Watching TV While Eating : आजच्या धावपळीच्या जगात वेळ वाचवण्यासाठी आपण एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करतो. आपल्यापैकी अनेक जण जेवण करताना त्यांचा आवडता कार्यक्रम टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाइलवर पाहतात, पण हे खरंच आरोग्यासाठी चांगले आहे का? न्यूट्रिशनिस्ट अपूर्वा अग्रवाल सांगतात, “टीव्ही बघताना जेवण करणे आनंददायी वाटत असले तरी यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. जेव्हा तुम्ही टीव्हीवरील कार्यक्रम बघताना जेवण करता, तेव्हा तुमचे मन स्थिर राहत नाही आणि तुम्ही काय खात आहात, हेसुद्धा तुम्हाला कळत नाही.”
वसंत कुंज येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या न्यूट्रिशनिस्ट रूचिका जैन द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “जेव्हा तुम्ही एखादा आवडता कार्यक्रम, चित्रपट बघण्यात मग्न असता तेव्हा तुम्ही शरीराच्या भूकेकडे दुर्लक्ष करता आणि जेवढी भूक लागलेली होती, त्यापेक्षा जास्त खाता; ज्यामुळे वजन वाढते आणि पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो.”
अपूर्वा अग्रवाल सांगतात, “जेव्हा तुम्ही टीव्हीवर कार्यक्रम बघत जेवण करता, तेव्हा तुम्ही जेवणाच्या गुणवत्तेपेक्षा प्रमाणावर भर देता. कॅलरीयुक्त खाद्यपदार्थ तुम्ही निवडता.” तर याविषयी जैन सांगतात, “टीव्ही पाहताना आपण अनेकदा कॅलरी, साखर, फॅट्स आणि मिठाचे प्रमाण जास्त असलेले स्नॅक्स निवडतो. जसे की चिप्स, कुकीज, सोडा यामुळे वजन वाढण्यासारख्या विविध आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.”
अभ्यासाचा हवाला देऊन न्यूट्रिशनिस्ट अपूर्वा अग्रवाल सांगतात की, टीव्ही पाहताना जेवण केल्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. विशेषत: मुलांमधील चयापचय क्रियादेखील मंदावते.
न्यूट्रिशनिस्ट रूचिका जैन सांगतात, “आपण काय खात आहोत याकडे दुर्लक्ष करणे, पोट भरल्यानंतरसुद्धा खाणे, टीव्ही पाहताना कमी हालचाल करणे यामुळेसुद्धा लठ्ठपणा वाढू शकतो.”
हेही वाचा :आपल्या शरीरासाठी २० मिनिटे सूर्यप्रकाश घेणे का गरजेचे आहे? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
“जेव्हा तुम्ही टीव्हीसमोर बसून खाता, तेव्हा तुमचे संपूर्ण लक्ष टीव्हीकडे असते, ज्यामुळे तुम्ही भरपूर जेवण करत असला तरी तुम्हाला कमी पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक संपत नाही”, असे अग्रवाल सांगतात.
टीव्ही पाहताना आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून न्यूट्रिशनिस्ट रूचिका जैन यांनी आरोग्यास फायदेशीर असे स्नॅक्सचे पर्याय निवडणे, जेवताना काय आणि किती प्रमाणात खात आहात याकडे लक्ष देणे आणि किती वेळ टीव्हीसमोर घालवता याचे भान असण्याचा सल्ला दिला आहे.
रूचिका जैन पुढे सांगतात, “जेवण करताना लक्ष केंद्रित करून जेवण करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. जेवण करताना मन स्थिर ठेवणे आणि जेवताना प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेणे गरजेचे आहे.”
जेवताना लक्ष केंद्रित करण्यासाठी खालील गोष्टी करू शकता
- जेवण करण्यापूर्वी थोडा वेळ शांत बसा. दीर्घ श्वास घ्या. मन स्थिर करा आणि लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
- अन्नाचा रंग, चवीकडे बारकाईने लक्ष केंद्रित करा. जेवण करताना तुमच्या सर्व इंद्रियांद्वारे जेवणाचा आस्वाद घ्या.
- अन्नाचा प्रत्येक घास नीट चावून खा. सावकाश जेवण करा.
- जेव्हा तुम्हाला भूक लागली असेल तेव्हाच खा आणि पोट भरले की त्यानंतर खाऊ नका. यामुळे वजन नियंत्रणात राहते.
- टीव्ही, फोन किंवा लॅपटॉपसमोर जेवण करणे टाळा. शांत ठिकाणी जेवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचे लक्ष जेवणावर केंद्रित राहील.
- अन्नाला नावे ठेवू नका. कोणत्याही अन्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहा.
- ज्यांनी तुमच्यासाठी जेवण बनवले आहे, त्यांच्या मेहनतीचे कौतुक करा. कृतज्ञतेची भावना ठेवा.
- एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला कसे वाटते, याकडे लक्ष द्या, त्यानुसार तुम्ही अन्नाची निवड करू शकता.
- तुम्ही जेवण करण्यापूर्वी ध्यान करू शकता, त्यामुळे तुम्हाला जेवताना फ्रेश वाटेल.