मागील लेखात आपण PLE या उन्हापासून होणाऱ्या आजाराबद्दल पाहिलं. पण या आजाराव्यतिरिक्तही उन्हापासून होणारे किंवा उन्हामुळे वाढणारे असे काही त्वचारोग आहेत. त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
काँग्रेस ग्रास डरमॅटायटिस ( Congress grass dermatitis ) -यालाच गाजर गवतामुळे होणारा त्वचारोग किंवा पार्थेनियम डरमॅटाइटिस असेही म्हणतात. अमेरिकन काँग्रेसने १९५० मध्ये भारतामध्ये अमेरिकेतून पाठवलेल्या गव्हाच्या पोत्यांमध्ये ह्या गवताचे बी होते आणि आपल्याकडे ते भरपूर फोफावत गेले. त्याला काँग्रेस गवत म्हणतात ,कारण त्याची फुले पांढरी शुभ्र असून, त्यांचा आकार गांधी टोपी सारखा दिसतो, जी त्या काळात काँग्रेसचे पुढारी आणि कार्यकर्ते वापरीत असत. या गवताचे परागकण हे सर्वदूर पसरतात व एखाद्या व्यक्तीला जर त्याची अॅलर्जी झाली तर ती आयुष्यभर टिकते.
हेही वाचा : Mental Health Special: आभासी जगातील बलात्कार, त्याचा मानसिक त्रास काय होता?
डॉक्टर रानडे, डॉक्टर लोणकर हे त्वचारोगतज्ञ व डॉक्टर जोग या पुण्यातील तीन डॉक्टरांनी १९६८ मध्ये वैद्यकीय नियतकालिकात लेख लिहून हा आजार प्रथम प्रकाशामध्ये आणला. अंगावर जिथे जिथे हे परागकण बसतात म्हणजेच थोडक्यात अंगाचा जो भाग उघडा आहे तिथे तिथे अतिशय खाजरे असे पुरळ उठते. जास्त खाजवल्यास लसही येते. त्वचा खाजवून जाड व काळी बनते व त्वचेचे बारीक बारीक पापुद्रे निघत राहतात. हा आजार जास्त करून संपूर्ण चेहरा, मान, हात व पायांचा उघडा भाग येथे होतो व शरीराच्या ज्या भागाला ऊन लागते त्या ठिकाणी तर तो आणखी जास्त प्रमाणात दिसतो. तळकोकणात हे गवत अस्तित्वात नसल्यामुळे इथे हा आजार दिसून येत नाही. परंतु देशावर व भारतातील इतर ठिकाणी हा आजार दिसून येतो.
हा आजार झालेल्या व्यक्तीने बाहेर पडताना पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घालणे, हातात हातमोजे, पायामध्ये पायमोजे घालणे, चेहरा देखील जास्तीत जास्त झाकून घेणे व पूर्ण घेराची मोठी हॅट वापरणे हे फार महत्त्वाचे आहे. एवढे सांभाळून देखील तो आजार पूर्णपणे जातो असे नाही. त्यामुळे त्यासाठी त्वचारोग तज्ञांच्या सल्ल्याने स्टिरॉईडची मलमे व गोळ्या तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही औषधे घ्यावी लागतात. ज्या ठिकाणी काँग्रेस ग्रास अस्तित्वात नाही अशा ठिकाणी गेल्यास हा आजार एक दोन महिन्यात आपोआप देखील बऱ्यापैकी कमी होऊ शकतो.
हेही वाचा : लहान मुलांच्या पित्तनलिकेतील अडथळे दूर करणे होणार सोपे, मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात प्रथमच सुविधा
दैनंदिन व्यवहारात आपण वेगवेगळी सौंदर्य प्रसाधने, पावडर, अत्तरे , सनस्क्रीन , स्प्रे वगैरे गोष्टी वापरत असतो. परंतु कधीकधी यातील रसायनांमुळे देखील उन जिथे पडते अशा त्वचेवर खाजरे लालट पुरळ येऊ शकते. तसेच लिंबू, मोसंबी, संत्री, गवार, बडीशेप वगैरे झाडांच्या फांद्या किंवा पाने अंगाला लागल्यास उन जिथे पडते अशा त्वचेवर अशा प्रकारे पुरळ येऊ शकते. याला फोटो कॉन्टॅक्ट डरमॅटायटिस असे म्हणतात.
काही विशिष्ट औषधे तोंडावाटे किंवा इंजेक्शनद्वारे शरीरात गेल्यानंतर काही व्यक्तींना फक्त जिकडे ऊन लागते त्याच त्वचेवर खाजणारे पुरळ उठते. ती त्वचा लालसर व खरबरीत होते. कधी कधी खाजणारे लालसर चट्टे अशा भागावर दिसतात. या आजाराला फोटो ड्रग ऍलर्जी असे म्हणतात. फक्त औषध घेतले पण उन्हात नाही गेलं तर हा आजार होत नाही. औषध घेऊन जर उन्हात जाणे झाले तरच ऊन जिथे लागते त्या ठिकाणी हा आजार होत असल्यामुळे याला फोटो ड्रग ऍलर्जी असे म्हणतात. प्रतिजैविके ( उदाहरणार्थ सल्फा, टेट्रासायक्लिन ), मधुमेहासाठी दिल्या जाणाऱ्या ठराविक गोळ्या, उच्च रक्तदाबांमध्ये किंवा हृदयरोगामध्ये लघवी जास्त होण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ठराविक गोळ्या, नायट्याच्या तसेच मनोविकाराच्या ठराविक गोळ्या यामुळे हा आजार होऊ शकतो. थोडक्यात एखादी गोळी चालू केल्यानंतर १ ते ४ आठवड्यात त्वचेवर जिथे ऊन लागते तिथे अॅलर्जी येत असल्यास गोळ्यांच्या अॅलर्जीची शक्यता ध्यानात ठेवावी.
