मागील काही काळात ग्लुटेन फ्री आहाराचा ट्रेंड जोरदार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचसोबत काही जण या प्रकाराला आपली जीवनशैली बनवत असल्याचंही बघायला मिळतं. या प्रकारचं पथ्य पाळण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या काही ठोस कारणंदेखील आहेत. त्यामध्ये ग्लुटेनचा त्रास, सिलियाक रोग [Celiac disease] असलेल्या व्यक्तींसाठी हे पथ्य हेही एक कारण आहे. या पथ्याचा प्रयोग कुणीही, कधीही करून चालत नाही. सोशल मीडियावरच्या आरोग्यासाठी ‘ग्लुटेन फ्री डायट’ हवं ही समजूत साफ चुकीची आहे, असं समजतं.
पोषक पदार्थांची कमतरता
ग्लुटेनफ्री पथ्यामुळे तुमच्या शरीरामध्ये महत्त्वाच्या पोषक घटकांचा अभाव होतो आणि कॅलरीजचे प्रमाणदेखील वाढू शकते. “ग्लुटेन फ्री पदार्थ हे मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया केलेले असून, अशा पदार्थांमध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांची कमतरता असते. ग्लुटेन फ्री पदार्थांमध्ये ग्लुटेन असलेल्या पदार्थांसारखी चव येण्यासाठी त्यावर फार जास्त प्रमाणात प्रकिया केली जाते. अशा पदार्थांमध्ये साखर, कॅलरी व हानिकारक चरबी यांचा जास्त प्रमाणात वापर केलेला असतो,” असं मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील, वैद्यकीय आहारतज्ज्ञ डॉक्टर फियोना संपत [Fiona Sampat, clinical dietitian] सांगतात. अशा पदार्थांमुळे वजन वाढणे आणि आरोग्याच्या इतर समस्या उदभवू शकतात.
हेही वाचा : काम करून डोळ्यांवर ताण आलाय? पाहा, निरोगी डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतील हे सात योगा…
ग्लुटेन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे. त्यामुळे ग्लुटेन फ्री पदार्थांचा आहारात समावेश केल्याने, शरीरातील प्रोटीनचे प्रमाण आपोआप कमी होते. ग्लुटेनमध्ये असलेल्या प्रोटीनव्यतिरिक्त आहारात फायबर्स, खनिजे व जीवनसत्त्वांसारख्या कार्बोहायड्रेट्सचादेखील समावेश असणे आवश्यक असते. शरीरातील चांगल्या जीवाणूंसाठी प्रोबायोटिक म्हणूनही ग्लुटेन महत्त्वाचं काम करतो, असं डॉक्टर संपत म्हणतात. “गव्हाच्या कोंड्यातून मिळणारे प्रोबायोटिक कार्बोहायड्रेट मोठ्या आतड्यात होणाऱ्या बायफिडोबॅक्टेरियाचे [bifidobacteria] काम सुरळीत ठेवते. हे निरोगी पोटामध्ये सापडणारे जीवाणू असतात,” असं डॉक्टर संपत यांनी सांगितले.
ज्या व्यक्तींना हृदयविकार किंवा मधुमेहाचा त्रास आहे, अशा व्यक्तींसाठी पूर्ण धान्यं फार उपयोगी असतात. कारण- पूर्ण धान्य रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. ग्लुटेन फ्री पदार्थांचा परिणाम बी जीवनसत्त्वावरही होतो. “याव्यतिरिक्त शरीराला आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक खनिजांचं म्हणजेच लोह, झिंक, मॅग्नेशियम व सेलेनियम यांसारख्या घटकांचा पुरवठाही कमी होतो” असं फरिदाबादमधील मेट्रो हार्ट इन्स्टिट्यूट विथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक, इंडोक्रायनोलॉजी व मधुमेहतज्ज्ञ डॉक्टर अरुण कुमार सी. सिंग [Dr. Arun Kumar C. Singh, Director, Endocrinology and Diabetology] म्हणतात.
ग्लुटेन फ्री पदार्थ आणि वजन कमी होणे
ग्लुटेन फ्री पथ्यामुळे वजन खात्रीशीर कमी होईलच, असे सांगता येत नाही. त्याचसोबत त्यामुळे हृदय, पचनाच्या समस्यादेखील कमी करण्यास मदत होत नाही. सकस आहार घेणे, आहारात फळे-भाज्यांचा समावेश करणे हेच योग्य असून, त्याला कोणताही दुसरा पर्याय नाही. इतर धान्यांच्या पिठांचा वापर केल्यास, त्याच्या सेवनावर लक्ष न ठेवल्याने कार्ब्सचे प्रमाण वाढू शकते, असंदेखील डॉक्टर सिंग म्हणतात.
हेही वाचा : दिवसातून ८ ते १० हजार पावलं चालणं होईल सोपं; पाहा, तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ हॅक्स ठरतील उपयुक्त…
ट्रेंडचा खिशावर होणारा परिणाम
ग्लुटेन फ्री पदार्थ ग्लुटेन असणाऱ्या पदार्थांपेक्षा जास्त महाग असून, त्याचा पारिणाम तुमच्या बजेटवरही होतो. त्यासोबतच बाहेर गेल्यानंतरही तुमच्या खाण्याच्या पर्यायांवर मर्यादा येतात. “बाहेर हॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्लुटेन फ्री पदार्थांचे पर्याय फार कमी असतात. त्यातून काही गोष्टी सापडल्या तरीही इतरांसोबत त्या मिळून मिसळून खाणं शक्य होत नाही. त्यामुळे सगळ्यांसोबत असूनही तुम्हाला एकटं वाटू शकतं.” असं डॉक्टर सिंग यांचं मत आहे.
काही जण डॉक्टरांचा सल्ला न घेता, केवळ ग्लुटेन फ्री पथ्याचे फायदे बघून, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. पण कोणाचाही सल्ला न घेता, असा प्रयोग केल्याने भविष्यात आरोग्याबाबत तक्रारी उदभवण्याची शक्यता असते.
“तुम्हाला ग्लुटेन फ्री डायट करायचे असल्यास, डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्हाला खरंच त्याची गरज आहे का हे एकदा तपासून बघणं आवश्यक असतं,” असाही सल्ला डॉक्टर सिंग यांनी दिला आहे. त्याचसोबत ज्या धान्यांमध्ये नैसर्गिकरीत्या ग्लुटेन नसेल अशा धान्यांचा उपयोग केल्याने ते आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं.