वजन कमी करण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेकदा ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसेच ग्रीन टी हा आपल्या नेहमीच्या चहा किंवा कॉफीपेक्षा अधिक आरोग्यदायी आणि फायदेशीर असतो, असेही समजले जाते. मात्र, खरंच या माहितीमध्ये काही तथ्य आहे का? याबद्दल आहारतज्ज्ञ नमामी अग्रवालने [Nmami Agarwal] सोशल मीडियावर, व्हिडीओमार्फत काही साधारण समजांवर प्रकाश टाकण्याचे काम केले आहे. “ग्रीन टी आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायद्याचा असतो, असा सर्वांचा समज आहे. मात्र, कोणतेही पेय हे अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी इतके पोषक किंवा सक्षम नसते”, असे आहारतज्ज्ञ नमामीने म्हटले आहे.
ग्रीन टीसंबंधी या तीन समजांवर नमामी नेमके काय सांगतात ते पाहा.
१. दिवसभरात अनेक कप ग्रीन टी पिणे
दिवसभरात अनेक कप ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी फायद्याचे असते, असा अनेकांचा समाज आहे. मात्र, आहारतज्ज्ञ नमामी यांनी सांगितल्यानुसार, भरपूर ग्रीन टी पिण्यामुळे, पोटातील ॲसिडच्या पातळीत वाढ होऊ शकते. परिणामी, व्यक्तीला पित्ताची समस्या उद्भवू शकते.
तसेच दिल्लीमधील, आर्टेमिस लाइट येथील आहारतज्ज्ञ संगीता तिवारी यांच्या मते, अतिप्रमाणात ग्रीन टी पिण्यामुळे मळमळ, उलट्या, डोकेदुखी असे त्रास होऊ शकतात. एवढेच नव्हे तर त्यामध्ये असणाऱ्या कॅफिन या घटकामुळे भूक न लागण्याचे प्रमाणही वाढू शकते. अभ्यासानुसार दिवसभरातून केवळ तीन ते चार कप ग्रीन टी पिणे उपयोगी असू शकते. मात्र, त्याचा अतिरेक आवर्जून टाळण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ तिवारी यांनी दिला असल्याचे द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते.
हेही वाचा : योगा डाएट : आसनांचा आरोग्याला पुरेपूर फायदा व्हावा यासाठी आहार कसा असावा? पाहा या पाच टिप्स….
२. ग्रीन टीमध्ये कॅफिन नसते
ग्रीन टीमध्ये कॅफिन नसते, असा जवळपास सर्वांचा समज आहे. मात्र, या चहात सर्वाधिक कॅफिन असल्याचे आहारतज्ज्ञ नमामीने सांगितले आहे. या चहामध्ये कॅफिन अधिक असल्यामुळेच व्यक्ती रात्री उशिरापर्यंत जागी राहू शकते. मात्र, तुमच्या शरीराला जर कॅफिन चालत नसेल तर तुम्हाला एन्झायटी [anxiety], कंप [tremors] तसेच झोपेसंबंधित त्रास होण्याची शक्यता असते.
३. ग्रीन टी पिण्याने वजन कमी होते
केवळ ग्रीन टी पिऊन वजन कमी होत नाही, असे आहारतज्ज्ञ अग्रवाल यांचे मत आहे. मात्र, आहारतज्ज्ञ तिवारी यांच्या मतानुसार, ग्रीन टीमुळे काही अंशी वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करता, शारीरिक हालचाल किंवा आहारात बदल न करता केवळ ग्रीन टीवर अवलंबून राहून काही उपयोगाचे नाही.
“ग्रीन टीमध्ये कॅफिन आणि कॅटेचिन नावाचे एक विशिष्ट प्रकारचे फ्लेव्होनॉइड असते, जे त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखले जाते. दोन्ही घटकांमध्ये चयापचय क्रिया वाढवण्याची क्षमता असते. कॅटेचिन अतिरिक्त चरबीचे विघटन करण्यास मदत करते. कॅटेचिन आणि कॅफिन एकत्रितपणे काम करून शरीरातील ऊर्जा अधिक प्रमाणात खर्च करण्याची क्षमता वाढवतात, ज्यामुळे शरीरात व्यायाम करण्यासाठी अधिक ऊर्जा निर्माण होते; ज्यामुळे कॅलरीज जाळण्याचे प्रमाण वाढते. मात्र, अधिक प्रमाणात वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीचा वापर केला जाऊ शकत नाही”, असेही आहारतज्ज्ञ तिवारी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : ‘या’ पदार्थांमध्ये ५० पेक्षाही कमी कॅलरीज; आहारात आवर्जून समावेश करण्याचा आहारतज्ज्ञांचा सल्ला…
मात्र, आहारतज्ज्ञ तिवारी यांनी ग्रीन टी पिण्याचे काही फायदेदेखील सांगितले आहेत, ते पाहा
१. योग्य प्रमाणात सेवन केल्यास ग्रीन टीमध्ये असणाऱ्या अमिनो ॲसिडमध्ये मन आणि शरीरास शांत म्हणजे calming करण्याची क्षमता असते.
२. ग्रीन टीमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.
३. या चहामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहू शकते. परिणामी टाईप २ चा मधुमेह टाळण्यास किंवा नियंत्रत करण्यास ग्रीन टी फायदेशीर ठरू शकतो.
मात्र, ज्यांना हृदयासंबंधी तसेच उच्च रक्तदाब, यकृत किंवा मूत्रपिंडाच्या समस्या आणि पोटात अल्सर असलेल्या व्यक्तींना ग्रीन टीचे सेवन न करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ तिवारी यांनी दिला आहे. याचबरोबर गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनादेखील ग्रीन टीचे सेवन करू नये, असे तिवारी सांगतात.