Tips to avoid complications if you have diabetes: भारतामध्ये खूप कडक उन्हाळा असतो. या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीमध्ये उन्हाची तीव्रता खूप जास्त असते. वाढत्या तापमानाचा प्रभाव प्रत्येकावर होत असतो. पण मधुमेह असणाऱ्या रुग्णांना उष्णतेमुळे तुलनेने अधिक त्रास होत असतो. वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढल्याने रक्तामधील साखरेचे प्रमाण बिघडते. शिवाय यामुळे डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो. उन्हाळ्यात मधुमेह असणाऱ्यांना गंभीर आजार उद्भवतात. अशा वेळी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून काही सोप्या पण महत्त्वपूर्ण टिप्सची मदत घेता येते.
सतत पाणी प्यावे.
उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होण्याचा धोका जास्त असतो. त्यातही मधुमेहग्रस्तांच्या शरीरावर उन्हाचा प्रभाव लवकर होत असल्याने ते इतरांच्या तुलनेमध्ये लवकर डिहायड्रेट होतात. रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढत गेल्याने शरीरातून लघवीद्वारे जास्त प्रमाणात पाणी बाहेर जात असते. परिणामी डिहायड्रेशन व्हायला सुरुवात होते. असे घडू नये म्हणून ठराविक कालावधीनंतर पाणी पिणे आवश्यक मानले जाते.
सतत शुगर टेस्ट चेक करत रहा.
उन्हामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-अधिक होत असते. त्यामुळे वेळोवेळी शुगर टेस्ट केल्याने शुगर लेव्हल योग्य प्रमाण आहे की नाही हे ओळखता येते. या चाचणीमुळे परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे की नाही हेदेखील कळते. वेळीच शुगर टेस्ट केल्यास स्थिती गंभीर होण्याआधीच त्यावर उपाय म्हणून इन्सुलिन किंवा अन्य औषधे घेऊ शकता.
गरज असेल, तरच घराबाहेर पडा.
उन्हाळ्यात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कडक ऊन असते. अशाच दुपारी घराबाहेर पडल्याने शरीरावर उष्णेतेचा नकारात्मक प्रभाव होऊ शकतो. जर खूप महत्त्वाचे काम असेल, तर घराबाहेर पडावे. त्याशिवाय घरात आणि घराबाहेर सुती, हलक्या स्वरुपाचे कपडे परिधान करावे. कपड्यांनी संपूर्ण शरीर झाकण्याचा प्रयत्न करावा. बाहेर फिरताना सनस्कीन लावावे. टोपी आणि सनग्लासेसचा वापर करावा.
थंड ठिकाणी औषधे ठेवा.
गरम वातावरणामुळे इन्सुलिनसह मधुमेहावरील अन्य काही औषधांवर परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे घरातील थंड जागी औषधे ठेवा. औषधे घेऊन घराबाहेर जास्त कालावधीसाठी जात असल्यास कूलर किंवा इन्सुलेटेड बॅगमध्ये ठेवा.
प्रखर सूर्यकिरणांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण बिघडण्यासह अनेक त्वचारोग होण्याची शक्यता असते. सनबर्न, डिहायड्रेशन होऊ नये म्हणून कडक उन्हापासून स्वत:चा बचाव करणे आवश्यक असते.