How to Regrow Hair on Bald Head : “डॉक्टर मला PRP करायचंय”. तिशीतला एक देखणा मुलगा माझ्या समोर खुर्चीत बसता बसता म्हणाला. “अरे आधी बस तर श्रेयस”. त्याच्या वयाच्या मानाने त्याला टक्कल बऱ्यापैकी पडलेले होते. समोरचे केस गेले होते, तर माथ्यावर विरळ झाले होते. “माझं लग्न आहे जानेवारीत, तोपर्यंत लवकरात लवकर मला केस हवेत”. त्याने पुढचा गुगली टाकला. तर या श्रेयसला चार महिन्यात फक्त PRP करून टकलावर केस हवे होते. असते का अशी झटपट रिझल्ट देणारी हॅरी पॉटरची छडी डॉक्टरांच्या हातात ? याचे उत्तर दुर्दैवाने नाही असे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टकलावरील उपचार जास्त कालावधीपर्यंत घ्यावे तर लागतातच, शिवाय ते अचानक बंद देखील करता येत नाहीत. कारण अनुवंशिकता (genes) आणि पुरुष संप्रेरके ह्यांचा आपण समूळ नायनाट करू शकत नाही. आपण औषधांनी त्यांचे केसांवर होणारे परिणाम रोखतो. त्यामुळे ही औषधे बंद केल्यास पुन्हा केस गळायला सुरुवात होते.

आता पाहूया हे उपचार …..

पुरुषांमधील टक्कल पडणे :

औषधोपचार सुरु करण्यापूर्वी केसांची व scalp ची तपासणी करणे आवश्यक असते. डोक्यात कोंडा असल्यास तोदेखील केस गळतीस हातभार लावतो. पेशंटची एकूण तब्बेत, त्याला असलेले इतर रोग ह्यांची नोंद करावी लागते. केसरचनेनुसार टकलाची प्रतवारी करून औषधे सुरु केली जातात. आपल्या भारतीयांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे ते दुरुस्त करणे महत्वाचे आहे. त्याबरोबर लोह, व इतर जीवनसत्वे ह्यांची गोळी सुरु केली जाते. हे सर्व खुराक केसवाढीसाठी पूरक ठरतात.

हेही वाचा : Health Special: शरद ऋतूमध्ये पित्तप्रकोप का होतो?

परंतु मुख्य औषधे दोन आहेत.

मिनॉक्सिडील (Minoxidil) : हे औषध खरे तर उच्च रक्तदाब (High Blood Pressure) साठी वापरात आले . आणि हे औषधं घेणाऱ्या काही रुग्णांमध्ये डोक्यावरील केसांमध्ये वाढ झाल्याचे आढळलं. मग काय ……… त्यावर संशोधन होऊन हे औषध लावण्याच्या स्वरूपात तात्काळ बाजारात आले. त्यामुळे केसांच्या उपचारपद्धतीमध्ये आमूलाग्र क्रांतीच झाली. त्याने टक्कल पडलेल्या असंख्य रुग्णांना आशेचा किरण दाखवला. हे औषधं २%, ५%, १०%, अशा विविध तीव्रतेनुसार वापरले जाते. ह्या औषधाने केसांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. त्यायोगे मुळांना जरूरी अन्न व जीवनसत्वे भरपूर प्रमाणात पुरवली जातात. आणि अनाजेन ही फेज लांबवली जाते. त्याचबरोबर केस उत्पन्न करणारी प्रोस्टाग्लँडिन ही रसायने कमी केली जातात. त्यामुळे केसांची संख्या, वजन व घनता वाढते. फिनास्टेराईड आणि ड्युटास्टिरॉईड ही पोटात घ्यावयाची औषधे आहेत. ती ५ Alpha Reductase या enzyme ची पातळी कमी करते. ज्यायोगे टेस्टोस्टीरॉन या संप्रेरकाचा केसांवर परिणाम करणारे रसायन तयार होणे थांबते.

हेही वाचा : Health Special: बहुगुणी सफरचंद

स्त्रियांच्या केस गळतीवरील उपचार :

स्त्रियांमध्ये मात्र लोह, ‘ड’ जीवनसत्व, थायरॉईड, आणि PCOS च्या चाचण्या करणे गरजेचे असते. स्त्रियांमध्ये तरुणपणीच अशी केसगळती दिसत असेल, तर PCOS किंवा Hormones च्या तपासण्या आवश्यक ठरतात. परंतु रजोनिवृत्तीच्या (मेनापॉज) च्या काळात ह्या चाचण्यांची फारशी आवश्यकता नसते.

