रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. कारण- हे सुरक्षित रक्त एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकते. रक्तदान करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. रक्तदान करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. वय वर्ष १८ ते ६० पर्यंत शरीराने तंदुरुस्त व्यक्ती रक्तदान करू शकते. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे वजन ४५ किलोपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तुम्ही रक्तदान केल्यानंतर साधारण तीन महिन्यांनंतर पुन्हा रक्तदान करू शकता. त्याबरोबर रक्तदानाविषयी आणखी एक प्रश्न सर्वांच्या मनात डोकावतो आणि तो म्हणजे रक्तदान करताना विशिष्ट हातच वापरतात का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांशी संवाद साधला. रक्तदानासाठी विशिष्ट हात निवडण्यामागील कारण तज्ज्ञांनी स्पष्ट केले आणि त्यामुळे दान केलेल्या रक्तामध्ये काही फरक पडतो का याबाबतही खुलासा केला.
“रक्तदान करताना आपण सामान्यत: दोन्ही हात वापरू शकतो. परंतु, बहुतेक लोक काही व्यावहारिक कारणांसाठी (लिहिणे, जेवण करणे, वस्तू उचलणे इ.) त्यांचा जास्त वापरला न जाणारा हात रक्तदानासाठी वापरतात,” असे मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्स क्रिटिकल केअरचे हेड कन्सलटंट डॉ. अखलेश तांडेकर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. सोप्या शब्दांत याचा अर्थ असा की, जर एखादी व्यक्ती उजव्या हाताच्या वळणाची असेल, तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab technician) रक्तदानासाठी डावा हात निवडेल आणि जर एखादी व्यक्ती डाव्या हाताच्या वळणाची असेल, तर तंत्रज्ञ उजव्या हाताची निवड करेल.
हेही वाचा – जर तुम्ही रोज एक कच्चे अंडे खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केला खुलासा…
डॉ. तांडेकर यांच्या मते, “गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यासाठी आणि रुग्णाच्या नेहमी वापरात असलेल्या हातावर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी विशेषत: अनेकदा रक्तदान करण्याची आवश्यकता असल्यास या गोष्टीची काळजी घेतली जाते.”
रक्तदान करताना तुम्हाला अधिक आरामदायी वाटेल तो हात निवडा. ही बाब तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्थिर राहण्यास मदत करते. त्यामुळे फ्लेबोटोमिस्ट (रक्तसंकलन तज्ज्ञ) यांना शिरा शोधणे सोपे होईल,”असे आर्टेमिस हॉस्पिटल्सच्या डिपार्टमेंट ऑफ ब्लड सेंटर ॲण्ड ट्रान्सफ्युजनचे चेअरपर्सन आणि मेडिकल सर्व्हिस डिपार्टमेंटचे डेप्युटी हेड डॉ. (ब्रिगेडियर) अनिल खेत्रपाल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.
हेही वाचा – नियमितपणे चहा प्यायल्याने हृदयविकाराचा धोका होतो कमी, संशोधनातून नवा खुलासा; पण वाचा डॉक्टरांचे मत
डॉ. तांडेकर यांच्या मतानुसार रक्तदानासाठी हात निवडताना लक्षात घेतली जाणारी महत्त्वपूर्ण कारणे खालीलप्रमाणे :
नियमित कामांतील अडथळा टाळण्यासाठी : रक्तदानासाठी नेहमी वापरात नसलेला हात वापरला जातो. कारण- तसे केल्याने रक्तदानानंतर रोजची कामे करताना कराव्या लागणाऱ्या हालचाली विनाअडथळा पुन्हा सुलभतेने करणे शक्य होते.
रक्तदानानंतर त्रासदायक वाटू नये म्हणून : फारशा वापरात नसलेल्या हातावर रक्तदानानंतर कोणतीही जखम झाली किंवा त्या हाताला वेदना जाणवत असतील तरी त्याचा फार त्रास होत नाही
चांगली नस : रक्तदानासाठी कोणती नस चांगली आहे हे निश्चित करण्यासाठी परिचारिका किंवा फ्लेबोटोमिस्ट दोन्ही हातांची तपासणी करतील. कधी कधी एका हातात अधिक प्रमुख नसा असू शकतात.
“प्रशिक्षित व्यावसायिक रक्तदानासाठी हात निवडताना रक्तदात्याला आराम मिळेल आणि तो कार्यक्षम राहील याला प्राधान्य देतात,” असे डॉ. (ब्रिगेडियर) खेत्रपाल यांनी सांगितले.
एक हात दुखापतीमुळे प्रभावित झाल्यास रक्तदानासाठी तुमचा दुसरा हात वापरला जाईल. “अधूनमधून दुसरा हात वापरल्याने एका हाताच्या शिरा दुखावल्या असतील, तर त्या बरे होण्यास पुरेसा अवधी मिळू शकतो. हा निर्णय शेवटी फ्लेबोटोमिस्टच्या मूल्यांकनावर आधारित असेल आणि ज्या हातातील शिरा उत्तमरीत्या कार्यान्वित असतील, त्या हाताची निवड केली जाईल,” असे गुरुग्राम येथील मॅरेंगो एशिया हॉस्पिटल्सच्या ‘हेमेटोलॉजी ॲण्ड बोन मॅरो ट्रान्सप्लांट’चे क्लिनिकल डायरेक्टर डॉ. मित कुमार यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.
हाताच्या निवडीचा रक्तदान प्रक्रियेवर परिणाम होतो का?
बहुतेक प्रकरणांमध्ये तुम्ही ज्या हाताने रक्तदान करता, त्याचा रक्तदान प्रक्रियेवर फारसा परिणाम होत नाही, असे डॉ. (ब्रिगेडियर) खेत्रपाल यांनी सांगितले. “तुम्ही एखाद्या विशिष्ट हाताने यशस्वीरीत्या रक्तदान करीत असल्याचा इतिहास असल्यास, तुम्ही त्यास़बंधीची माहिती फ्लेबोटोमिस्टला देऊ शकता,” असेही पुढे डॉ. (ब्रिगेडियर) खेत्रपाल यांनी नमूद केले.
“आरोग्याच्या कारणास्तव एक हात दुसऱ्या हातापेक्षा चांगला आहे, असे सांगणारे कोणतेही विशिष्ट विज्ञान नाही. मुख्यतः सुई प्रवेश करण्यास कोणत्या हातातील शीर अधिक योग्य आहे यावर रक्तदानासाठी कोणता हात निवडायचा हे अवलंबून असते,” असे डॉ. तांडेकर यांनी स्पष्ट केले.