Sugarcane Benefits : सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात उसाचा ताजा आणि थंडगार रस पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. ऊस ही निसर्गाने दिलेली आरोग्यवर्धक देणगी आहे. उसाचा गोडपणा आणि त्यापासून मिळालेल्या पौष्टिक फायद्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ऊस हा रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापासून पचनक्रियेस मदत करतो. जीवनशैली सुधारण्यासाठी उसाचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी उसाचे फायदे आणि उसाचे सेवन करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी याविषयी द इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर माहिती दिली आहे.
उसामध्ये कोणते पौष्टिक घटक आहेत?
आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी १०० ग्रॅम कच्च्या उसामध्ये कोणते पौष्टिक घटक आहेत, याविषयी सांगितले आहे.
- कॅलरीज – ४३
- कर्बोदके – ११.८ ग्रॅम
- फायबर – ०.५ ग्रॅम
- साखर – ८.९७ ग्रॅम
- प्रथिने – ०.२७ ग्रॅम
- फॅट्स – ०.२३ ग्रॅम
- व्हिटॅमिन सी
- कॅल्शियम
- लोह
- मॅग्नेशियम
- पोटॅशियम
उसाचे आरोग्यवर्धक फायदे
हायड्रेशन – उसाचा ताजा आणि थंडगार रस शरीरातील पाण्याची कमतरता दूर करतो आणि शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतो.
पचनशक्ती – उसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात; जे पचनाशी संबंधित समस्या दूर करतात.
ऊर्जा वाढवते – उसामध्ये असलेली नैसर्गिक साखर दिवसभर ऊर्जा टिकविण्यास मदत करते.
इलेक्ट्रोलाइट संतुलन – उसामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे असतात; ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत होते.
अँटिऑक्सिडंट्स – उसामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात; जी शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.
हेही वाचा : उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स
मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचे सेवन करावे का?
उसामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते आणि त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी कमी प्रमाणात उसाचे सेवन करावे. त्याचबरोबर रक्तातील साखरेची मात्रा नियमित तपासणे गरजेचे आहे.
गर्भवती महिलांनी उसाचे सेवन करावे का?
गर्भवती महिला उसाचे योग्य प्रमाणात सेवन करू शकतात. सिंघवाल यांच्या मते, उसाचे सेवन केल्याने गर्भवती महिलांच्या शरीरास भरपूर पाणी आणि ऊर्जा मिळते.
उसाचे सेवन करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
अॅलर्जी – काही लोकांना उसाची अॅलर्जी असू शकते. जर तुम्हाला उसापासून अॅलर्जी असेल, तर उसाचे किंवा उसाच्या रसाचे सेवन कधीही करू नये.
साखरेचे प्रमाण – ऊसामध्ये नैसर्गिक साखर असते. त्यामुळे रक्तातील साखरेची मात्रा लक्षात घेऊनच उसाचे सेवन करावे.
अतिप्रमाणात सेवन करू नये – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. तेव्हा उसाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे; अन्यथा वजन वाढण्याची शक्यता असते.
उसाविषयी कोणते गैरसमज आहेत?
आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी उसासंदर्भातील काही गैरसमज दूर केले आहेत.
१. उसामुळे मधुमेह बरा होतो.
ऊस हा संतुलित आहाराचा एक भाग आहे; पण उसामुळे मधुमेह बरा होऊ शकत नाही.
२. कर्करोग बरा होण्यासाठी ऊस फायदेशीर आहे.
उसामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात; जी आपल्या आरोग्यासाठी चांगली असतात. पण. उसामुळे कर्करोग बरा होत नाही.