Black Seed Oil : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा आपण आपली त्वचा आणि केस यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्वचा आणि केसांचे सौंदर्य राखण्यासाठी जरी तुम्ही नवनवीन गोष्टींचा वापर करीत असाल तरी अनेकदा याचा काहीही फायदा होत नाही. सोशल मीडियावरही याबाबत सल्ले देणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये उपाशीपोटी एक चमचा कलौंजीच्या तेलाचे सेवन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्वचा, केस आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते, असे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जर तुम्हाला खालील समस्या असेल, तर तुम्ही तुमच्या दिनचर्येत कलौंजीच्या तेलाचा समावेश करू शकता.
१. पुरळ, सोरायसिस यांसारख्या त्वचेच्या समस्या
२. पचनाशी संबंधित समस्या
३. सांधेदुखी
४. वारंवार आजारी पडणे, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती
हा उपाय फक्त तुमची ऊर्जा वाढवत नाही, तर तुमची त्वचा निरोगी ठेवतो आणि पचनक्रियादेखील सक्षम राहते. कलौंजीचे तेल पॉवरहाऊस आहे. काळ्या बियांच्या तेलाचे नियमित सेवन केल्यानंतर तु्म्हाला दोन ते तीन आठवड्यांत बदल दिसून येईल.”
पुढे कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कलौंजीच्या तेलाचे फक्त तुम्ही सेवनच करायचे नाही, तर ते तेल तुम्ही आहारातून घेऊ शकता, तसेच त्वचेला लावण्यासाठीही वापरू शकता. या तेलाने केसांना मालिश करू शकता. त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी कलौंजीचे तेल खूप फायदेशीर आहे.”
हे कलौंजीचे तेल नायजेला सॅटिवा या वनस्पतीपासून काढले जाते आणि या कलौंजी काळ्या बिया असतात. त्याचे आरोग्यास अनेक फायदे आहे. या तेलाच्या सेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि आरोग्यास अनेक फायदे मिळतात; पण हे फायदे खरेच दोन ते तीन आठवड्यांमध्ये मिळू शकतात का?
कलौंजीच्या तेलामध्ये थायमोक्विनोन, थायमॉल व थायमोहायड्रोक्विनोन (thymoquinone, thymol, and thymohydroquinone) असतात; जे शरीराला अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म पुरवतात. जिंदाल नेचरक्युअर इन्स्टिट्युटच्या प्रमुख आहारतज्ज्ञ सुषमा पीएस सांगतात, “सकाळी उपाशीपोटी एक चमचा कलौंजीच्या तेलाचे सेवन करणे सामान्य गोष्ट आहे.”
हेही वाचा : तुम्हाला चाट खायला आवडते? कोणते चाट आरोग्यासाठी चांगले ते जाणून घ्या आहारतज्ज्ञांकडून….
कलौंजीच्या तेलाबाबत प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव वेगवेगळा असू शकतो. काही लोकांना दोन ते तीन आठवड्यांत बदल दिसू शकतात. आहारतज्ज्ञ डॉ. अर्चना बत्रा सांगतात, “यातील अँटिऑक्सिडंट्स गुणधर्मामुळे कलौंजीचे तेल चेहऱ्यावरील मुरमे दूर करते. नियमितपणे हे तेल वापरल्यामुळे त्वचा सुंदर आणि निरोगी होत असल्याचे दिसून येते.”
डॉ. बत्रा पुढे सांगतात, “या तेलाचा नियमित वापर केल्यामुळे व्यक्तीची ऊर्जा पातळी वाढते आणि जीवनशैली सुधारते. रोगप्रतिकार शक्तीसाठी कलौंजीचे तेल शारीरिक क्षमता वाढविण्यास मदत करते.
आहारतज्ज्ञ सुषमा पीएस सांगतात, “कलौंजीचे तेल हे चांगल्या आहाराच्या दृष्टिकोनातून आणि विशिष्ट आरोग्याच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे; पण याचा फायदा प्रत्येकालाच होईल, असे नाही. प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात, हे लक्षात घ्यावे. जर तुम्हाला एखादी आरोग्याची समस्या असेल आणि त्यासाठी तुम्ही कलौंजीचे तेल वापरत असाल, तर त्यापूर्वी तुमच्या जवळच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.”