Healthy Chaat : चाट हा अनेकांच्या आवडीचा विषय आहे. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांना चाट खायला आवडते. पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटिस, दही चाट, भेळ इत्यादी चाटचे प्रकार अतिशय लोकप्रिय आहेत. चाट नावाप्रमाणे जरी चटपटीत असले तरी त्यात असलेल्या कॅलरीज आणि तेलामुळे आरोग्यासाठी ते तितकेसे चांगले नसते. त्यामुळे अनेक आहारतज्ज्ञ नियमितपणे चाट आहारात घेऊ नये, असे सांगतात. त्यामुळे अनेक लोक निरोगी राहण्यासाठी चाट खाणे टाळतात. खरेच चाट आरोग्यासाठी चांगले नाही का? याविषयी आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत सांगतात, “चाटमध्ये अनेकदा कडधान्ये असतात. कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण उत्तम असते. ज्या प्रदेशात तापमान कमी आहे, तिथे चाट सहसा जास्त खाल्ले जाते. कारण- कडधान्यांमध्ये असलेल्या प्रथिनांमुळे शरीराला उत्तम उष्णता अन् ऊर्जा मिळते. चाटमध्ये वापरल्या जाणाऱ्या मूग, चणे, बेसन इत्यादी पदार्थांमुळे चाट आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. काही चाटच्या प्रकारांमध्ये दहीदेखील वापरले जाते. दह्यांमध्ये असणारी प्रथिने आणि आवश्यक जीवाणू आतड्यांसाठी उत्तम असतात. त्यामुळे दही असणारे चाट आरोग्यासाठी चांगले असते. मात्र, या दह्यामध्ये जर खूप जास्त साखर घातलेली असेल किंवा गोड चटणी मिसळलेली असेल, तर ते तितकेसे पोषक ठरू शकत नाही.”

हेही वाचा : प्रसिद्ध सायकलपटूचे वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; तीव्र प्रकारच्या व्यायामाचा हृदयावर कसा परिणाम होतो?

कोणते चाट आरोग्यासाठी चांगले नाही, याविषयी आम्ही आहार तज्ज्ञ पल्लवी सावंत यांचे मत जाणून घेतले. त्या सांगतात, “चाट खाणे आरोग्यासाठी चांगले आहे की नाही हे त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांवरून ठरू शकते.

पापडी आणि शेव किंवा फरसाण : जरी पापडी आणि शेव किंवा फरसाण हे पदार्थ बेसनापासून बनवले जात असले तरीदेखील ते तळण्यासाठी कोणत्या प्रकारचे तेल वापरले गेले आहे ते अनेकदा आपल्याला माहीत नसते. दररोज नियमितपणे जर तुम्ही चाट किंवा तत्सम पदार्थ खात असाल, तर शरीरातील कोलेस्ट्रॉलवर परिणाम होऊ शकतो.

पाणीपुरी : पाणीपुरीतील पुरी ही कायम तळलेली असते. जरी पाणीपुरीतल्या पाण्यामध्ये पुदिना, कोथिंबीर यांसारखे अन्नघटक असतात; ज्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स चांगले असतात तरीदेखील १०० ग्रॅम पुदिना किंवा कोथिंबिरीमध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. तुम्ही जेव्हा पाणीपुरीतील पाण्याचे सेवन करता त्यावेळी अर्थातच त्यात पोषण मूल्यांचे प्रमाण हे अत्यल्प असते. त्याशिवाय पाणीपुरीची पुरी ही अनेकदा मैद्यापासून बनवलेली असते; ज्यामध्ये काहीही पोषणमूल्ये नसतात. त्यामुळे पाणीपुरी खाताना तुमच्या शरीरात पोषण घटकांपेक्षा कॅलरीजचे प्रमाण जास्त जात असते.

रगडा पॅटिस : या पदार्थामध्ये पाव, बटाटा, तेल यांचे प्रमाण त्यात वापरल्या जाणाऱ्या कडधान्यांच्या दुप्पट असते. त्यामुळे मैद्याचे हे दुप्पट प्रमाण शरीराला अर्थातच तितकेसे उपयुक्त नसते.

चाट मसाला : चाट मसाल्यामध्ये अनेकदा आमचूर पावडर, तिखट, मिरची पूड, चिंच, जिरे पूड, धणे पूड या प्रकारचे पदार्थ असतात. जे प्रमाणात खाल्ले तरच शरीरासाठी उपयोगी ठरू असतात. त्यामुळे कधीतरी चाट खाणे नक्कीच चांगले आहे; मात्र नियमित चाट खाण्याने तितकासा आरोग्याला फायदा होत नाही.

त्या पुढे सांगतात, “जर तुम्ही तासन् तास बसून काम करीत असाल आणि त्यात जर तुम्ही शेवपुरीमधील वापरला जाणारा बटाटा खात असाल, तर त्या बटाट्यामध्ये स्टार्च असतात, हे विसरू नये. त्याशिवाय चाट मसाल्यामध्ये रॉ मॅंगो पावडर असते. तसेच आमचूर पावडर, तिखट, मिरची व चिंचसुद्धा असते. चिंच ही प्रत्येक ऋतूमध्ये खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे कधीतरी चाट खाणे चांगले आहे; पण नियमित खाणे टाळावे.

चाट खाणे पूर्णपणे बंद करावे का?

अनेक लोक आरोग्याचा विचार करून चाट खाणे टाळतात. याबाबत पल्लवी सावंत सांगतात, “कोणत्या प्रकारचे चाट तुम्ही खाता, त्यावर हे अवलंबून आहे. तुम्ही बटाटा, गोड चटणी एवढेच चाट खात असाल किंवा शेव असलेले चाट खात असाल, तर ते नेहमी खाणे योग्य नाही; पण तुम्ही कडधान्ये असलेले चाट खात असाल, तर ते आरोग्यासाठी अधिक चांगले आहे. त्याशिवाय चाटमधील गहू, मैदा यांचे प्रमाणसुद्धा समजून घ्यावे.”
त्या पुढे सांगतात, “आहारतज्ज्ञ म्हणून मला स्वच्छता हा खूप महत्त्वाचा पैलू वाटतो. कारण- कोणत्याही संसर्गजन्य रोगापासून दूर राहण्यासाठी चाट तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छता असणे आणि चाट विक्रेत्यानेदेखील स्वच्छता पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे चाट शक्यतो घरी बनवावे किंवा बाहेर स्वच्छ ठिकाणी खावे.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you love chaat which type of chaat is good for health know by health expert ndj