Walking For Weight Loss : तुम्ही दररोज किती पावले चालता? वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज १० हजार पावले चालता का? मग थांबा! कारण- तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी ही कृती करणे चुकीचे आहे. कारण- हा काही जादूचा प्रयोग नाही. त्यामुळे ज्या लोकांचे वजन जास्त आहे आणि जे गुडघेदुखीने त्रस्त आहेत त्यांनी १० हजार पावले चालणे चुकीचे आहे.

आतड्यांचे आरोग्य तज्ज्ञ (gut health specialist) डॉ. संध्या लक्ष्मी सांगतात, “जेव्हा लठ्ठ लोक दररोज १० हजार पावले चालण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्यावर खूप ताण येतो आणि त्यांना सांधेदुखी, स्नायूंचा त्रास होऊ शकतो. कारण- त्यांचे स्नायू १० हजार पावले चालणे सहन करू शकत नाहीत.” त्या सांगतात, “ज्या लोकांना गुडघ्याशी संबंधित समस्या आहेत त्यांनी प्रशिक्षणाशिवाय १० हजार पावले चालू नयेत.

मुंबईच्या परळ येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्स वरिष्ठ सल्लागार डॉ. अनूप खत्री सांगतात, “वरील सल्ला हा मंद गतीची चयापचय क्रिया, आनुवंशिकता व चुकीची जीवनशैली यांमुळे लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठीसुद्धा आहे.” ते पुढे सांगतात, “चालणे हा वजन कमी करणे किंवा तीव्र स्वरूपाचा व्यायाम नसून, शरीराला लवचिक बनविण्याचा तो एक प्रभावी मार्ग आहे.”

हेही वाचा :हृदयविकाराचा झटका आल्यावर आल्याचा तुकडा चघळल्याने खरंच फायदा होतो? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक व रोबोटिक सर्जन डॉ. निर्मल डुमणे सांगतात, “योग्य प्रशिक्षणाशिवाय १० हजार पावले चालण्याने तुमची अस्वस्थता वाढू शकते. त्याशिवाय तुम्हाला दुखापत होऊ शकते किंवा दीर्घकालीन स्नायू वा सांध्यांची समस्याही उदभवू शकते.”

ते पुढे सांगतात, ” शरीराला आधार देणारे स्नायू जेव्हा कमकुवत होतात तेव्हा कोणतीही शारीरिक हालचाल करताना व्यक्तीला आणखी दुखापत होऊ शकते.”

लठ्ठपणा ही समस्या का आहे?

डॉ. अनूप खत्री सांगतात, “लठ्ठपणामुळे स्नायू कमकुवत होतात आणि मग त्यावर थोडा जरी जास्त तणाव आला तरी अस्वस्थता जाणवते आणि शरीरावर ताण येऊ शकतो. दररोज १० हजार पावले चालण्यापूर्वी आपले शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवणे आवश्यक आहे.

डॉ. संध्या लक्ष्मी यांच्या सल्ल्यानुसार, खालील व्यायामांमुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊ या, ते व्यायाम कोणते?

  • सर्व सांधे आणि स्नायूंची हालचाल करा. त्यांना वाकवा, फिरवा आणि ताणा.
  • खुर्चीवर बसा आणि पाच मिनिटे पायांची हालचाल करा.
  • खुर्चीवर बसा आणि एका वेळी एकच गुडघा वर न्या. त्यानंतर दुसरा गुडघा वर न्या. असे ५-१० वेळा करा.
  • हळूहळू खुर्चीवर बसा आणि हळूहळू उभे राहा. त्यानंतर छाती वर उचलून खुर्चीवर बसा. अशा प्रकारे खुर्चीवर स्क्वॅट्स करा.
  • उभे राहून पायांची बोटे वर करा आणि हळूहळू खाली आणा. असे पाच ते १० वेळा करा.

वरील व्यायाम नियमित केल्यास फायदा होऊ शकतो. डॉ. खत्री सांगतात, “सांधेदुखीचा त्रास असेल, तर कोमट तेलाने स्नायूंना मसाज करा.”