तरुण स्त्रियांमध्ये पुरुष संप्रेरकांचा अथवा PCOS चा प्रादुर्भाव आहे का ? याकरिता वजन, चेहऱ्यावरील केस, मानेभोवती व काखेत होणारा काळेपणा, डोक्यात कोंडा, केसगळतीचा पॅटर्न व त्याची पातळी यांची नोंद केली जाते. त्यानंतर गरजेनुसार तपासण्या केल्या जातात. त्यामध्ये लोह, ‘ड’ जीवनसत्व आणि थायरॉईड व टेस्टोस्टिरॉन ह्या दोन संप्रेरकांच्या तपासण्या अनिवार्य ठरतात.

हेही वाचा : दुपारच्या जेवणानंतर झोपण्याची इच्छा होते का? महिलांमध्ये ही इच्छा खूप तीव्र का होते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

उपचार : मिनॉक्सिडील (Minoxidil) पुरुषांप्रमाणेच रक्तपुरवठा वाढवणे व दाह कमी करणे याबरोबर अँटीअँन्डरोजेनिक (Antiandrogenic) म्हणजे (पुरुष संप्रेरकाचा मारक) म्हणून देखील कार्य करते. स्त्रियांमध्ये ५%, मिनोक्सिडील वापरले जाते. ट्रीटमेंटच्या सुरुवातीच्या २ – ८ आठवड्यात स्त्रिया आणि पुरुष दोघांमध्ये केसगळती वाढलेली आढळते आणि पेशंट घाबरून जातात. घाबरू नका, कारण हे सर्व केस टेलोजेन (Telogen) या फेज मधले असतात. आणि ते अनाजेन (किंवा नव्या केसांना) जागा करून देत असतात. या औषधाच्या वापराने डोक्याची त्वचा कोरडी होऊन पापुद्रे निघू लागतात. परंतु हा दोष फोम वापरल्याने कमी होतो. त्याचप्रमाणे हे औषधं लावण्याऐवजी पोटात घेतल्याने देखील हा दोष दिसत नाही. या औषधाच्या वापराने कधी कधी स्त्रियांमध्ये चेहऱ्यावरील केसांमध्ये वाढ होताना दिसते. विशेषतः ५% मिनोक्सिडील (Minoxidile) च्या वापराने.

अँटीअँड्रॉजेन थेरपी (Anti Androgen Therapy) :

फिनास्टेराईड या औषधाच्या थोड्या जास्त मात्रेचा Post Menapausal स्त्रियांमध्ये चांगला फायदा दिसून येतो. काही तरुण स्त्रियांना देखील हे औषधं उपयोगी ठरु शकते. स्पायरोनोलॅक्टोन (Spironolactone) हे अँटीअँड्रॉजेन फिनास्टेरॉईड (Antiandrogen Finasteride) पेक्षा स्त्रियांमध्ये अधिक लाभदायक आहे. सायप्रोटेरोन ऍसिटेट (Cyproteron Acetate) व फ्लूटामाईड (Flutamide) ही देखील औषधे अँटीअँड्रॉजेन (Antiandrogen) म्हणून वापरण्यात येतात.

हेही वाचा : पनीरमुळे वजन वाढण्याऐवजी होईल कमी! लक्षात ठेवा या पाच टिप्स….

एक सावधानतेचा इशारा : या अँटीअँड्रॉजेन (Antiandrogen) औषधामुळे गर्भवती स्त्रियांच्या पुरुष गर्भावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तरुण स्त्रियांमध्ये वापरताना गर्भनिरोधन अत्यावश्यक ठरते. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही औषधे वापरावीत. स्तनपान करणाऱ्या मातांनी पण काही काळ थांबावे.

PRP उपचार पद्धती :

या औषध उपचारांशिवाय PRP ह्या उपचारपद्धतीत रुग्णांच्या रक्तातून प्लेटलेट या पेशी वेगळ्या करून त्यांचे द्रावण डोक्याच्या त्वचेत इंजेक्ट केले जाते. ज्यायोगे रक्तातील विविध growth factors मुळाना जोमदार बनवतात. औषध उपचारानंतरही टक्कल शिल्लक राहिले तर केसरोपण शस्त्रक्रिया केली जाते. डोक्याच्या मागील भागावरचे केस काढून त्यांचे रोपण पुढील टकलावर करता येते. ह्या सर्व उपचारांनी टकलावर केस येतात. फक्त उपचारांमध्ये सातत्य आणि संयम ठेवणे ही बाब महत्वाची. धीर धरा रे धीरापोटी असती मोठी फळे गोमटी

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Does hair grow on the bald head is their any treatment to grow hair on bald head hldc css
Show comments