“पल्लवी , मला कधीही वाटलं नव्हतं माझी त्वचा इतक्या लवकर बरी होईल आणि भोपळा आहारात इतका महत्वाचा ठरेल याचा मी कधीच विचार केला नव्हता”, श्रेया सांगत होती. “ मला मैत्रिणींनी विचारलं पण चेहऱ्यावर काय ट्रीटमेंट केलीयेस का? तिच्या आवाजात वेगळाच उत्साह होता.
“पल्लवी , तू सांगितलेलं भोपळ्याचं सूप आणि पास्ता इतकं भारी जमलं होतं. सध्या भोपळा आमच्या घरी फेव्हरेट आहे सगळ्यांचा आणि आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे माझे केस इतके मस्त झालेत सॉफ्ट आणि हलके सिल्की. मिता हसत हसत सांगत होती म्हणजे जसे त्या शाम्पू अॅडमध्ये असतात ना तसे”.
भोपळ्याचं आहारात गणित नेमकं बसलं की असे अनुभव येतातच!
नाताळच्या उत्साहात साधारण सर्वत्र प्रसिद्ध झालेला आणि खरं तर गेले २-३ महिने घराघरात दिसणारा भोपळा सगळ्यांचाच ओळखीचा आहे. आहारशास्त्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळ्याच पोषकतत्वांनी भरपूर असणारा आणि दोन्ही प्रकारचे तंतूमय पदार्थ असणारा भोपळा हा बहुगुणी म्हणून ओळखला जातो.
केवळ भोपळ्याचा आतील गर नव्हे तर त्याच्या बिया, त्याचे आवरण यांचा देखील शरीराला खूप उपयोग होतो, भोपळ्याचे सगळेच भाग वेगवेगळ्या पदार्थांवर प्रक्रिया तयार करण्यासाठी देखील वापरले जातात.
हेही वाचा : रेड वाईन प्यायल्याने खरंच हृदयविकाराचा धोका कमी होतो? आरोग्याला फायदे होतात? डाॅक्टर काय सांगतात पाहा…
रोगप्रतिकारशक्ती वाढविणे -भोपळ्यात असणाऱ्या फायटोन्यूट्रिएंट्स वातावरणातील बदलानुसार शरीराचे संरक्षक कवच परिपूर्ण करतात. भोपळ्यात असणारे करक्युमिन, सॅपोनीन, फेनॉल्स , ग्लुकोसाइड्स, तार्किक, फ्लॅव्होनॉइड्स, लिग्नन यासारखे पोषणमूल्ये शरीराला अत्यंत उपयुक्त ठरतात. अल्झायमर किंवा कोणत्याही मेंदूतील वाहिन्यांची निगडित आजारांमध्ये प्रत्येक जेवणात भोपळ्याचा समावेश अत्यंत गुणकारी आहे. मानसिक आरोग्य राखण्यासाठी देखील भोपळ्याचे सेवन गुणकारी आहे.
कॅरोटिनॉइड, ल्युटीन, झियाझानथिन , जीवनसत्त्व इ आणि जीवनसत्त्व क यांच्या मुबलक प्रमाणामुळे भोपळ्यातून पुरेशा प्रमाणात अँटिऑक्सिडंट्सचा शरीराराला पुरवठा होऊ शकतो. त्वचेच्या आजारांमध्ये भोपळ्यातील कॅरोटिनॉइड्स आणि अ जीवनसत्त्व उत्तम परिणाम देते. भोपळ्यांच्या बियांचे सेवन शरीरातील साखरेचे प्रमाण उत्तम राखते आणि मधुमेहापासून रक्षण करते. ज्या महिलांना मासिक पाळीचे असंतुलन किंवा संप्रेरकांचे असंतुलन आहे त्यांच्यासाठी देखील भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन मासिक पाळी नियमित करण्यासाठी मदत करते. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशिअम , कॅल्शिअम , पोटॅशिअमचे मुबलक प्रमाण आढळते. त्यामुळे एकाचवेळी उत्तम ऊर्जा आणि मानसिक आरोग्यदेखील उत्तम राहते.
हेही वाचा : हिवाळ्यात येणारा हार्ट अटॅक टाळण्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे फायदेशीर ठरेल का?
भोपळ्याच्या सालीची चटणी केसांच्या आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. खिचडीबरोबर खाण्यासाठी झटपट बनणारी चटणी उपयुक्त आहे. ज्यांना फॅटी लिव्हर आहे त्यांच्यासाठी भोपळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने उत्तम परिणाम दिसून येतात. वाढलेले फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल या दोन्हीसाठी परिणामकारक असणारा भोपळा आहारशास्त्रज्ञांचादेखील लाडका आहे. अनेकदा सलाडमध्ये किंवा घरगुती सूप किंवा सांबर, डाळ तयार करताना भोपळा समाविष्ट करण्यासाठी आहारतज्ज्ञ आग्रही असतात. धावणे, पोहणे यासारख्या खेळांमध्ये अग्रणी असणाऱ्या खेळाडूंच्या आहारात देखील भोपळ्याचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. ऊर्जा वाढविणे, संपूर्ण पोषण देणारा भोपळा आहारात समाविष्ट करायचा सोपा आणि चविष्ट प्रकार आहे.
अलीकडे सर्वत्र चर्चेत असणारे विगन पदार्थ तयार करताना भोपळ्याच्या बियांपासून आणि भोपळ्याचा गर वापरून विगन चिकन कटलेट , विगन मीट बॉल्स , पॅटिस इत्यादी पदार्थ तयार केले जातात. किंबहुना वनस्पतीजन्य बेकरी पदार्थामध्ये देखील भोपळ्याच्या बिया , त्यांचे पीठ याचा सर्रास वापर केला जातो. बेकिंग प्रक्रियेमध्ये आणि बेकरी पदार्थांमध्ये घनता वाढविण्यासाठी आणि स्निग्धांशाच्या प्रक्रियाकरणासाठी भोपळा अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे. त्यामुळे सध्या भोपळ्याची मागणी बेकरी क्षेत्रात जास्त आहे. वेगवेगळी बिस्कीटं तयार करण्यासाठी, केक आणि बन्स तयार करण्यासाठी भोपळ्याचा वापर केला जातोय.
हेही वाचा : करोनाने चिंता वाढवली, मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, देशभरात एका दिवसात ७५२ रुग्णांची नोंद
लहान असताना गोष्टीतल्या आजीनं चल रे भोपळ्या टुणूक टुणूक करत रंजक प्रवास केल्याचं माझ्या पिढीनं नेहमीच ऐकलेलं आहे ; आहारशास्त्र शिकताना भोपळ्याचं आहारातील असणं जगण्याचा प्रवास तितकाच रंजक करेल हे अधोरेखित झालंय.