Overwhelming : माणूस म्हटलं की भावना या मनात येणारच. भावूक होणे, भावना व्यक्त करणे काहीही चुकीचं नाही; पण काही लोकं अनेकदा खूप जास्त आणि पटकन भावूक होतात. सार्वजनिक ठिकाणी जर अति भावूक झाले की त्यांना काय करावं आणि काय करू नये असं होतं. इंटिग्रेटेड न्यूट्रिशनिस्ट, हेल्थ कोच, सायकोलॉजिस्ट करिश्मा शाह यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’बरोबर बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली.
शाह यांच्या मते, “अशा परिस्थितीत सुरुवातीला हे समजून घेणे खूप जास्त गरजेचे आहे की आपण इतरांपेक्षा वेगळे असू शकतो.”
शाह पुढे सांगतात, “एक संवेदनशील माणूसच असा जन्माला येऊ शकतो. या गोष्टी आपल्या जीन्स आणि डीएनएशी संबंधित आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संवेदनशील असणं हे फक्त आपल्या भावनिक संवदेनशीलतेपर्यंतच मर्यादित नसते, तर याचा परिणाम अनेकदा शारीरिक आरोग्यावरही दिसून येऊ शकतो.”
हेही वाचा : ‘Eye Flu’ची तीव्रता कशी समजून घ्यावी आणि त्यानुसार कोणते औषध घ्यावे? वाचा, नेत्रतज्ज्ञ काय सांगतात…
मेंटल हेल्थ अँड इमोशनल वेलनेस प्लॅटफॉर्मच्या सायकोलॉजिस्ट लाहारिका अरासू सांगतात, ” जर मज्जासंस्था (nervous system) खूप जास्त संवेदनशील असेल, तर अशा स्थितीत ताण तणाव खूप जास्त वेळापर्यंत जाणवतो; ज्यामुळे व्यक्तीमध्ये शारीरिक आणि भावनिक लक्षणे दिसून येतात.”
अरासू सांगतात, “काही लोक इतरांपेक्षा खूप जास्त भावूक होतात, कारण प्रत्येकाची प्रतिक्रिया, सामना करण्याची क्षमता, व्यक्तिमत्त्व आणि भूतकाळातील अनुभव वेगवेगळे असू शकतात.”
मज्जासंस्था (nervous system) खूप जास्त संवेदनशील असल्याची काही लक्षणे जाणून घ्या.
- चिंता आणि पॅनिक अटॅक,
- निद्रानाश आणि झोपेची समस्या
- चिडचिड होणे आणि सतत मूड बदलणे,
- सतत वेदना होणे आणि ताण तणाव जाणवणे, पोटाच्या समस्या, थकवा जाणवणे, लक्ष केंद्रित करण्यास अडचण निर्माण होणे, विचार येणे आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून भावूक होणे.
स्वत:ला पटकन भावूक होण्यापासून असे थांबवा
१. श्वासावर लक्ष केंद्रित करा
अरासू सांगतात, “आरामदायी स्थितीत बसा. हळू हळू नाकाने श्वास घ्या आणि हा श्वास तोंडातून बाहेर सोडा. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि श्वासाला हळूवार स्थिर करण्याचा प्रयत्न करा.”
शाह यांनीसुद्धा श्वासोच्छ्वासाची ६-७-८ ही पद्धत सांगितली आहे. यामध्ये सहा काउंट मोजेपर्यंत श्वास घ्यावा, सात काउंट मोजेपर्यंत श्वास धरून ठेवावा आणि आठ काउंट मोजेपर्यंत श्वास सोडावा, असे सांगितले आहे.
हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’च्या चारूला ४१ व्या वर्षीच आला मेनोपॉज; मासिक पाळी लवकर बंद होण्याची कारणे काय?
२. शांत ठिकाण शोधा
एखादे शांत ठिकाण शोधा आणि तिथे बसा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. डोक्यातून सर्व विचार बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि फक्त वर्तमान क्षणाचा विचार करा.
३. स्नायूंना रिलॅक्स करा
स्नायूंवर थोडा ताण द्या आणि नंतर स्नायूला रिलॅक्स करा. तुमच्या पायाच्या बोटांपासून ते डोक्यापर्यंत सर्व स्नायूंना रिलॅक्स करा. हा तणावमुक्त होण्याचा चांगला पर्याय आहे.
अरासू सांगतात, “मज्जासंस्था जर खूप जास्त संवेदनशील असेल तर त्याचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.”
जेव्हा खूप जास्त वेळ ताण तणाव राहतो, तेव्हा मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे नातेसंबंध, काम आणि अनेक गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. जर तुम्हालाही अशी काही वरील लक्षणे आढळली, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा; यामुळे तुम्ही मानसिक आरोग्यावर होणारा नकारात्मक परिणाम टाळू शकता.