Breast Cancer Myths : सध्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कर्करोगाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी सर्व स्तरावर विविध उपक्रम राबविले जातात. कर्करोगामध्ये हल्ली स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. मागील काही अभ्यासांमधून असे समोर आले आहे की, भारतात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण महिलांमध्ये वाढत आहे आणि तेही शहरी भागातील महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.
फरीदाबाद येथील अमृता हॉस्पिटलमधील स्तनाच्या कर्करोगाच्या ऑन्कोलॉजिस्ट सल्लागार डॉ. शिवेता राजदान सांगतात, “भारतात दरवर्षी स्तनाच्या कर्करोगाची सुमारे एक लाख प्रकरणे समोर येतात. देशातील एकूण लोकसंख्येपैकी १३.५ टक्के लोकांना स्तनाचा कर्करोग आढळतो आणि त्यामुळे होणारा मृत्यूदर १०.६ टक्के आहे.”
आता सोशल मीडियाच्या जगात स्तनाच्या कर्करोगाविषयी अनेक गैरसमज पसरवले जातात. या गोष्टीचा विचार करून द इंडियन एक्स्प्रेसनी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलच्या वरिष्ठ सर्जन डॉ. दिव्या सिंह यांच्या हवाल्याने माहिती दिली. डॉ. दिव्या सिंह यांनी स्तनाच्या कर्करोगाविषयी असलेले आठ गैरसमज सांगितले आहेत आणि त्याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.
१. फक्त महिलांना स्तनाचा कर्करोग होतो
महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळते. अशावेळी हे समजून घेणे गरजेचे आहे की, पुरुषांनासुद्धा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. या कर्करोगाविषयी कमी जागरुकता आणि याकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीमुळे पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत २५ टक्के जास्त मृत्यूदराचा सामना करावा लागतो.
२. ज्या महिलांच्या स्तनाचा आकार मोठा असतो त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते.
स्तनाचा आकार आणि कर्करोगाचा धोका याचा काहीही संबंध नाही. जरी लठ्ठपणा आणि स्तनाची घनता (density) कर्करोगाचा धोका वाढवते, तरी कुटुंबात यापूर्वी जर कुणाला स्तनाचा कर्करोग असेल किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे, याचा परिणाम सर्वात आधी स्तनाच्या कर्करोगावर दिसून येतो.
हेही वाचा : पुरुषांनो, सतत मोबाइल वापरता? कायमस्वरूपी वंध्यत्व निर्माण होऊ शकते; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात..
३. वयोवृद्ध महिलांनाच स्तनाचा कर्करोग होतो
वयानुसार स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, पण हा कर्करोग तरुण वयोगटातील महिलांसह सर्वच वयाच्या महिलांमध्ये आढळून येतो. तरुण वयातील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग अधिक आक्रमकरित्या दिसून येतो. लक्षणे आढळल्यानंतर लवकरात लवकर उपचार केल्यामुळे हा कर्करोग ओळखणे सोपा जातो.
४. स्तनाचा कर्करोग त्याच लोकांना होतो, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये यापूर्वी हा कर्करोग आढळून आलेला असतो.
जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना स्तनाचा कर्करोग यापूर्वी आढळून आला असेल, तर तुम्हालाही कर्करोग होण्याची शक्यता असते. पण, आतापर्यंत अशा अनेक लोकांना स्तनाचा कर्करोग आढळून आला आहे, ज्यांच्या कुटुंबात कोणालाही यापूर्वी हा कर्करोग नव्हता. फक्त दहा टक्के त्या लोकांना स्तनाचा कर्करोग होतो, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये यापूर्वी हा कर्करोग आढळून आलेला असतो.
५. स्तनाच्या कर्करोगाच्या गाठी खूप वेदनादायी असतात.
सर्वच प्रकारचे स्तनाचे कर्करोग वेदनादायी नसतात. अनेक प्रकरणांमध्ये वेदना होत नाहीत. विशेषत: कर्करोगाच्या सुरुवातीच्या काळात फार वेदना होत नाहीत. स्तनाच्या जागी होणारी वेदना किंवा अस्वस्थता हे एक लक्षण असू शकते, पण वेदना होत नाही म्हणून स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
६. ब्रा घातल्यामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.
ब्रा किंवा इतर कोणतेही कपडे घातल्यामुळे स्तनाचा कर्करोग होत नाही. असं म्हणतात, ब्रा आणि विशेषत: वायर ब्रामुळे स्तनामधून लिम्फ फ्लूडच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे टिश्यूमध्ये विषारी पदार्थ तयार होतात; पण याबाबत कोणताही पुरावा समोर आलेला नाही.
७. मॅमोग्रामुळे स्तनाचा कर्करोग होतो आणि सगळीकडे पसरतो
लवकरात लवकर स्तनाचा कर्करोग ओळखण्याचा मॅमोग्राम प्रभावी मार्ग आहे. मॅमोग्रामध्ये खूप कमी रेडिएशन एक्सपोजरचा वापर केला जातो. या रेडिएशन एक्सपोजरचा धोका खूप कमी असतो.
८. स्तनामध्ये जर गाठ आढळली तर कर्करोग होऊ शकतो.
जर तुमच्या स्तनामध्ये गाठ आढळली तर घाबरू नका. तज्ज्ञांकडे किंवा डॉक्टरांकडे तपासणी करा आणि त्यांचा सल्ला घ्या. स्तनामध्ये आढळलेल्या प्रत्येक गाठीचा कर्करोगाशी संबंध नसतो. जर अशी गाठ आढळल्यास लगेच तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या.