knee Pain: जर तुम्ही दररोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ मॅन्युअल कार चालवत असाल, तर तुम्हाला पॅटेलर टेंडिनोपॅथी नावाचा वेदनादायक आजाराचा धोका उद्भवू शकतो. “गाडी चालवताना चुकीच्या पद्धतीने बसणे हे गुडघेदुखीचे एक कारण ठरू शकते. जर तुम्ही योग्य पद्धतीने बसला नाही तर गुडघ्याच्या सांध्यांवर ताण वाढू शकतो. अॅक्सिलेटर, ब्रेक आणि क्लचपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे गुडघे योग्य स्थितीत असणे अत्यंत आवश्यक आहे,” असे ऑर्थोपेडिक डॉ. मनन वोरा म्हणाले.
अशा कारमध्ये ड्रायव्हरला गिअर स्टिक, क्लच आणि पेडल वापरून मॅन्युअली गिअर्स बदलावे लागतात, तर ऑटोमॅटिक कारमध्ये ड्रायव्हरला गिअर्स मॅन्युअली बदलण्याची आवश्यकता लागत नाही.
मारेंगो एशिया हॉस्पिटल्स गुरुग्रामच्या ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंटचे अध्यक्ष डॉ. हेमंत शर्मा यांनी सांगितले की, या आजाराचे दुसरे नाव पॅटेलोफेमोरल पेन सिंड्रोम (पीएफपीएस) आहे, जो गुडघ्याच्या समोरील भागात होणाऱ्या आणि गुडघ्याच्या सांध्याभोवती होणाऱ्या अस्वस्थतेसाठी एक सामान्य शब्द आहे. “हे जास्त वेळ बसणाऱ्या व्यक्तींमध्ये वारंवार आढळत असल्याने याला धावपटूचा गुडघा असेही म्हणतात,” असे डॉ. शर्मा म्हणाले.
गाडी चालवताना पायांची हालचाल मर्यादित असल्याने, चालकाच्या गुडघ्याला जास्त वेळ स्थिर राहावे लागते, त्यामुळे त्याचा त्रास आणखी वाढतो. “पेडलवर, विशेषतः ब्रेक आणि अॅक्सिलेटरवर सतत दबाव आणल्याने गुडघ्याच्या सांध्यावर ताण पडतो. गाडी चालवल्याने गुडघ्याच्या सभोवतालच्या स्नायूंमध्ये कडकपणा येऊ शकतो, ज्यामुळे मर्यादित हालचाली आणि लवचिकतेच्या अभावामुळे सूज आणि वेदना होतात,” असे डॉ. शर्मा यांनी सांगितले.
गुडघ्याच्या वाटीखालील दाब वाढतो, कारण स्नायू पुरेसे ताणलेले नसतात, ज्यामुळे बराच वेळ बसून उठल्यानंतर वेदना होतात. “या वेदनांमुळे आणि जडपणामुळे पायऱ्या चढणे, वाकणे आणि इतर दैनंदिन कामे करणे कठीण होऊ शकते,” असे डॉ. शर्मा म्हणाले.
डॉ. वोरा यांच्याकडून काही टिप्स
कार चालवताना तुमची सीट खूप मागे ठेवू नका. पेडलच्या थोडे जवळ जा.
पेडल वापरताना तुमचा पाय गुडघ्यापासून ३० अंशांपेक्षा जास्त कोनात नसावा याकडे लक्ष द्या.
लांब प्रवासात ब्रेक घ्या, जेणेकरून तुम्ही दर ४५ मिनिटांनी किमान एकदा गाडीतून बाहेर पडून तुमचे पाय मोकळे करा.
डॉ. शर्मा यांनी दिलेल्या काही टिप्स
तुमच्या सीटची उंची अशी सेट करा की तुमचे गुडघे ९० अंशांपर्यंत वाकू शकतील आणि तुम्हाला त्रास होणार नाही.
पायांवर सततचा ताण कमी करण्यासाठी, शक्य असेल तेव्हा क्रूझ कंट्रोल वापरा. “तुम्ही गुडघ्याच्या स्नायूंना मजबूत करणारे व्यायाम करण्याचा विचारदेखील करू शकता. बसण्याची स्थिती सुधारण्यासाठी कुशन वापरून आणि गुडघ्याला आधार देऊनही ताण कमी करता येतो,” असे डॉ. शर्मा म्हणाले.