Virat Kohli Diet : भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. या विजयानंतर एका मुलाखतीत भारताचा फलंदाज विराट कोहलीला जेव्हा विचारले की, तो संपूर्ण टी-२० मालिकेत न थकता कसा काय खेळू शकला? त्यावर विराट त्याच्या शारीरिक क्षमता आणि आहाराचा उल्लेख करीत म्हणाला, “मला वाटते की, वयाच्या ३४ व्या वर्षी म्हणजे तीस-पस्तिशीदरम्यान आहार हा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे माझ्यासाठीही आहार ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.”
तो पुढे म्हणला, “तुम्ही चांगला पोषक आहार घेत आहात, याची खात्री करा. कारण- त्यामुळे तुमचे वजन आणि फॅट नियंत्रित राहते; पण त्याचबरोबर तुम्हाला खेळताना ऊर्जासुद्धा मिळते.”
कोणते पोषक घटक शरीराला ऊर्जा प्रदान करतात?
आहारतज्ज्ञ सल्लागार कनिका मल्होत्रा सांगतात, “मॅक्रोन्युट्रियंट्सयुक्त चांगला संतुलित आहार तीव्र स्वरूपाचा व्यायाम करताना फायदेशीर ठरतो. एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट (ATP) तयार करण्यासाठी कर्बोदके महत्त्वाची भूमिका बजावतात. जर कर्बोदकांची शरीरात कमतरता जाणवली, तर आपल्याला थकवा जाणवतो. कर्बोदके महत्त्वाचा ऊर्जास्रोत आहे.”
प्रोटिन्स स्नायूंना मजबूत ठेवण्याचे काम करतात आणि त्यामुळे व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकवा जाणवत नाही. चांगले फॅट्स दीर्घकालीन शारीरिक क्रियेसाठी ऊर्जा प्रदान करतात आणि हार्मोन्स नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतात; ज्यांचा थेट परिणाम व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर होतो.
त्याशिवाय भरपूर पाणी रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात; जे संपूर्ण स्नायूंना पोषक घटक पुरवितात आणि शरीरातील विषाक्त घटक बाहेर काढण्यास मदत करतात. या दोन्ही गोष्टी व्यायाम करताना कार्यक्षमता जपण्यास मदत करतात.
मल्होत्रा पुढे सांगतात, “तीव्र स्वरूपाच्या व्यायामानंतर घाम कमी येण्यामागे आहाराची तितकी प्रभावी भूमिका नसते. कारण- थर्मोरेग्युलेशन (शरीराचे तापमान काही विशिष्ट मर्यादेत ठेवण्याची क्षमता) शारीरिक यंत्रणेचा भाग आहे. जर चांगल्या संतुलित आहारामध्ये कर्बोदके असतील, तर आपल्याला चांगली ऊर्जा मिळू शकते आणि त्यामुळे आपल्याला थकवा जाणवत नाही आणि व्यायाम करण्याची क्षमता आणखी वाढते.”
मल्होत्रा सांगतात की, विराट कोहलीच्या डाएटमध्ये काही अशा गोष्टी आहेत; ज्यांच्या सेवनामुळे लोकांना त्यांचा स्टॅमिना आणि दैनंदिन कामगिरी सुधारण्यास मदत होऊ शकते.
- सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांचे सेवन करा – कोहली सर्व प्रकारच्या भाज्या, शेंगा खातो. ज्या अन्नावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही, असे अन्न तो आवर्जून खातो. अशा जेवणामुळे शरीराला भरपूर ऊर्जा आणि आवश्यक पोषक घटक मिळतात.
- वनस्पती आधारित प्रथिनांना प्राधान्य द्या – कोहली वेगन डाएट घेतो; पण तुम्ही सर्व मांसाहार बंद करू नका. तुम्ही प्रथिनांचा स्रोत असलेले चिकन, मासे, मसूर खाऊ शकता; ज्यामुळे तुम्हाला स्नायूंच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रथिने मिळतील.
- आहारात साखर आणि फॅट्स कमी करा – साखरयुक्त पेये, पेस्ट्रीज किंवा तळलेले पदार्थ खाणे बंद करा. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. नट्स, बिया, अॅव्हाकॅडोपासून तुम्हाला चांगले फॅट्स मिळू शकतात; ज्यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल.
- भरपूर पाणी प्या – नेहमी हायड्रेटेड राहण्यासाठी विराट नेहमी पाणी आणि ग्रीन टी पितो. पाण्यातून चांगले न्युट्रिएंट्स मिळतात; जे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतात आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवर दिसून येतो.
मल्होत्रा सांगतात, “हे लक्षात घ्या की, प्रत्येकाच्या शरीराच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे चांगल्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन, त्यांनी सुचविलेला पोषक आहार घ्या.”