How Much Water Important for Weight Loss: पाणी म्हणजे जीवन मानलं जातं. पाणी हा शरीराचा अत्यंत आवश्यक घटक आहे. उन्हाळ्यात योग्य प्रमाणात पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. पण, झोपेतून उठल्यानंतर आणि व्यायामापूर्वी किती ग्लास पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होईल? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधून काढणार आहोत, आहारतज्ज्ञ सिमरन वोहरा यांनी याविषयी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे, ते सविस्तर जाणून घेऊया…
दिवसाला अमुक लिटर पाणी पिणे ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे, अशा अर्थाचे मेसेज आपल्याला ढिगाने मिळू लागले आहेत. उत्तम आरोग्य, अधिक ऊर्जा आणि सुंदर त्वचा यासाठी तर पाणी प्यायला हवंच, शिवाय पाणी पिणे हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. पण, खरंच झोपेतून उठताच आणि वर्कआऊटच्या आधी किती ग्लास पाणी प्यायल्यास वजन कमी होईल, काय सांगतात तज्ज्ञ जाणून घेऊया…
किती ग्लास पाणी प्यायल्यास वजन झपाट्याने कमी होईल?
तज्ज्ञ सांगतात, सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. त्याचप्रमाणे व्यायाम करण्याच्या एक तासापूर्वी दोन ग्लास पाणी प्यावे आणि व्यायामाच्या ३० मिनिटांनंतर दोन ग्लास पाणी प्यावे, तर जेवणाच्या ३० मिनिटांआधी दोन ग्लास पाणी प्यावे, तर सकाळच्या नाश्त्यानंतर दोन ग्लास लिंबू पाणी प्यावे, असे तज्ज्ञ सांगतात.
यावरूनच झायनोवा शाल्बी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी सांगितले की, असंतुलित आहार आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या झपाट्याने वाढत आहे. वजन वाढल्याने शरीरात अनेक समस्याही वाढतात, त्यामुळे दररोज कोमट पाणी प्यायल्याने शरीराची चयापचय पातळी वाढण्यास मदत होऊ शकते. कोमट पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास, पचनक्रिया अधिक सुरळीत होते. कोमट पाणी पिण्यामुळे आतड्याची संकुचनाची प्रक्रिया अधिक त्वरीत होते आणि पचनक्रिया सुधारून तुम्हाला त्रास होत नाही. कोमट पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील मेटाबॉलिजम अॅक्टिव्ह होऊ शकते, यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होऊ शकते.
पण, फक्त पाणी पिऊन वजन कमी करणे अशक्य आहे, यावर पटेल यांनी जोर दिलाय. वजन वाढण्याचे मूळ कारण समजून घेतल्यास तुम्हाला वजन कमी करण्यासाठी योग्य योजना तयार करण्यास मदत होऊ शकते. खरंतर, विविध घटकांमुळे वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी प्रक्रिया केलेले, जास्त साखर आणि चरबीयुक्त पदार्थ टाळा आणि संतुलित आहार घ्या. आहारात प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक तत्वे भरपूर असावीत, तसेच नियमित व्यायाम करा, असे त्या नमूद करतात. जर तुम्ही सतत प्रयत्न करून आणि आवश्यक बदल करूनही वजन कमी करू शकत नसाल, तर आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते, असाही सल्ला त्यांनी दिला.