आपल्याला सर्वांना निरोगी राहायचे असते. निरोगी राहण्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे. नुकतच कॅफिनयुक्त पेयांचा सेवन केल्याने एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळेच आता कॅफिनयुक्त पेय आपल्या शरीरासाठी किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे, यावरच बॉम्बे हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. गौतम भन्साळी यांनी याबाबत माहिती दिली असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

डाॅक्टर सांगतात, ड्रिंक्सचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हे धोकादायक पेय प्यायल्याने हृदय, किडनी, यकृताचे आजारही होऊ शकतात. जास्त प्रमाणात कॅफिनयुक्त पेये सेवन केल्याने शरीराची कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे तुमच्या हाडांवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. एका संशोधनुसार असे निदर्शनास आले आहे की, १०० मिलीग्राम कॅफिनचे सेवन केल्याने सुमारे ६ मिलीग्राम कॅल्शियम नष्ट होते. 

अनेक तरुण दिवसभराच्या दगदगीनं आलेला थकवा घालवण्यासाठी एनर्जी ड्रिंक घेऊन रिफ्रेश होण्याचा प्रयत्न करतात. तरुण मुलांमध्ये ‘एनर्जी ड्रिंक’ पिणारा एक मोठा वर्ग आहे. या ड्रिंकमुळे आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते, असा विश्‍वास त्यांना वाटतो. अशी चूक करु नये. कॅफेनयुक्त एनर्जी ड्रिंकमुळे हृदयाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या एनर्जी ड्रिंक्समध्ये साखर, कॅफेन आणि केमिकल्सचं प्रमाण जास्त असल्याने हे शरीरासाठी हानिकारक ठरु शकतात. एनर्जी ड्रिंक्सचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे मानसिक आरोग्य खराब होणे, हृदय व रक्तवाहिन्यावर तसेच मेटाबॉलिजमवर वाईट परिणाम होऊ शकतो, असे डाॅक्टर सांगतात.

(हे ही वाचा : हिवाळ्यात डायबिटीज रुग्णांनी ‘या’ टिप्स फाॅलो करा; डॉक्टर सांगतात, रक्तातील साखर राहील नियंत्रणात! )

ही पेये कमी वेळेत जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा वाईट परिणाम थेट हृदयावर होतो. रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे, अशा समस्या जाणवू शकतात. या हेल्थ ड्रिंक्समध्ये लक्षणीय प्रमाणात साखर असते. त्यामुळे मुलांना लठ्ठपणा, दात किडणे, झोप न लागणे अशा तक्रारी येऊ लागतात. अनेक हेल्थ ड्रिंक्स आणि हेल्दी फूड्स मध्ये सोडियमचे प्रमाण लक्षणीय असते. पॅकेज्ड फूडमध्ये भरपूर सोडियम असते, जे खाल्ल्याने लठ्ठपणा, तणाव आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या सुरू होतात.  

डाॅक्टर म्हणतात, कॅफेनयुक्त इतर पेय-पदार्थांपेक्षा एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफेनचं प्रमाण तीन पट अधिक असतं. स्वाभाविकच, ही पेयं झटपट एनर्जी देत असली तरी ती कालांतरानं शरीराला हानीकारक ठरू शकतात, कॅफेनमुळे अस्वस्थता, हृदयाचा ठोका वाढणे आणि निद्रानाश यासारख्या काही लक्षणे उद्भवू शकतात. कॅफेनच्या अतिसेवनाचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळे अशा एनर्जी ड्रिंकपासून दोन हात लांबच राहण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिलाय.

Story img Loader