Respiratory Health : हिवाळ्यात तापमानात घट होते, त्याबरोबर प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढते; यामुळे श्वसनाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
वाशी येथील फोर्टिस नेटवर्क हॉस्पिटलच्या जनरल मेडिसिन सल्लागार डॉ. सुजाता चक्रवर्ती सांगतात, “श्वसनाशी संबंधित आजार वर्षभरात कधीही होऊ शकतात, पण काही कारणांमुळे हिवाळ्यात याचे प्रमाण जास्त आढळते. त्यापैकी काही खालील कारणे –

  • धुके, प्रदूषणाची पातळी वाढल्याने (स्मॉग) श्वास घेण्यास त्रास होतो
  • हिवाळ्यात घराच्या आत खराब व्हेंटिलेशन असल्याने आजार लवकर पसरतात
  • अस्थमा किंवा COPD सारख्या आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांना जास्त धोका असतो. थंड वातावरणामुळे दम्याचा त्रास वाढतो, ज्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता आणखी वाढते. जे लोक घरामध्ये जास्त वेळ घालवतात तेथे धुळीचे कण, पाळीव प्राण्यांचे केस, बुरशी इत्यादी कारणांमुळे अॅलर्जीचा धोका वाढतो.

डॉ. चक्रवर्ती यांच्या मते, हिवाळ्यात वारंवार होणाऱ्या श्वसनाशी संबंधित आजार खालीलप्रमाणे आहेत –

सर्दी : सर्दी हिवाळ्यात अत्यंत सामान्य आजार आहे. हा सहसा सौम्य असला तरी संसर्गजन्य आहे. अनेक प्रकारच्या विषाणूंमुळे सर्दीचा त्रास उद्भवतो.

इन्फ्लूएन्झा : वातावरण दूषित झाल्यामुळे इन्फ्लूएन्झा हा रोग पसरतो. इन्फ्लूएन्झाला फ्लूसुद्धा म्हणतात. हा विशिष्ट इन्फ्लूएंझा विषाणूंमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे, परंतु सामान्य सर्दीपेक्षा जास्त गंभीर आहे.

ब्राँकायटिस (Bronchitis) : जेव्हा फुफ्फुसात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या ट्यूब सूजतात तेव्हा खोकल्याचा त्रास उद्भवतो.

न्यूमोनिया : जेव्हा संसर्गामुळे फुफ्फुसातील ऑक्सिजनच्या पिशव्या द्रव किंवा खराब द्रवांनी भरतात, तेव्हा श्वास घेणे आणि रक्तप्रवाहास आवश्यक ऑक्सिजन पोहोचणे कठीण होते.

सायनुसायटिस : नाकाच्या आतील भाग (सायनस) फुगला किंवा सुजला तेव्हा ड्रेनेजमध्ये अडथळा निर्माण होतो आणि शेंबुड तयार होतो, ज्यामुळे नाक बंद होते आणि डोकेदुखीचा त्रास उद्भवतो

खालील मुद्दे लक्षात ठेवा आणि श्वसनाशी संबंधित आरोग्य जपा

१. उबदार कपडे परिधान करा आणि शरीराचे तापमान नियंत्रित करा.
२. आपले हात स्वच्छ ठेवा. तोंड, नाक किंवा डोळ्यांना अस्वच्छ हातांनी स्पर्श करणे टाळा.
३. जर तुमच्या अवतीभोवती हवेची गुणवत्ता खराब असेल, तर सकाळी फिरायला जाणे टाळा, कारण यावेळी विषारी पदार्थ हवेत जास्त प्रमाणात असतात. त्याऐवजी तुम्ही घरच्या घरी श्वसनाशी संबंधित योगा किंवा व्यायाम करू शकता.
४. तुमच्या फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यासाठी श्वसनाशी संबंधित व्यायाम करा.
५.. घर धूळ, बुरशीपासून स्वच्छ ठेवा. तुमचा बेड, गालिचे आणि सोफे नियमितपणे स्वच्छ करा.
६. धूम्रपान करू नका आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
७. घरी चांगले व्हेंटिलेशन ठेवा. तुम्ही एअर प्युरिफायर किंवा ह्युमिडिफायर वापरू शकता.
८. हिवाळ्यात भरपूर पाणी प्या. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वाफ घ्या. शक्यतो घरगुती उपचार घेण्याचा प्रयत्न करू नका, ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकते.
९. भरपूर फळे, भाज्या आणि प्रोटिनयुक्त पौष्टिक आहार घ्या. लिंबूवर्गीय फळे, हळद आणि आले रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकतात.
१०. प्रक्रिया केलेले, जंक, तळलेले तसेच तेलकट खाद्यपदार्थ खाणे टाळा, यामुळे घशात जळजळ निर्माण होऊ शकते.
११. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, फ्लू आणि न्यूमोनियासाठी लस घ्या.
१२. ज्यांना आधीच फुफ्फुसाशी संबंधित आजार आहेत, अशा लोकांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी डॉक्टरांकडून वारंवार तपासणी करा.

Story img Loader