OTT प्लॅटफॉर्म्स आज अनेक घरातून टीव्हीवर बघितले जातात. नव्याने जेव्हा ott आले तेव्हा पालक किंवा घरातली मोठी माणसं हे प्लॅटफॉर्म्स त्यांच्या फोनवर किंवा लॅपटॉपवर बघत असत. आज ती परिस्थिती अनेक घरातून नाही. स्मार्ट टीव्ही बरोबर OTT प्लॅटफॉर्म्स हॉलमध्ये येऊन पोचले आहेत. या OTT प्लॅटफॉर्म्सवर सगळ्या वयोगटांसाठी कन्टेन्ट उपलब्ध असतो. बहुतेकवेळा त्यावर वयाचे रेटिंग दिलेले असते. म्हणजेच तो कन्टेन्ट कुठल्या वयातल्या लोकांनी बघणे अपेक्षित आहे हे लिहिलेले असते. तसे ते गेमिंगमध्येही लिहिलेले असते आणि सगळ्या अॅप्सवरही. WhatsApp ३+ आहे, तर फेसबुक १२+. अनेक गेमिंग अॅप्सवर १३+, १६+, १८+ असा स्पष्ट उल्लेख केलेला असतो. ज्याप्रमाणे आपल्याकडे सिनेमासाठी असते तसेच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण आपल्या वयासाठी जे आहे तेच आपण बघतोय का हा प्रश्न मुलं कधीही स्वतःला विचारत नाहीत आणि अॅडल्ट कन्टेन्ट बघणाऱ्या मुलांच्या पालकांपैकी काहींना, चालायचंच, मुलांना हे सगळं समजलं पाहिजे असं वाटत असतं. लैंगिक संबंधांविषयीची माहिती, मुलांचे प्रश्न याची उत्तरं द्यायला नको म्हणून अनेकदा पालक या वाटेने जातात, पण ही पळवाट आहे आणि त्यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात हे त्यांच्या लक्षात येत नाही.

हेही वाचा : Health Special: अंगदुखीसाठी काय करावं?

अगदी पोर्नोग्राफिक साइट्सवरही १८+ आहात का असा प्रश्न विचारत असले; तरी एखाद्या दहा वर्षांच्या मुलानं ‘येस’ उत्तर दिलं; तर कुणी त्याला जन्माचा दाखला मागत नाही. ‘येस’ म्हटल्यावर ती अख्खी साईट त्याच्यासमोर ओपन होते. मुलांना एका क्लिकवर सगळं उपलब्ध आहे. मागच्या कुठल्याही पिढीपेक्षा वेगानं माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे… पण मुलांना असं नाही तर तसं, सगळं समजणार आहेच; म्हणून माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा वेग वाढवण्याची गरज नसते. अनेकदा पालक स्वतःच्याही नकळत हा वेग वाढवतात.

स्मार्टफोनमधल्या सेक्स क्लिप्स, फोटो स्वतंत्र फोल्डरमध्ये ठेवून ते फोल्डर लॉक न करणं, मुलांसमोर १६+ कन्टेन्ट बघणं, शरीरसंबंध, वाढणारं शरीर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावना या गोष्टींबद्दल त्यांना योग्य माहिती योग्य वयात न पुरवणं, ते जर नेटवर पॉर्न/न्यूड क्लिप्स/फोटो बघत असतील तर आरडाओरडा न करता त्यांच्याशी या सगळ्याविषयी बोलणं, त्यांना समजावून सांगणं, त्यातले धोके सांगणं या गोष्टी पालक अनेकदा करतच नाहीत.

हेही वाचा : Health Special: चांगल्या त्वचेसाठी हे नक्की खा

आधीच असणारा माहितीचा भडिमार पालक कळत नकळत अधिक वेगवान करतात आणि मग गोष्टी हाताबाहेर गेल्या की संतापतात, मुलांना मारहाण करतात किंवा काळजीत पडतात. डिजिटल मनोरंजन आणि वेबसीरिज यांच्या बाबतीत विचार केला; तर प्रत्येक सिरिअलच्या होमस्क्रीनवर रेटिंग ठळक अक्षरांत लिहिलेलं असतं… उदाहरणार्थ, ८+, १२+, १३+, १५+, १६+, १८+ म्हणजे ते वय किंवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या प्रेक्षकांसाठीचा आशय. जेव्हा अशा पद्धतीचं रेटिंग दिलेलं असतं; त्याला काही एक अर्थ असतो. उगाचच रेटिंग देण्याची पद्धत नाहीये.

सेक्स, शिव्या, हिंसा या गोष्टींचं प्रमाण त्या सीरिअलमध्ये/सिनेमात किती आहे यावरून रेटिंग ठरतं… त्यामुळे मुलांना या सीरिज किंवा तत्सम मनोरंजनात्मक कार्यक्रम बघायची परवानगी देताना, गेम्स डाउनलोड करुन देताना या रेटिंगकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे. वेबसीरिअलच्या विश्वात मुलांना नेताना या गोष्टी जर त्यांना समजावून सांगितल्या; तर त्यांच्यासाठी काय आहे आणि काय नाही हे मुलांनाही समजू शकतं. आताच्या मुलांसमोर आणि डिजिटल पालकत्वात ‘वयानुरूप आशय’ मुलं बघतायेत का हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. अर्थात भारतीय समाजात मुलं कधीच वयानुरूप आशय असलेलं मनोरंजन बघत नाहीत, पूर्वीही ते नव्हतं. कारण भारतात सिनेमा आणि सीरिअल्स या गोष्टी मोठ्यांसाठी तयार केल्या जातात आणि मोठ्यांच्या मनोरंजनात मुलांनी त्यांचं मनोरंजन करुन घ्यावं अशी एकूण पद्धत आहे. खास मुलांसाठीची पुस्तक, सिनेमे, सीरिअल्स, वेबटून्स भारतात फार कमी बनतात. त्यामुळे मुलंही मोठ्या प्रमाणावर मोठ्यांच्याच मनोरंजन साधनांवर अवलंबून असतात हे लक्षात घेतलं पाहिजे.

हेही वाचा : काळी द्राक्षे खा; हृदयरोग, रक्तदाब ‘या’ आजारांपासून दूर राहा; आहारतज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ फायदे वाचून व्हाल थक्क

तरीही घरातल्या टीव्हीवर नेटफ्लिक्स, प्राईम, हॉटस्टार किंवा तत्सम OTT असतील तर मुलं ज्या वयाची आहेत त्यानुसार त्याचं अकाउंट असलं पाहिजे. तीच गोष्ट मुलांच्या हातातल्या फोनची आणि त्यातल्या अॅप्सची. माध्यम शिक्षण विविध पातळ्यांवर सुरु होतं हे लक्षात घेतलं पाहिजे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you see the age rating of ott programs hldc css
Show comments