बदल होऊ शकतो. उदाहरणार्थ, घट्ट बेल्ट किंवा कमरेवर पट्टे तुमच्या पाठीच्या खालच्या भागात जास्त ताण येऊ शकतात, ज्यामुळे स्नायूंमध्ये वेदना होतात. दीर्घकाळापर्यंत चुकीच्या पोश्चर राहिल्यामुळे मान, पाठ आणि सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.

६) श्वसनाच्या समस्या : घट्ट कपड्यांमुळे होणारे उथळ श्वास कालांतराने श्वसनसंस्थेवर परिणाम करू शकतात. जे लोक वारंवार घट्ट कपडे घालतात, त्यांना दीर्घकालीन श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात.

७) त्वचेचे आजार : घट्ट कपड्यांमुळे त्वचेवर दीर्घकाळ जळजळ राहिल्याने एक्झिमा किंवा त्वचारोग यांसारखे जुनाट आजार होऊ शकतात. जर जळजळ कायम राहिली, तर त्यामुळे त्वचेचे संक्रमणदेखील होऊ शकते.