हेही वाचा : शाकाहारी आहारात वैविध्य आणि संतुलन कसं राखायचं?
पेलाग्रा ( Pellagra ) दारुड्या व्यक्तींना कडक उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेवर जिकडे ऊन लागते अशा ठिकाणी त्वचा करपल्यासारखी किंवा भाजल्यासारखी होते. तसेच ती काळी-तांबडी व कोरडी पडते. त्वचा शुष्क होऊन तिच्यावर भेगा पडतात व त्वचेची आग होते. मानेच्या समोरील व्ही आकाराचा उघडा भाग तसेच मानेचा पाठचा भाग, हातांच्या पाठचा भाग, तसेच पायांचा वरील भाग येथे हा आजार दिसून येतो. त्या जागेवर आग होते. तसेच अशा व्यक्तीला संडास पातळ होणे व तोंड येणे व आजार जास्त झाल्यास स्मृतिभ्रंश होणे अशी लक्षणे पाहावयास मिळतात. B3 (Niacin – नायासीन) या जीवनसत्वाच्या अभावामुळे हा आजार होतो. तसेच जिकडे बऱ्याच काळासाठी दुष्काळ किंवा युद्धजन्य परिस्थिती असते व त्यामुळे उपासमार घडते किंवा जिथे मका हे मुख्य अन्न आहे अशा ठिकाणच्या व्यक्तींनाही पेलाग्रा होण्याची शक्यता जास्त असते. पेलाग्रा झालेल्या व्यक्तींमध्ये इतरही जीवनसत्वांची व अन्न घटकांची कमतरता दिसून येते.
Connective Tissue Disease – ( CTD किंवा संयोजी उतक रोग ) – असे काही आजार आहेत की ज्यामध्ये आपली स्वयंप्रतिकार शक्ती ही आपल्या विरुद्धच कार्यरत होते. त्यांना स्वयंप्रतिरोधक आजार किंवा Auto immune disease असे म्हटले जाते. या आजारांचाच एक भाग म्हणजे Connective Tissue Disease किंवा CTD. यामध्ये लूपस एरीदेमॅटोसिस, डरम्याटोमायोसायटिस वगैरे आजार मोडतात. या आजारांमध्येही गाल व अंगावर जिथे ऊन लागते तिथे लाल गुलाबी रंगाचे चट्टे किंवा पुरळ येते. त्याचबरोबर अशा व्यक्तीमध्ये ताप येणे, सांधे दुखणे, तोंडात जखमा होणे, स्नायू दुखणे व कमकुवत बनणे जेणेकरून हातापायांच्या हालचालीला त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात. कधी कधी मुत्राशायावर देखील या आजारांचा प्रभाव पडू शकतो. हे आजार चिवट असतात व त्यासाठी बऱ्याच कालावधीसाठी औषधे सुरू ठेवावी लागतात.
हेही वाचा : जेएन१ विषाणूची निर्मिती होते कशी? त्याला हे नाव कसं मिळालं?
उन्हामुळे होणारे किंवा वाढणारे आजार टाळण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ऊन टाळणे आवश्यक आहे. ऊन टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी व सनस्क्रीनचा वापर कसा करावा हे आपण या लेखाच्या पहिल्या भागात म्हणजेच पी एल इ च्या लेखात पाहिलेच आहे.
या आजारांवर उपाय काय ?
वरील आजारांमध्ये जरी उन्हाची अॅलर्जी हे एक समान लक्षण आहे तरी आजाराची कारणे व इतर लक्षणे वेगवेगळी आहेत. त्यामुळे आजार ठरवून त्याप्रमाणे उपाय करावा लागतो. फोटो ड्रग अॅलर्जीची शक्यता वाटल्यास संशयास्पद औषध बंद करून वेगळे औषध चालू करावे लागते. पेलाग्रा हा आजार जर दारू प्यायल्यामुळे होत असेल तर दारू बंद करणे आवश्यक आहे. या आजारात Niacin – नायासीन व इतर जीवनसत्व व प्रथिनांचा उपचार केला जातो. Connective Tissue Disease हा आजार असल्यास स्टिरॉईड तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विशिष्ट औषधे बऱ्याच कालावधीसाठी सुरू ठेवावी लागतात. त्यासाठी संधिवाताचे डॉक्टर व त्वचारोग तज्ञ यांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे लागतात.
शरीर हा मनाचा आरसा आहे असं म्हटलं जातं, तर त्वचा हा शरीराचा आरसा आहे. शरीरामध्ये आत घडलेल्या घटना पुष्कळदा त्वचेवर प्रतिबिंबित होत असतात. Connective Tissue Disease हे त्याचेच एक उदाहरण आहे. उन्हाच्या जागी येणारे लालसर चट्टे हे कधीतरी आतील गंभीर आजाराची सूचना देत असतात. त्यामुळे अशा चट्ट्यांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच त्वचारोगतज्ञांचा सल्ला घ्या.