तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामाचा सर्वांत सोपा प्रकार म्हणजे चालणे किंवा धावणे (जॉगिंग). मात्र, जर तुम्हाला जर कोणी सांगितले की, या व्यायामप्रकाराला अधिक फायदेशीर बनवता येऊ शकते, तर? असे करण्यासाठी सरळ चालण्यासारखा अत्यंत सोपा प्रकार. तुम्ही करू शकता. तो म्हणजे उलट चालणे! दररोज उलट चालण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, असे दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील फिजिओथेरपी विभागाचे एचओडी डॉ. सुरेंद्र पाल सिंग यांनी सांगितल्याची माहिती दी इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून मिळते. या व्यायामप्रकाराचा आपल्या शरीराला नेमका कसा फायदा होतो ते जाणून घेऊ.
उलट चालण्याचे तज्ज्ञांनी सांगितलेले फायदे :
१. स्नायूंच्या [Core, Glutes] मजबुतीसाठी उपयुक्त
उलटे चालताना तुमच्या पोटाजवळील स्नायू [core] आणि पृष्ठभागाजवळील स्नायू [gluteal] यांवर सर्वाधिक परिणाम होत असतो. हे स्नायू तुमच्या चांगल्या शरीरयष्टीसाठी, शरीर स्थिर ठेवण्यासाठी आणि पाठीची दुखणी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. उलट चालण्याने या विशिष्ट स्नायूंचा चांगला व्यायाम होतो. त्यामुळे तुमच्या शरीराला उत्तम आधार दिला जातो, असे डॉक्टर सिंग यांचे म्हणणे आहे.
२. न्यूरोमस्क्युलरचे नियंत्रण उत्तम करण्यास उपयुक्त
उलट चालण्याने तुमच्या मज्जासंस्थेला काम करण्यासाठी खास आव्हान मिळते; जे सरळ चालण्याने मिळत नाही. त्यामुळे तुमचे ‘प्रोप्रिओसेप्शन’ सुधारते. म्हणजेच व्यक्ती आपल्या हालचालींवर अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम होते. या व्यायामप्रकारामुळे शरीराचे एकंदरीत संतुलन सुधारण्यास मदत मिळते. त्यामुळे ती व्यक्ती सर्व गोष्टींमध्ये उत्तम प्रकारे नियंत्रित हालचाली करू शकते.
उलट चालणे आणि धावणे/जॉगिंगमधील फरक काय? [Backwards walking vs jogging]
धावणे हा अतिशय सोपा आणि उत्तम व्यायामप्रकार आहे. मात्र, उलट चालण्याचे काही खास फायदे असल्याचे डॉक्टर सिंग सांगतात.
गुडघेदुखी कमी होणे
ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी उलट चालणे हा एक उत्तम पर्याय आहे. धावण्याच्या व्यायामामुळे गुडघ्यांवर येणाऱ्या ताणाचे प्रमाण उलट चालण्याचा व्यायाम करताना खूपच कमी असते. त्यामुळे गुडघ्याचे दुखणे असणाऱ्या व्यक्तींसाठी हा प्रकार अधिक सोईचा ठरू शकतो.
चयापचय क्रिया सुधारणे
उलट चालण्यामुळे व्यक्तीचा आराम करताना किंवा व्यक्ती व्यायाम करीत नसतानाही मेटाबॉलिक हार्ट रेट सुधारण्यास मदत होते.
उलट चालणे कुणी टाळावे? [Who should avoid walking backwards]
आपण उलट चालण्याचे फायदे पहिले; मात्र हा व्यायाम सोपा वाटत असला तरीही तो प्रत्येकासाठी उपयुक्त नाही. डॉक्टर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, ज्यांना न्यूरोमस्क्युलर डिस-ऑर्डरचा त्रास आहे, अशा व्यक्तींनी उलट चालण्याचा व्यायामप्रकार करू नये. न्यूरोमस्क्युलर डिस-ऑर्डरमध्ये व्यक्तीच्या संतुलन आणि नियंत्रणावर परिणाम होत असतो. त्यामध्ये खोकल्यासारखी क्रिया किंवा इतर संवेदना समजण्यात अडथळा निर्माण होतो. हा व्यायाम शरीराच्या उत्तम समन्वयाच्या मदतीने केला जातो. म्हणून डॉक्टर सिंग यांनी न्यूरोमस्क्युलर डिस-ऑर्डर असणाऱ्या व्यक्तींना उलट चालण्याचा व्यायाम न करण्याचा सल्ला दिला आहे.
अनेकांना उलट चालणे हे फार विचित्र किंवा हास्यास्पद वाटू शकते. मात्र, तरीही या प्रकारामागचे शास्त्र खूपच कौतुकास्पद आहे. उलट चालण्याने तुमच्या स्नायूंना बळकटी देण्यापासून ते शरीराचे संतुलन सुधारण्यासाठी आणि चयापचय क्रिया सुधारण्यासाठी मदत मिळू शकते. हा खास आव्हानात्मक व्यायामप्रकार दैनंदिन ‘फिटनेस ट्रेनिंग’मध्ये महत्त्वपूर्ण ठरू शकतो, अशी माहिती दी इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून मिळाली.