Shehnaaz Gill’s Diet : निरोगी आरोग्यासाठी आहार हा खूप महत्त्वाचा घटक आहे. उत्तम फिटनेससाठी तुम्ही कोणता आहार घेता हे खूप महत्त्वाचे आहे. अभिनेत्री शहनाज गिल आहाराचे महत्त्व सांगते. ती सांगते, “मी दिवसभरात तीन-चार लिटर भरपूर पाणी पिते, भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाते, तसेच पोह्यांबरोबर ग्रॅनोला आणि दही खाते.”
शहनाज दुपारच्या जेवणात घरी बनवलेले वरण, भाजी पोळीबरोबर खाते. जेवणात ती तूपाचा समावेश करते. शहनाज पुढे सांगते, “मी भाजलेल्या मखानासारखे घरगुती स्नॅक बनवते आणि खाते. रात्रीच्या जेवणामध्ये सूप, खिचडी आणि दहीसारखे हलके पदार्थ खाते.
शहनाज गिल संतुलित आणि घरगुती पदार्थांचा आहारात समावेश करते. संतुलित आणि घरगुती जेवणाचे फायदे जाणून घेऊया.
वजन, निरोगी आरोग्य आणि फिटनेस नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्या. अहमदाबादच्या नारायणा हॉस्पिटल येथील डायबेटोलॉजिस्ट (Diabetlogist) डॉ. जुझर रंगवाला सांगतात, “तुमच्या जेवणात भरपूर फळे, भाज्या, धान्ये आणि प्रोटिन्सचा समावेश करा. कार्बोहायड्रेट्स, साखर आणि खराब फॅटयुक्त पदार्थांचा आहारात कमी समावेश करा. त्याऐवजी सतत ऊर्जा देणारे आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे पौष्टिक पदार्थ निवडा.”
महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
- एखादा ‘चीट डे’ पाळण्याऐवजी ‘चीट जेवणा’चा आनंद घ्या.
- कार्ब्सचे कमी सेवन करा.
- कमीत कमी १० ते १२ ग्लास पाणी प्या.
- आहारात प्रोटिन्सचे प्रमाण वाढवा.
मीरा रोड येथील वॉकहार्ट हॉस्पिटलचे जनरल लॅप्रोस्कोपिक, मेटाबॉलिक आणि बॅरिएट्रिक सर्जरी (general laparoscopic, metabolic and bariatric surgery ) सल्लागार डॉ. राजीव मानेक सांगतात, “जर तुम्ही वजन कमी करत असाल तरीसुद्धा तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.”
डॉ. राजीव मानेक पुढे सांगतात, “वजन पुन्हा वाढू नये म्हणून तुमचे उद्दिष्ट निश्चित करा आणि त्यानुसार हळू हळू त्यासाठी प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्याची सवय होईल.”
“जेवण करताना सतर्कतेने खा. काही लोकांचे तणावात असताना किंवा नकारात्मक विचार करताना खाण्यावर नियंत्रण नसते, अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आपण काय आहार घेतो याकडे लक्ष द्या. नियमित योग किंवा ध्यान करा, ज्यामुळे तणाव कमी होऊ शकतो”, असे डॉ. मानेक सांगतात.
तज्ज्ञ सांगतात, “चांगल्या आहारतज्ज्ञांकडून वैयक्तिक आहाराच्या गरजा लक्षात घ्या. तसेच साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास जेवणाच्या वेळा पाळा. नाश्ता, जेवण आणि स्नॅक ठराविक अंतराने घ्या. जेव्हा तुम्हाला एखादा पदार्थ आवडतो, तेव्हा तो पदार्थ अति खाऊ नका.
© IE Online Media Services (P) Ltd